भाजपने सवत रंडकी व्हावी म्हणून नवराच मारला!

आपली सवत नवऱ्याला जास्त आवडू लागली, नवरा तिच्या मुठीत जाईल की काय, ही भीती सतत सतावत असलेल्या शंकेखोर बाईसारखी भाजपची एकूणच अवस्था झाली आहे. मग सवतीला त्रास व्हावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या करण्याचा प्रकार भाजपने करून पाहिला. मात्र तरीही सवत बधत नाही, किंबहुना ती नवऱ्याला जास्तच प्रिय होऊ लागली हे पाहून दोलायमान झालेल्या भाजपने शेवटी सवतीचं कपाळ पांढरं व्हावं म्हणून चक्क नवऱ्यालाच मरून टाकण्याचा प्रकार घडवून आणला आहे. विशेष म्हणजे नवरा मारण्याच्या या षडयंत्रात यांनी चक्क सवतीच्या पोऱ्यालाच सामावून घेण्याचा यशस्वी कावा भाजपने केला. मात्र, या सवतीच्या दुस्वासापायी आपण आपलेही कपाळ पांढरे करून घेतले, याचे भान भाजपला राहिलेले दिसत नाही.

महाराष्ट्र देशी लोकप्रिय होत असलेली महाविकास आघाडी, किंबहुना, राष्ट्रवादी पक्ष मतदारांच्या मनाला भावतो आहे, ही समस्त भाजपाईंची मोठी भीती. म्हणूनच राष्ट्रवादीला शिवसेनेप्रमाणेच अडचणीत आणण्यासाठी भाजपने पुन्हा नव्या पटांगणावर जुनाच खेळ करून राष्ट्रवादी फोडली. सतत सत्ताकांक्षी असलेले राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना गळाला लावून भाजपने गोटात घेतले. “प्रसंगी अविवाहित राहिलो तरी चालेल, पण राष्ट्रवादीशी संसार करणार नाही!” अशी मल्लिनाथी कोरड्या घशाने करणाऱ्या देवेंद्रजींनी स्वतः खपून अजितदादा खपवले. मात्र हे सगळे करताना आपले भवितव्य काय, आपले कपाळ तर पांढरे होणार नाही ना, याचा विचार देवेंद्रजींनी केलेला दिसत नाही. अजितदादा यांना शिंदे – भाजपच्या मंत्री मंडळात स्वतःला समकक्ष पद देऊन यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड हाणली आहेच, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गच्छंतीही निश्चित केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता शाबूत ठेवायची या सोसापायी पछाडलेले समस्त भाजपाई ज्या जनता जनार्दनाच्या नावाने सत्तेचं कुंकू लावतात, त्या जनता जनार्दनाचाच वैचारिक खून या घटनेने झाला हे नक्की! 

अजितदादा पवार आणि त्यांच्यासारखेच ईडी, सीबीआय, आयकर, एसआयटी यांनी धास्तावलेले आणि आपले आजचे भागवावे म्हणून भाजपच्या कच्छपी लागलेले लोक बरोबर घेऊन भाजपने शिंदे गटाची गरज संपल्याचे स्पष्ट केले आहेच. कदाचित अजितदादा पवार उद्या म्हणजे येत्या काही काळात मुख्यमंत्री झाले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसावे. कारण पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याची मोडस ऑपरेंंडी भाजपची आहेच. म्हणजे साप मेला तर वाहवा, काठी मोडली तर पाव्हण्याची, आपले नुकसान नको, असा हा प्रकार आहे. मात्र, या सत्ता समावेशाने भाजपची एकंदर छबी सुधारणार की आणखी बिघडणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या नाट्याचे पडसाद स्थानिक पातळीवर काय आणि कसे उमटतील हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. कालपर्यंत भाजपला शिव्या देणारे राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते आता अजितदादाच भाजपच्या ढाबळीत दाखल झाल्यावर, भाजपचे गुणगान कसे करतात हे गंमतीदार दिसणारे दृश्य पाहण्यास जनसामान्य उत्सुक आहे.

त्याहीपेक्षा जास्त गंभीर आणि तरीही गंमतीदार परिस्थिती यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या महाभागांची होणार आहे. अजितदादांच्या त्रासाला कंटाळून, अजितदादांना भ्रष्टाचारी ठरवून, ते एकाधिकारशाहा आहेत असे दर्शवून भाजपच्या पंखाखाली दडलेल्या उभ्या महाराष्ट्रातल्या समस्त जनांची अवस्था मोठी केविलवाणी होणार आहे. पुन्हा इथेही अजितदादाच ही त्यांची अवस्था मोठी विचित्र होणार आहे. त्याहीपेक्षा विचित्र अवस्थेत असतील ते, भाजपच्या पाठबळावर अजितदादांना अंगावर घेणारे आणि आपल्याशिवाय अजितदादांना अडथळा निर्माण करण्याचे धारिष्ट्य दुसऱ्या कोणात नाही, असे उर बडवून सांगणारे, यांची! आता अजितदादांच्या विरोधात केलेल्या हाकाटीचे पर्यावसान कशात आणि कसे होईल, या भीतीने ग्रासलेले महाभाग पाहणे आणि त्याची अवस्था समजावून घेणे मोठे मजेशीर ठरणार आहे.

शेवटी सगळ्यात मोठी गंभीर बाब म्हणजे राष्ट्रवादीची सरशी पाहून शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीलाही गोत्यात आणण्याचा हा भाजपाई प्रयत्न सर्वसामान्य मतदारांच्या पचनी कितपत पडतो, हे पाहणे गरजेचे. आगोदरच शिवसेना फोडल्याचे फळ माथी असताना आता राष्ट्रवादी फोडण्याचे खापर भाजपला काय किंमतीला पडेल किंवा, ज्यांनी सत्ताकांक्षी होऊन भाजपच्या ढाबळीत जाणे पसंद केले त्यांचे भवितव्य काय हे येत्या काळात स्पष्ट होईलच!

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×