आयुक्त म्हणतात, “हा तर उंदीर मांजराचा खेळ”!
नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडतांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी एक मजेशीर उक्ती वापरली. संदर्भ होता, अनधिकृत जाहिरात फलकांचा. जाहिरातदारांबरोबरच राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, काही व्यावसायिक पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला अक्षरशः टांगून अनधिकृत जाहिरात फलक सर्रासपणे लावतात. त्यासाठी महापालिकेचे काही ठोस धोरण आहे काय असा प्रश्न त्यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. ही अनधिकृत फलक लावणारी मंडळी महापालिकेचा करोडोंचा महसूल बुडावताहेत, त्यांना आळा घातला गेला पाहिजे, हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू होता. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी त्यावर गंमतीदार उत्तर दिले. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, “या बाबतीत सर्वकाही ठीक आहे, असेही नाही आणि प्रशासनातर्फे काहीच केले जात नाही, असेही नाही. धिस इज कॅट अँड रॅट सिस्टिम.” मात्र, हे शब्द उच्चारताना त्यांनी या उंदीर मांजराच्या खेळात कधीकधी उंदीर मांजराला घाबरवतो अशीही जोड दिली. आता यात महापालिका प्रशासन उंदीर आहे की मांजर हे स्पष्ट करणे मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी टाळले.
आयुक्तांच्या या वक्तव्याला तसे पाहिले तर फारच गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. त्यांनी बोलण्याच्या ओघात हे शब्द उच्चारल्याचे स्पष्ट केले असले तरी, सध्याचा प्रशासनाचा सगळा कारभारच उंदीर मांजराच्या खेळासारखा चालला असल्याचे दृश्य आहे. यातही गंभीर प्रकार हा की पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन कायम उंदराच्या भूमिकेत असून या महापालिकेला खेळवून घाबरवणारी आणि त्याचे हवे तसे लचके तोडणारी मांजरे मात्र अनेक आहेत. एकीकडे राज्यातील भाजप शिंदे सरकार, त्यांचे शहरातील मनसबदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. तर, दुसरीकडे ठेकेदार, त्या ठेकेदारांचे राजकीय बाप, महापालिकेनेच नेमलेले सल्लागार, सल्लागारांनी पोसलेले अधिकारी आहेत. हे दोन्हीकडचे लोक प्रशासन नावाच्या उंदराला खेळवून खेळवून खाताहेत. हे लचके तोडणे इतके झाले आहे आणि आता ही मांजरे इतकी गब्बर होऊन माजलीत की त्यांच्या गळ्यात घंटी बांधणे अशक्य होऊन बसले आहे.
आता ज्या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही उंदीर मांजराची उक्ती वापरली, त्या अनधिकृत जाहिरात फलकांचेच उदाहरण घेऊ. हे अनधिकृत फलक काढण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला होता. या ठेकेदाराने म्हणे शंभरपेक्षा जास्त अनधिकृत फलक काढले आणि त्याचे देयकही महापालिकेने त्या ठेकेदाराला देऊन टाकले. मात्र, एका फलकाला सुमारे पाच टन लोखंड वापरण्यात येत असल्याने या काढून टाकलेल्या अनधिकृत फलकांचे सुमारे पाचशे टन लोखंड महापालिकेच्या गुदामात कोठेही जमा केल्याचे दिसत नाही. अगदी भंगार भाव म्हटला तरी, तीस रुपये किलो या दराने सुमारे दीड कोटी रुपये त्या ठेकेदाराने घशात घातले आहेत. महापालिकेचा प्रत्येक ठेका केवळ ठेकेदारांच्याच सोयीच्या अटीशर्ती लावून दिला जातो, हा अलिखित कायदा झाला आहे. विविध कामांसाठी नेमलेले सल्लागार यावर विशेष काम करताना आढळतात.
सल्लागारच अधिकारी, ठेकेदार आणि राजकारण्यांचे दलाल!
हे सल्लागार नावाचे प्रकरण तर, अगदीच गंभीर आणि भयानक आहे. संडास बांधण्यापासून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी सध्या सल्लागार नेमले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे तेच तेच सल्लागार संस्थेची नावे बदलून सल्ल्याचे “मूल्यवान” काम करताना दिसतात. हे सल्लागार विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेऊन कोणत्याही कामाच्या निविदेतील अटीशर्ती ठरवतात. जास्तीतजास्त रकमेच्या कामांच्या निविदा तयार करण्यास या सल्लागारांना आवर्जून सांगितले जाते. काहीशे कोटींच्या या निविदा मग ठराविक ठेकेदाराला काम मिळेल या पद्धतीने तयार केल्या जातात. पुन्हा हे काम मिळवणाऱ्या मोठ्या ठेकेदारांचे पोट ठेकेदार म्हणून राज्यातील सत्ताधारी, त्यांचे स्थानिक बगलबच्चे, या स्थानिक बगलबच्च्यांचे बगलबच्चे यांना काम देण्याचा सल्लाही सल्लागारच देतात. अधिकारी, ठेकेदार, त्यांचे राजकारणी पोट ठेकेदार यांच्या माध्यस्थीची अनधिकृत दलाली आणि महापालिकेकडून रीतसर मिळणारी दलाली यावर सल्लागार मालामाल झाले आहेत. काही ठराविक अधिकारी सोडले तर आख्खे महापालिका प्रशासन उंदीर झाले असून, हे सल्लागार, ठेकेदार, त्यांचे राजकारणी पोट ठेकेदार या उंदराला खेळवून त्याचे लचके तोडणारे मांजर झाले आहे.
भामा आसखेड पाणीपुरवठा योजना मांजराच्याच हाती!
वर उधृत केलेल्या पत्रकारांच्या वार्तालाप प्रसंगी भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराबाबत शंकास्पद आक्षेप घेतले जात असल्याची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी सगळ्या माध्यमांना आणि त्यांच्या प्रेक्षक, वाचकांना मूर्खात जमा केले. भामा आसखेड प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर असलेले आक्षेप आपल्या कामाशी संलग्न नाहीत, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. त्याचे स्पष्टीकरण करताना कामाशी संबंधित आवश्यक बाबी आणि अनावश्यक बाबी असतात. संबंधित ठेकेदाराच्या आवश्यक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी नाही. त्याचे चरित्र, कामाची यापूर्वीची हलगर्जी, त्याच्यावर यापूर्वी झालेल्या कारवाया या सगळ्या अनावश्यक बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. थोडक्यात काय, एखादा तिजोरी फोड्या चांगले काम करतो म्हणून त्याला आपली तिजोरी बनवण्याचे काम देण्यासारखा हा प्रकार आहे. तो आपल्या तिजोरीवर घाला घालणार नाही, हा दुर्दम आशावाद आयुक्तांसह महापालिका प्रशासनाची अवस्था उंदरापेक्षा बिकट आहे, हेच अधोरेखित करतो. त्याचबरोबर काही अधिकारी, ठेकेदार, सल्लागार ठेकेदार, राजकारणी पोट ठेकेदार ही सर्व माजलेली मांजरे या प्रशासनाला खेळवून त्याचे लचके तोडताहेत, हे महत्त्वाचे. हे लक्षात येऊनही त्याचा विरोध करण्याची अगर त्यावर भाष्य करण्याची धमक या प्रशासनामध्ये नाही, इतके महापालिका प्रशासन हतबल आहे.
———————————————————–