अजितदादा बंडोबा ठरणार की थंडोबा?

नुकतेच पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजितदादा पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर नव्याने संसार थाटला. “प्रसंगी अविवाहित राहू, पण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी बरोबर विवाह नाही!” अशी गर्जना करणाऱ्या भाजपाई उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रवादीतुन बंडाळी करून बाहेर पडलेल्या अजितदादांबरोबर अनैतिक समागम केला. हा समागम अनैतिक अशासाठी की, अजूनही या संबंधाला पूर्ण मान्यता मिळालेली नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही शिवसेना नक्की कोणाची याचा संभ्रम असतानाच, राष्ट्रवादी नक्की कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची हा नवा संभ्रम राज्यातील सामान्य मतदारांपुढे उभा ठाकला आहे. कोण कोणाच्या नेमणुका करताहेत आणि कोण कोणाला पक्षातून काढून टाकताहेत हे आकलनाच्या पलीकडे गेले आहे. राष्ट्रवादीचा हा घोळघोटाळा करून अजितदादा भाजपच्या कच्छपी लागले.

अजूनही आपल्याकडचा आमदारांचा नक्की आकडा सांगता न येणारे अजितदादा बंडकरी तर झाले, पण या बंडाचे आणि आपल्याबरोबर आलेल्या लोकांचे भवितव्य काही आज त्यांना सांगता येईना. अजितदादांची आजवरची कारकीर्द आणि स्वभाववैशिष्ट्ये पाहता एव्हढा कच्चा आणि  बेभरवशाचा खेळ त्यांनी का केला असावा हेही अनाकलनीयच आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आणि अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार सोडले, तर आपल्याबरोबर किती आमदार आहेत, हे अजूनही म्हणजे शपथ विधीला दोन दिवस होत असतानाही स्पष्ट करणे अजितदादांना शक्य झालेले नाही. राजभवनात शपथविधीला हजार असलेले राष्ट्रवादीचे काही आमदार आम्ही इथे का आलो, हे स्पष्ट सांगू शकलेले नाहीत. खासदार अमोल कोल्हे यांनी तर आपण शरद पवार साहेबांबरोबरच असे समाज माध्यमांद्वारे सांगून टाकले आहे.

शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीतील ही फूट अगर बंडाळी भाजपने घडवून आणली खरी, मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा मूलभूत फरक आहे, याचा विसर समस्त भाजपाईंना पडला असावा. शरद पवार यांच्याकडे उभा महाराष्ट्र राजकारणातील खेळीया म्हणून पाहतो आहे तर, उद्धव ठाकरे यांना राजकारणातील खेळ्या कळतच नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. राजकारणात विविध प्रयोग करण्यात हातखंडा असलेल्या शरद पवारांशी भाजपाईंनी पंगा घेतला आहे. मात्र, शरद पवारांना देखील राष्ट्रवादीतील ही फूट थांबवता आलेली नाही. राजकारणात कधी काय घडू शकते, अगर काय घडवायचे आहे, याचे ठाम भान असलेला नेता म्हणून नावलौकिक असलेल्या साहेबांना या नादान बंडाळीचे निदान करता आले नाही, हे महत्त्वाचे!

आता ही बंडाळी नादान अशासाठी की, अजितदादा आणि त्यांचे बंडातील साथीदार यांनी कोणाचीही आणि कशाचीही पर्वा केलेली दिसत नाही. केवळ आणि केवळ स्वतःच्या पायापूरते पाहून आणि ईडी, सीबीआय, आयकर, एसआयटी या प्रकाराला घाबरून या मंडळींनी ही बंडाळी घडवून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूलभूत विचारांना आणि धोरणांना तिलांजली देऊन या बंडोबांनी कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा प्रकार केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातील कोणत्याही स्तरावर मोठा गोंधळ होणार आहे. आतापर्यंत नीती आणि धोरणांमुळे एकमेकांच्या विरोधात काम करणारे आणि कार्यक्रम घेणाऱ्यांचा या राजकीय उलथापालथीमुळे पुरता “कार्यक्रमच” होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×