गालिब जिंदगीभर एकही गलती बार बार करता रहा, धूल चेहरेपर थी, आईना साफ करता रहा!
आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, आत्मसंतुलन, आत्मनियमन, आत्मविवेचन असे, आत्म म्हणजे स्वतःबद्दल सतत काही संशोधन करीत राहणे, ही भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्या, नेत्यांची तशी जुनी सवय आहे. आपले आत्म किती सुखरूप आणि सुगठित आहे,त्याला इतर कशाची लागण तर झाली नाही ना, हे सातत्याने तपासण्याची गरज भाजपच्या नेत्या, कार्यकर्त्यांना का असते याबद्दल कोणतीही चर्चा करण्याचा कोणालाही, कोणताही अधिकार नाही. कारण कोणत्याही व्यक्तीने आपले आत्म म्हणजेच स्वत्व किती आणि का तपासावे हे ज्याचे त्याचे मानव्य आहे. हे थोडंस जड झालं. आता सोपं करून. याचा साधा अर्थ असा की, आत्मशी संबंधित सर्वकाही म्हणजे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, आत्मसंतुलन, आत्मनियमन, आत्मविवेचन हे आरएसएसशी संबंधित भाजपईंचे संशोधन करण्याचे कर्तुमअकरतुम कार्य, केवळ भाजपची मक्तेदारी आहे.
हे एव्हढं जडजंजाळ भाषेतील विवेचन का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर या विवेचनाचे कारण म्हणजे काल दि.०७ मे रोजी पिंपरी चिंचवड शहराच्या भाजपच्या महापौर माई ढोरे यांच्या महापालिकेतील कक्षात भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची झालेली बैठक. या बैठकीसाठी आजीमाजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते,काही पदाधिकारी आणि ज्येष्ठ नगरसेवक उपस्थिती होते. आपला म्हणजे भाजपचा शहरातील गेल्या सव्वाचार वर्षातला कारभार, फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका, शहरातील कष्टकरी, कामगार, झोपडवासी यांना महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे तीन हजार रुपयांचे अनुदान, पालिकेत भाजपचा झेंडा फडकावण्यासाठीचे नियोजन अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रशासनातील आयुक्तांसह इतर प्रमुखांना बोलावून प्रशासकीय पातळीवर भाजपची प्रतिमा सुधारण्याचा कार्यक्रम देण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन या प्रतिमा सुधार कार्यक्रमात कितपत यशस्वी होईल, भाग थोडासा अवघडच आहे.
भारतीय जनता पक्षाच्या गेल्या सव्वाचार वर्षाची कार्यपद्धत पहिली असता, येत्या सहा महिन्यात भाजपची प्रतिमा सुधारण्यात महापालिका प्रशासनाला राजकीय हस्तक्षेपाशिवायचा कारभार करावा लागेल. मात्र, ते कितपत शक्य आहे, याबाबत खरे म्हणजे भाजपच्या शहरातील नेतृत्वाने आत्मपरीक्षण करून तपासले पाहिजे. संडास धुण्यापासून ते पूल बांधण्यापर्यंतच्या प्रत्येक कामात आपल्याला आणि आपल्या बगलबच्च्यांना किती आणि कसा वाटा मिळेल, यासाठी काहीही करण्यात धन्यता मानणाऱ्या शहरातील भाजपाईंना आता आत्मचिंतन करून प्रतिमा सुधार कार्यक्रमाला कितपत गती मिळेल, हे सांगणे तसे अवघडच आहे.
सुरुवातीपासून आत्मसंतुलन साधून, सबुरीने काम केले असते, तर या प्रतिमा सुधार कार्यक्रमात काहीतरी यश मिळणे शक्य होते. अर्थात, महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याच्या नादात हे जरा राहूनच गेले. आता हे राहून गेलेले काम पूर्ण करण्यासाठी जे आत्मनियमन करावे लागते, ते करण्याची सवय इथल्या भाजपाईंना राहिली आहे काय? हा अलाहिदा प्रश्न उपस्थित होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून हा प्रतिमा सुधार कार्यक्रम सुरू झाला असेल, तर त्यासाठी शहरातील भाजपाईंकडे अवघे सहा महिने शिल्लक आहेत. कारण शेवटचे तीन महिने कोणीही कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल. महापालिकेच्या तिजोरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी निवडणूक जिंकवी लागेल, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा निवडून येण्यासाठी जिथून निवडून येणे शक्य आहे, तिकडे उड्या मारणे, वॉर्ड रचना बदलली तर, ती तशी बदलणारच आहे, गणिते जुळवणे, जुने जड झालेले कार्यकर्ते बदलून नवीन कार्यकर्ते तयार करणे या आणि अशा बाबींसाठी प्रत्येक नगरसेवकाला वेळ द्यावा लागणार आहे.
पुन्हा महापौर कक्षातील त्या बैठकीबाबत. त्या बैठकीतील आठ दहा डोक्यांपैकी केवळ तीन डोकी मूळ भाजपाईंची होती. बाकी सगळे इकडून तिकडून गोळा झालेले होते. आरएसएस च्या मुशीत तयार झालेल्या भाजपाईंना आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, आत्मसंतुलन, आत्मनियमन, आत्मविवेचन या कर्यक्रमांची सवय आहे. बाकीच्यांना हे आत्म संबंधी लफडे पाचविणे थोडेसे अवघडच आहे. त्यामुळे या प्रतिमा सुधार कार्यक्रमात कितपत यश मिळेल, हे जरा संशयास्पद आहे. त्यातही झोपलेल्या किंवा झोपेचे सोंग घेतलेल्या विरोधी पक्षाला चुकून जाग आली आणि त्यांनी सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, तर हा अवघडपणा अजून वाढीस लागेल.
अर्थात प्रतिमा सुधारण्याचा हा कार्यक्रम राबविताना पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाईंना आपल्या यापूर्वीच्या आतबट्ट्याच्या आणि हडेलहप्पी कार्यपद्धतीचा त्याग करावा लागेल. तो करण्याची कितपत तयारी अगर संधी या भाजपाईंना मिळेल हे काळच ठरविणार आहे. प्रतिमा सुधारण्याच्या या कार्यक्रमात शहरातील भाजपाई नेते, नगरसेवक, कार्यकर्ते नक्की काय करताहेत आणि शहारवासीयांच्या ते कितपत पचनी पडेल, हा एक वेगळाच प्रश्न आहे. महान शायर गालिब यांचा एक प्रसिद्ध शेर आहे. ” गालिब जिंदागीभर एकही गलती बार बार करता रहा, धुल चेहरेपर थी, आईना साफ करता रहा!” शहरातील भाजपाई नेते, नगरसेवक, कार्यकर्ते केवळ आरसा स्वच्छ करून चेहरा स्वच्छ झाल्याचा आव आणून आत्मसंतुष्ट होणार असतील, तर या मंडळींची ती आत्मवंचना ठरून राजकीय आत्महत्त्येची पाळी यांच्यावर येईल हे निश्चित!
–—————————————