आमदार महेशदादा लांडगे पिंपरी चिंचवड शहरवासीयांना घाबरवत आहेत काय?
गत वर्षी याच कालावधीत आपण कोरोनाच्या विळख्यात सापडून बाहेर पडण्यासाठी चाचपडत होतो. आता तर परिस्थिती उलट जादा बिघडली आहे असे म्हटले तरी चालेल. एकीकडे रेमडीसीविरचा तुटवडा, दुसरीकडे संपणारा ऑक्सिजन, असंवेदनशील अन्न व औषधे प्रशासन, वेठीस धरल्यासारखे करणारे आडमुठे आणि कोणाच्यातरी सांगण्यावरून यंत्रणेला त्रासात पाडणारे पुरवठादार, हताश आणि हतबल रुग्ण व त्यांचे नातेवाईक ही आजची परिस्थिती आहे. गत वर्षी केवळ खाण्यापिण्याची लढाई होती, आज मात्र जीवन मरणाचे युद्ध सुरू झाले आहे. या जीवन मरणाच्या लढाईत सगळीकडूनच सामान्य माणसाचे हाल होताहेत. कोरोनाने मेलो नाही तर बेरोजगारी, उपासमारी, महागाईने मरू, थोडक्यात काय तर मरण अटळ आहे, हे निश्चित! असेच या सामान्य जनांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनमुळे लॉक झालेल्या सामान्य कष्टकरी, कामगार, मजूर, घरकाम करणारे, पथारीवाले, फेरीवाले, टपऱ्यावाले आदी हातावर पोट असणाऱ्यांचे खरे हाल सांप्रतच्या काळात होत आहेत. आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील किंवा कोणत्याही शहरातील लोकप्रतिनिधी ज्या लोकांच्या मतांवर निवडून येतात ती ही लोकं आहेत. कोरोनाने बाधित रुग्ण तर अडचणीत आहेतच, त्याहीपेक्षा ही लोकं जास्त अडचणीत आहेत. शासकीय स्तरावर या समान्यजनांसाठी निधी मंजूर केला गेला आहे, पण तो निधी या मंडळींपर्यंत पोहोचविणारी यंत्रणाच कोरोनाबधित झाली आहे. कोरोना रुग्णांना मृत्यूच्या दारात नेणाऱ्या अभावांना तोंड देण्यात शासकीय यंत्रणांची दमछाक होते आहे. या अशा अपात्कालीन विदारक परिस्थितीत आमचे लोकप्रतिनिधी मात्र या शासकीय यंत्रणांना फुकटचे सल्ले देण्यातच आघाडीवर आहेत. त्यातही जनतेला भिती दाखविण्याचे काम हि लोकप्रतिनिधी मंडळी करीत आहेत आणि या भीतीने सगळ्यात जास्त घाबरणार आहेत ती या लोकप्रतिनिधींचे हक्काचे मतदार असलेली ही सर्वसामान्य जनता.
मंगळवार दि. २० एप्रिल रोजी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी एक चित्रफीत म्हणजेच व्हिडीओ जारी केला. या चित्रफितीत शहरातील कोरोना रुग्ण कसे मरणाच्या दारात आहेत आणि त्यामुळे मी किती हवालदिल झालो आहे, हे आपल्या आवाजात कातरता आणून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. फार मोठी आपत्ती निर्माण झाली असून आता शहर धोक्यात आले आहे, असेही महेशदादांनी या चित्रफितीत सांगितले. काही केले नाही तर, कित्येक रुग्ण मृत्युमुखी पडतील असाच या चित्रफितीचा आशय होता. त्यानंतर सकाळी महेशदादांच्या प्रसिद्धी यंत्रणेतून रात्री महेशदादांनी कसा ऑक्सिजनचा टँकर पकडला आणि शहराची ऑक्सिजनची गरज भागवून या शहराचे ते तारणहार झाले याचे रसभरीत वर्णन करणारे वृत्त प्रसिद्धीस देण्यात आले. त्याचबरोबर आपल्या आमदारनिधीतून एक कोटी रुपये शहराच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी खर्च करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करणारे पत्रही प्रसिद्धीस दिले.
खरं म्हणजे आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांची टीम कायम आपण कसे भव्यदिव्य आणि आगळेवेगळे आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असते. त्याच जोडीने त्यांची प्रसिद्धी यंत्रणा इतकी चलाख आहे, की कसली आणि कशी प्रसिद्धी मिळवायची याचे गणित त्यांना पक्के माहीत झाले आहे. शिवाय जागा भरण्याच्या चक्रात अडकलेली मुद्रित आणि दृक्श्राव्य प्रसिद्धी माध्यमे या लगेच वापरता येणाऱ्या म्हणजेच “रेडी टू ईट” मजकुराला प्रसिद्धी देऊन मोकळे होतात. या सगळ्या प्रकारात आपण शहरवासीयांना घाबरवून सोडतो आहोत, याचे भानही या प्रसिध्दी माध्यमांना राहात नाही. त्यावर कडी म्हणजे महेशदादांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्र जणू ते एक कोटी रुपये महेशदादांच्या खिशातून खर्च होणार आहेत, अशा अविर्भावात या माध्यमांनी प्रसिद्ध केले.
पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांची टीम मोठमोठ्या थड्या, व्हिजन, मैदाने अशा अनेक “इव्हेंट” करण्यात कशा वाकबगार आहेत, हे अख्ख्या शहराने वेळोवेळी पाहिले आहे. त्यासाठी शहरातील खाजगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीचा म्हणजेच सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फंड किंवा सीएसआर फंड या कंपन्यांच्या बोकांडी बसून कसा खुबीने मिळविता येतो, हेही त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. त्यांचे हे कर्तृत्व पाहता एकटे महेशदादा पिंपरी चिंचवड महापालिकेला एखादा ऑक्सिजन प्लांट उभा करून देऊ शकतात. याउप्पर जाऊन महापालिकेत ऐंशीपेक्षा जास्त नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या भाजपचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि निवडणुकीत कोट्यावधी खर्चून निवडून आलेले आणि आपल्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून पाच दहा लाख रुपये खर्च करू शकणारे पन्नास तरी नगरसेवक सध्या भाजपकडे आहेत. या शहरातील नागरिकांसाठी स्वतःच्या खिशातील रक्कम खर्च करूनही एकदा ऑक्सिजन प्लांट उभा करता येऊ शकतो. अर्थात अशी स्वतःच्या खिशाला चाट देण्याची दानत मात्र हवी, ती महेशदादा आणि त्यांच्या भाजपमध्ये आहे काय हे तपासून पाहायला हवे. आता तुम्ही मरणारच आहात, अशी भीती पसरवून शहर हवालदिल करणे आणि त्यानंतर मीच कसा तुमचा तारणहार आहे, हे दाखवणे जर त्यांना जास्त महत्त्वाचे वाटत असेल तर त्याला आमचाच नव्हे तर कोणाचाही नाईलाज आहे.
––——————————————