आमचे प्रतिनिधिच आमचा गळा आवळताहेत! (रेमडीसीविरचे गौडबंगाल!भाग ३)
पिंपरी (दि. १५/०४/ २०२१)
रेमडीसीविरचा तुटवडा आता उच्चांक गाठू लागला आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अगदी गल्लीबोळातीलही औषध दुकाने शोधताहेत. एका रुग्णाच्या एक नातेवाईकाला अचानक सुचले की आपली अनेक राजकारण्यांशी चांगली जमते, काहींना तर आपण निवडून येण्यासाठी अगदी अशक्य ते शक्य करून मदत केली, मग अशावेळी त्यांना रेमडीसीविरचे साकडे घालायला काय हरकत आहे? म्हणून मग हा एक विद्यमान नागरसेवक, जो महापालिकेचा एक मोठा माजी पदाधिकारी आहे, त्याच्याकडे गेले. रेमडीसीविरची गरज आणि आपली धावपळ सांगून काय करावे, असे विचारले. अगोदरच का आला नाहीस, असे आस्थेवाईकपणे विचारून त्याने रेमडीसीविर पैदा करण्याचे ठाम आश्वासन दिले. आपण यांच्यासाठी जे काही केले त्याचे चीज होणार या भावनेतून सुखवलेल्या त्या नातेवाईकाला हे माहित नव्हते की, आता एका नवीन वगाला सुरुवात होणार आहे.
दोन तासात रेमडीसीविर देतो, असे तोंड भरूनचे आश्वासन घेऊन हा नातेवाईक घरी आला. आपली नित्यकर्म आटोपून फोनची वाट पाहायला लागला. दोनचे चार तास उलटल्यावर अस्वस्थ होऊन त्याने पुन्हा त्या पुढाऱ्याला फोन केला. आपल्या माणसाकडची रेमडीसीविर संपलीत, आपण दुसरीकडे प्रयत्न करतो आहोत, असे सांगून तो पुढारी होईल सोय म्हणून पुन्हा आश्वस्थ करता झाला. वेळ वाया घालवायला नको, म्हणून हा पुन्हा कामाला लागला. शोध सुरू ठेऊन त्या पुढाऱ्याला फोन करीत राहिला. सकाळी दहाच्या दरम्यान सुरू झालेले हे वागनाट्य रात्री आठ वाजेपर्यंत पुढेच जात नव्हते. त्यानंतर त्या पुढाऱ्याचा फोन आला, पण एक अडचण असून येऊन भेट असे सांगणारा हा फोन वगाला वेग देणारा होता. हा रुग्णाचा नातेवाईक घाईघाईत पुढाऱ्याला भेटला. पुढाऱ्याने सांगितले की, रेमडीसीविर आहे, पण ब्लॅकने पैसे द्यावे लागतील. किती, विचारल्यावर अठ्ठावीसशे हा आकडा कळला. चालेल म्हटल्यावर पैसे घेऊन ये, तासाभरात तो माणूस येईल असे पुढाऱ्याने सांगितले. हा नातेवाईक पैसे घेऊन गेला आणि परमेश्वरासारखा पुढाऱ्यांशी संबंधित एक माणूस प्रकट झाला, दोन रेमडीसीविर देऊन पाच हजार घेऊन कागदी खोके देऊन गेला. वरचे सहाशे वाचले ही भावना नातेवाईकांची होती. बॅच नंबर, २८०० रु. किंमत आणि १०/२०२१ पर्यंत मुदतीचा कागद चिटकवलेले असलेले हे रेमडीसीविरचे खोके रुग्णापर्यंत पोहोचवले. या वगनाट्याचा क्लायमॅक्स म्हणजे आतल्या बाटलीवर मुदतीचा कागद ०४/२०२१ दाखवत होता. पण चालू महिना मुदत आहे, असे सांगून रुग्णाला इंजेक्शन देण्यात आले.
आता प्रश्न निर्माण होतो तो, या पुढाऱ्याकडे रेमडीसीविर कसे? त्यासाठी अन्न व औषधे विभागाचे प्रशासन आणि रेमडीसीविरची वितरण यंत्रणा यांना विचारपूस करायला हवी. ढोबळ माहिती अशी की, रेमडीसीविरच्या काही बॅचच्या वितरणात घोळ आहे. परिसरातील काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी काही इंजेक्शन दाबून ठेवल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. एकीकडे रेमडीसीविर साठी वणवण फिरणारे नातेवाईक आणि दुसरीकडे ते दाबून ठेवणारे लोक, ही परिस्थिती विदारक आहे. प्रशासकीय यंत्रणा हे ब्लॅकमेलिंग रोखू शकते काय किंवा तशी त्यांची मानसिकता आहे काय हा खरा प्रश्न आहे.
सद्य परिस्थितीत रेमडीसीविरचे वितरण अन्न व औषधे प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसराची रोजची मागणी पंधरा हजार इंजेक्शनची असून, पुरवठा मात्र जेमतेम सात साडेसात हजार इतकाच होतोय. इंजेक्शनची नवीन बॅच येत्या दोन दिवसात बाजारात येईल. त्यानंतर तरी रुग्णांना वेळेत आणि योग्य पद्धतीने वितरण होईल अशी केवळ आशाच सामान्य लोक व्यक्त करू शकतात. बाकी या सामान्यांच्या हातात काही नाही.
————————————