आयुक्तांनी आमचा कलेक्टर घालवला, परत देता का?

गेले दोन महिने चालू असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेतील बदल्यांचे सत्र, या आठवड्यात थोडेसे शांत झाले आहे. मात्र, आता अनेक विभागातील अनेक मंडळींपुढे एक नवाच प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे अनेक विभागांचे कलेक्टर बदलल्यामुळे अनेक विभागांचे कलेक्शनचे काम ठप्प झाले आहे. नवीन कलेक्टर शोधून त्याला पुन्हा सगळे शिकवायचे, यासाठी वेळ लागणार आहे. मग आपले उत्पन्न कसे होणार यावर सध्या अनेक विभागात खल चालू झाले आहेत. नवीन कलेक्टर नेमण्यापेक्षा जुनाच परत आणता येतो काय, याची चाचपणी करण्यासाठी अनेक विभागप्रमुख आणि त्यांचे डावेउजवे सांप्रतला महापालिकेच्या प्रशासन विभागात चकरा मारताहेत. अशाच एका कलेक्शनची “रास” तयार “कर”णाऱ्या महाभागांची बदली रद्द व्हावी म्हणून रदबदली करण्याचे प्रयत्न चालू आहेत. साधा संगणक चालवणारा हा महाभाग संपूर्ण विभाग चालवत होता काय, अशी शंका येण्याइतपत ही बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न होतो आहे. या संबंधित विभागाने चालवलेला हा “रामहरी” चा धावा आयुक्तांच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून अनेक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्याही प्रशासकीय विभागाचा कलेक्टर बदलला, की त्या विभागाला किती अडचणींना तोंड द्यावे लागते, याची कल्पना येण्यासाठी प्रथमतः विभागाचा कलेक्टर ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी हा साधा समज असलेल्या लोकांसाठी हे समजणे महत्वाचे आहे. कोणत्याही आकारबंधात नसलेले हे पद, प्रत्येक विभागात अस्तित्वात असते. नियमानुसार नसलेले हे पद धारण करणारा व्यक्ती त्या विभागासाठी कोणत्याही इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष असतो. आपल्या विभागात उद्योग घेऊन येणारा सामान्य नागरिक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, इतर विभागाचे प्रतिनिधी अगर आणखी कोणी यांचे उद्योग वेळेत आणि त्यांना हवे तसे करून देण्याची आणि त्यासाठी प्रचलित दराने वसूल करून हे वरकमाईचे “कलेक्शन” विभागातील प्रत्येकाला वकुबाप्रमाणे वाटप करण्याची जबाबदारी या कलेक्टरला पार पाडावी लागते. कायद्याने नसलेले आणि फायद्यात असलेले हे प्रत्येक विभागातील पद, त्या विभागातील लोकांच्या वरकमाईचा मुख्य स्रोत असतो. असे हे महत्त्वपूर्ण पद धारण करणाऱ्या व्यक्तीची बदली कोणत्याही विभागासाठी किती हानिकारक असते, हे या उहापोहानंतर लक्षात येऊ शकेल.

हा असा हानिकारक प्रकार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बहुतेक सर्वच विभागात केल्यामुळे, आपले कलेक्टर गमावलेल्या मंडळींचे हात बांधल्यासारखे झाले आहे. या कलेक्टरवर अवलंबून असणाऱ्यांची गोची झाली आहे. या गोची झालेल्या लोकांमध्ये ज्यांचा समावेश होतो, त्यांची जंत्री पाहिल्यावर आयुक्तांनी केलेल्या या बदल्या किती, किती मंडळींना त्रासदायक ठरल्या आहेत, याचे प्रत्यंतर येते. ज्या विभागाचा कलेक्टर बदलला, त्या विभागातील लोकांची गोची तर झालीच, याशिवाय राजकारणी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, माहिती अधिकार गाजवणारे आणि वाजवणारे, पत्रकार या सर्वांचीही गोची झाली आहे. कलेक्टरच नाही, म्हणून कलेक्शन नाही आणि कलेक्शन नाही म्हणून वाटप नाही, अशी परिस्थिती सध्या अनेक विभागात निर्माण झाली आहे.

तर, अशाच एका कायद्याने संगणक चालक असलेल्या आणि कलेक्टरची जबाबदारी पार पडणाऱ्या व्यक्तीची बदली रद्द व्हावी म्हणून सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठाच गहजब सुरू आहे. मोठमोठया आसामी यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदारापासून अगदी ठेकेदारापर्यंतची मंडळी आयुक्त, अतिरिक्त, सहायक यांची मनधरणी करण्याच्या आणि ही बदली रद्द करण्याचा प्रयत्नात आहेत. अगदी “कंठ निळा” होईपर्यंत “रामहरी”चा आरव करूनही बदली रद्द होत नाही म्हणून हतबल झालेली ही सर्व मंडळी आता काय उपाय शोधावा याचा विचार करीत आहेत. यासाठी काहींनी आयुक्तांशी “अतिरिक्त” बोलणी करण्याचाही मानस व्यक्त केला आहे. आता ही अतिरिक्त बोलणी फलद्रुप होते, की आयुक्त आपल्या निर्णयावर ठाम राहतात, यावर या पिंपरी चिंचवड महापलिकेतील पुढचा कारभार कसा चालेल याची अनेकांची गणिते अवलंबून आहेत. महापालिका आयुक्त ही गणिती समीकरणे बाद ठरवतील अशी अपेक्षा आहे. नक्की काय होईल हे येणार काळच ठरवणार आहे.

—————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×