नितीन गडकरी म्हणतात, “लोकहितां मम करणीयम!”आणि हे काय करताहेत?

नितीन गडकरी! भारतीय जनता पक्षातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व! प्रसंगी आपल्या पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनाही खडे आणि खरे बोल सुनावण्यात त्यांनी कधी बिचकून मागे पाहिले नाही. कारण अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांची सुरुवात झाली. त्यामुळे जमिनीवरचे प्रश्न आणि त्यासाठी काय करावे लागते, याची जाण त्यांना आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूरच्या काही नेत्या, कार्यकर्त्यांशी दूरसंचार माध्यमातून संवाद साधला. कोरोनाची एकंदर परिस्थिती आणि नेत्या, कार्यकर्त्यांचा कार्यकारण भाव याबद्दल त्यांनी या संवादातून चर्चा केली. प्रसिद्धिलोलुपता, बडेजाव टाळून लोकहितासाठी काम करण्याचा संदेश या वार्तालापातून त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांना दिला. “लोकहितां मम करणीयम” म्हणजेच माझे प्रत्येक कार्य हे लोकहीतासाठीच असले पाहिजे, हे त्यांचे विचार!

नीती गडकरींचे हे विचार ऐकल्यानंतर, सहज पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल काय, असा विचार मनात आला. “लोकहितां मम करणीयम” या गडकरींंच्या वाक्याचा या शहरातील भाजपाईंचा अर्थ “ममहितां मम करणीयम” आहे काय? असे वाटते. काही नेते, पदाधिकारी तर हे शहरच स्वतःच्या हितासाठी वेठीस धारताहेत काय, असा संशय निर्माण होतो. शहरात घडणाऱ्या प्रत्येक बदलात आपला धंदा पाहण्याचे या मंडळींचे प्रयत्न असतात. महापालिकेचे संडास बांधण्यापासून ते अगदी एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या गृह अगर व्यापारी संकुलापर्यंत प्रत्येक बाबीत आपले, आपल्या बगलबच्च्यांचे उखळ कसे पांढरे होईल, याचा विचार सध्या पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई करताना दिसतात. अर्थात, प्राकृतिक नियमांप्रमाणे काही भाजपाई अपवाद आहेतच, पण ती संख्या फार कमी आहे. लोकहिताचे राजकारण अगर सोशल पॉलिटिक्स या आता पिंपरी चिंचवड शहरात केवळ गप्पाच राहिल्या आहेत.

“पार्टी विथ डिफ्रन्स” असा लौकिक असलेल्या भाजपला या शहरातील भाजपाईंनी “पार्टी विथ सफरन्स” करून टाकले आहे. पिंपरी चिंचवड वासीयांना “सफर” करायला म्हणजेच आपण यांना निवडून दिले, याचे भोग पुरते भोगायला ही मंडळी भाग पडताहेत. अगदी शौच, मूत्रविसर्जनासारख्या शुल्लक बाबींवरही प्रसिद्धीपत्रक काढून टिमकी वाजविणारे हे शहरातील भाजपाई पाहिले की, यांच्या या किळसवाण्या प्रकारची कीव येते. लोकांसाठी आपण किती आणि काय करतो आहोत, हे दाखविण्याच्या सोसापायी ही प्रसिद्धीलोलुप मंडळी काहीही करतात. यातील सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला पत्र देणे. ही पत्रे देताना त्यांचे पुढे काय झाले, याची पडताळणी अगर शहानिशा करण्याची या मंडळींना अजिबात गरज भासत नाही, कारण या मंडळींना त्याचे काही घेणेदेणे नसते. एकदा पत्र दिले आणि त्याची बातमी केली, की आपली जबाबदारी संपली, एव्हढीच यांची भावना असते. खरे म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, लोकांसाठी काम करत यावे म्हणूनच लोकांनी ती दिली आहे, आपण जे करतो ते लोकाहिताचेच असले पाहिजे, याला शहरातील या प्रसिद्धीलोलुप भाजपाईंनी पूर्णतः तिलांजली दिली आहे.

कोणताही गाजावाजा न कारता लोकसंपर्कात राहून कार्यरत राहणे, ही मुळ भाजपाईंची खैसीयत! मात्र, पिंपरी चिंचवड शहरात किती मूळ भाजपाई आहेत, हा संशोधनाचाच विषय आहे. शहरातील दादा, भाऊंच्या गर्दीत मूळ भाजप कार्यकर्ता हरवून गेला आहे. इकडून तिकडून गोळा झालेल्या प्रसिद्धीलोलुप आणि खाबूगीर खोगिरभरतीत मूळ भाजपाई मागे राहिला आहे. सत्तेत वाटा मिळाला नाही तरी चालेल, पक्ष पातळीवर सतत कार्यरत राहणारे मूळ भाजपाई आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच सत्ता मिळाली पाहिजे, या कार्यप्रणालीने पछाडलेले आताचे स्वतःला नेते म्हणविणारे ढालगज लोक, यांची तुलनाच होऊ शकत नाही. आता, नितीन गडकरी यांच्या “लोकहितां मम करणीयम!” विषयी! स्वहितापुढे कशाचीही पर्वा न करणाऱ्या शहरातील आपमतलबी सर्वेसर्वा मंडळी नितीन गडकरी यांच्या या लोकहिताच्या संदेशाचे पालन ज्यावेळी करतील ती सुवेळ येण्याची सकल शहर वाट पाहात आहे. आताच्या प्रसिद्धीलोलुप आणि हडेलहप्पी मंडळींकडून अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे, हे काळच ठरवील. आपण फक्त वाट पाहू शकतो आणि तशी प्रार्थना करू शकतो, बाकी कोणाच्या हातात काही नाही!
–————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×