महापालिका, आयुक्त, आम्ही आणि लायकी!

नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्त राजेश पाटील यांनी शहराच्या लायकीचा उल्लेख केला. सांडपाण्याच्या पुनःवापराच्या मुद्यावरुन आयुक्त पाटील यांनी आपल्या वैदर्भीय बोलरीतीस अनुसरून (नगरसेविका सिमा सावळे यांनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नका अशी उगाच मल्लिनाथी का केली, हे कळले नाही.) लायकी या शब्दाचा उच्चार केला. त्यांचे हे वैदर्भीय भाषण ऐकताना आम्हालाही एक सनातन प्रश्न अक्षरशः पडला. खरोखरच स्वतःला मेट्रोपोलिटीयन समजणाऱ्या आम्हा शहरवासीयांकडे किती आणि कसली लायकी आहे? किंबहुना आम्ही नालायकच आहोत काय? आता कोणी म्हणेल, की यांना वेड लागलंय, पण खरेच आयुक्तसाहेब, आमच्या लायकीचं हे कोडं थोडंस गुंतागुंतीचंच आहे.

त्याचं असं आहे, की यापूर्वी अनेकांनी आमच्या लायकीला तिचा उच्चार न करता अनेकदा चव्हाट्यावर मांडलं आहे. तुम्ही फक्त तिचा उच्चार केला एव्हढंच! यात सगळ्यात अग्रेसर आहेत ते आमचे राजकारणी! कोणताही प्रकल्प हाती घेताना हे राजकारणी लोक शहरवासीयांचा विचार करीत नाहीत हा आत्तापर्यंतचा पायंडा आहे. करण आम्हाला काय हवं आहे हे कळण्याची आमची लायकीच नाही. त्यामुळे दूरगामी वगैरे विचार करून हे बिच्चारे राजकारणी शहरात नवनवे प्रयोग करीत असतातच. आता त्यातून त्यांच्या काही बगलबच्च्यांना चार पैसे कमावण्याची संधी आपोआप मिळते, त्याला ते तरी काय करणार? शिवाय या मंडळींना निवडणुका लढवायच्या असतात, त्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा ही बगलबच्चे मंडळींच उभे करून देतात. याबरोबरच निवडणूकनिधी उभा करण्यासाठी काही कामं काढावी लागतात, अर्थात लायकी नसलेल्या या शहरवासीयांना त्यामुळे ‘विकास’ पाहायला मिळतो हा मूळ उदात्त वगैरे हेतू असतोच.

याची सगळ्यात स्पृहणीय उदाहरणे म्हणजे घरकुल, सिमेंट रोड, बी आर टी, स्मार्ट सिटी, यांत्रिक सफाई, शहराचे दोन भाग करून काढण्यात आलेल्या कचऱ्याच्या निविदा, सात कोटींचा पादचारी पूल, व्हिजन अमुकतमुक, स्काडा, २४/७ पाणीपुरवठा आणि अशी कितीतरी! शहरवासीयांनी यातली एकही बाब स्वतःहून मगितलेलं नाही. कारण आमची ती लायकीच नाही. तरीही इथल्या राजकारण्यांनी आम्हाला उदात्त हेतूने हे सर्व देऊ केले आहे. पण या शहरातील आम्हा नालायक लोकांना त्यात टेंडर, टक्केवारी दिसते, त्याला हे  बिच्चारे राजकारणी तरी काय करणार? शिवाय हे असले शहारवासीयांच्या भल्याचे वगैरे प्रकल्प राबविताना आपला सल्ला गार करून विकणारे काही सल्लागारही त्यामुळे रोज गार कर्ते होतात! त्यातही आम्ही नालायक शहरवासी त्यांच्या नावाने बोटे मोडतो.

हाच प्रकार इथल्या प्रशासनाचा! राजकारण्यांनी उदात्त हेतूने आणलेल्या या प्रकल्पांना उदात्त हेतूने पूर्ण करण्यासाठी गार सल्ला घेऊन इथले अधिकारी तत्परतेने कार्यप्रवण होतात. तर आम्ही नालायक शाहरवासी उगाचंच त्यांना उपोषण, मोर्चे, माहिती अधिकार, पी आय एल अश्या अनेक धमक्या देतो. आता हेच चालू मंदलीचे उदाहरण पहा. पाण्याचा पुनर्वापर ही एक चांगलीच गोष्ट आहे. पण आम्हा नालायक शहरवासीयांना त्यात उगाचच बंद पाईपलाईन, चार वर्षांपासून चालू असलेली स्मार्ट सिटी, सर्वत्र खोदलेले रस्ते, कचऱ्याचे ढीग वगैरे फालतू गोष्टीच दिसतात.

त्यामुळे आयुक्तसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका! या आम्हा नालायक शहारवासीयांच्या कच्छपी मुळीच लागू नका! तुम्हाला हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचंय हे ध्यानात ठेवा. आम्ही नालायकच आहोत. ही सर्व ” सबका साथ, सबका विकास ” पाठडीतली कामं अजिबात बंद पडू देऊ नका. भले रेंगाळत का होईना, पण ही कामं कराच! आता आमची लायकी तुमच्या हातात!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×