शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची डोकी ठिकाण्यावर आहेत काय?
पिंपरी (दि. २९/०४/२०२१)
दररोज शेकड्याच्या जवळपास रुग्ण कोविडने मारताहेत, दोन हजारांच्या दरम्यान रोज नवे कोविड बाधित सापडताहेत, महापालिका प्रशासन आपली सर्व कामे बाजूला ठेवून कोविडग्रस्तांच्या गरजा भागविण्यासाठी झटताहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग मात्र आपले राजकीय हितसंबंधी ठेकेदार, पुरावठादारांचे उखळ पांढरे करण्यात आपला वेळ आणि महापालिकेचे पैसे उधळत आहेत. रोज नवनवीन फतवे काढून ठेकेदार, पुरावठादारांना कोट्यावधीचा मलिदा वाटणाऱ्या या विभागांची डोकी ठिकाण्यावर आहे काय? असा सवाल पिंपरी चिंचवड शहरवासीयांकडून विचारला जात आहे.
एका बाहुबली आमदाराच्या नातेवाईकाला माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. तर, अशाच एक राजकीय हितसंबंधी मेट्रो एंटरप्रायजेस या कंपनीचे व्यायाम साहित्य प्राथमिक शाळांच्या आवारात लावता येण्याची शक्याशक्यता तपासून पाहून तास अहवाल तयार करण्याचा आदेश महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या सहीचा हा आदेश असून, या आदेशान्वये शिक्षण समितीने दि. ०४/०२/२०२१ रोजी मंजूर केलेल्या ठरावानुसार प्रत्येक प्राथमिक शाळेत खुली व्यायामशाळा तयार करायची आहे. त्यासाठी मेट्रो एंटरप्रायजेस चे दरपत्रक प्राप्त झाले असून त्यानुसार खुल्या व्यायामशाळेत (Open Jim) कोणते साहित्य बसवता येईल, कोठे बसवता येईल याचा अहवाल शाळा पर्यवेक्षकांनी पाच दिवसात सादर करायचा आहे.
खुल्या व्यायामशाळेसाठी अशी कोणतीही निविदा प्रक्रिया पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने राबविलेली नाही, अशी खात्रीशीर माहिती आहे. मग कोणतीही निविदा अगर दरपत्रक, कोणत्याही विभागाने परस्पर मागवायचे नाही, असे आयुक्तांचे सक्त आदेश असताना शिक्षण विभागाकडे दरपत्रक कोठून आले? हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना ठेकेदार, पुरावठादारांकडून मिळणाऱ्या मालिद्याचा काही भाग वाटून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा शिक्षण विभागाचा आतबट्ट्याचा व्यवहार सर्वश्रुत आहे. त्यातूनच न्यायालयीन बडगा वापरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बोकांडी बसणारे ठेकेदार, पुरवठादार महापालिकेला नवीन नाहीत. यापूर्वीही शाळा बंद असताना या ठेकेदार, पुरवठादारांनी शिक्षण विभागाशी संगनमत करून, गणवेश, स्वेटर, वह्या, स्वाध्याय पुस्तिका असे साहित्य शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या उरावर बसून स्वीकारण्यास भाग पाडले आहे. आता हा एक नवीन सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुल्या व्यायामशाळेचा फंडा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सुरू केला आहे. शहराच्या प्राथमिकता आणि आवश्यकता यांचे काहीही घेणेदेणे नसलेल्या या विभागांना पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील का पायबंद घालीत नाहीत, हे शहराला अनाकलनीय आहे.
——————————————–