पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद “त्या” तीन मर्कटांसारखा झाला आहे काय?
पंधरा वर्षे सत्तेत असतानाही, केवळ विरोधकांना नीट उत्तरे देता न आल्यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड शहरातील सत्ता गमवावी लागली. गेली सव्वाचार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाला आवश्यक संख्याबळ असतानाही निवांत, म्हणण्यापेक्षा निसुर आहे. काय करताहेत राष्ट्रवादीचे लोक सध्या? शहरात कोविड ने धुमाकूळ घातलाय, प्रत्येक शाहरवासी धास्तावलेल्या अवस्थेत आहे. हाताच्या बोटावर मोजण्यासारखी काही मंडळी सोडली तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे लोक शहर ओरबाडून स्वतःची झोळी भरण्यात मश्गुल आहेत. येत्या उण्यापुऱ्या नऊ महिन्यात महापालिका निवडणुका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात पुन्हा सत्ता आणायची आहे, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही स्थानिक नेता त्यासाठी काही करताना दिसत नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवाद त्या तीन मर्कटांसारखा झाला आहे काय असा संशय आहे. गांधीजींची ती तीन माकडे ” बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो ” असा संदेश देतात. आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तेसवरते मात्र ” कुछ मत सुनो, कुछ मत देखो, कुछ मत बोलो ” अशा निवांत अवस्थेत आहेत. आमचे “दादा” आहेत ना! ते सगळं करतील, तेच सगळं पाहतील, आम्ही फक्त निवडून यायचेच बाकी आहोत, अशी या राष्ट्रवादीच्या, सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या लोकांची मानसिकता आहे. दादांनीच सगळं करायचं, पाहायचं आणि आम्हाला पदं द्यायची, आम्ही केवळ सत्ता भोगणार अशा मानसिकतेचा या लोकांचा राष्ट्रवाद आहे.
सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहणारी ही मंडळी त्यासाठी काही करताना मात्र दिसत नाहीत. गेली सव्वाचार वर्षे सगळे शहर महापालिकेत भ्रष्टाचार होतो आहे अशी बोंब करीत असताना ही सर्व मंडळी सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून गुमान आहेत. सत्ताधारी भाजपाई देखील लाभाचे काही तुकडे यांच्यापुढे टाकून यांची गुरगुर शांत करीत आहेत आणि आपला लाभ अबाधित राहिला या भावनेने हे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणारे लाभधारक ते तुकडे चघळत निवांत आणि निसुर आहेत. कोविडग्रस्त झालेले शहर आणि हतबल झालेले शाहरवासी यांना दिलासा देणे तर दूरच, साधी चौकशी करतानाही ही मंडळी आढळत नाहीत. मग या शहरातील मतदारांनी यांना मते का द्यावीत हा खरा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या पुंगीवर माना डोलावणारी ही राष्ट्रवादी मंडळी काय करतात हे पाहून येत्या निवडणुकीत यांना आपण आपले प्रतिनिधी म्हणून का सन्मानित करावे, ही मंडळी या सन्मानायोग्य आहेत काय, असा प्रश्न मतदारांच्या मनात उभा राहिला तर वावगे ठरू नये.
पूर्वी गावोगाव तमाशे व्हायचे. या तमाशाच्या गौळणीत एक थोराड आणि बेढब पुरुष “मावशी” बनून यायचा. द्वयार्थी संवाद आणि बाष्कळ विनोद ही या मावशीची प्रमुख वैशिष्ट्ये असायची. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातही अश्या मावश्या आहेत, ज्या बाष्कळ गप्पांसाठी प्रसिद्ध आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यात या मावश्यांचा हात असल्याचे बोलले जाते. अश्या मावश्या ज्यावेळी राष्ट्रवादीच्या एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यासमोर बसून, तुमच्या पक्षाची सत्ता येणारच नाही, असे वावदूक आणि बाष्कळ बोलताना टाळीसाठी हात पुढे करतात आणि तो कार्यकर्ताही त्या टाळीला काही “वेगळाच” आवाज काढणाऱ्या टाळीने प्रतिसाद देतो, हे पाहिल्यावर ही मंडळी,सत्ता मिळाल्यावर आपल्याच नावाने टाळ्या पिटणार नाहीत ना, असा प्रश्न एखाद्या मतदारास पडला तर ते चुकीचे ठरू नये. मात्र तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे सत्ताकांक्षी लोक सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहत असतील, तर ही दिवास्वप्नेच ठरतील, हे या राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या मंडळींना कोणीतरी सांगितले पाहिजे.शहर अडचणीत असताना आणि सत्ताधारी तरीही शहराला पिळून घेत असताना आपल्या लाभाच्या तुकड्यांवर संतुष्ट असलेले हे राष्ट्रवादीचे लोक सध्यातरी “कुछ ना सुनो, कुछ ना बोलो, कुछ ना देखो” या मोडवर आहेत. या मोड आणि मूडवर असलेले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते यातून बाहेर येण्याची शाहरवासी वाट पाहात आहेत. ते तसे बाहेर येऊन सावपे व्हावेत, पुन्हा खऱ्या अर्थाने कार्यरत व्हावेत हीच शहरवासीयांची माफक तरीही योग्य अपेक्षा!
————————————