आमदारांवर गोळीबार होतो, सामान्यांच्या जीविताचे काय? पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना सवाल!

शहरात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न पडावा,अशी घाटना दि.१२ मे रोजी पिंपरी चिंचवड शहरात घडली. भर दुपारी एक इसमाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जीवित हानी झाली नाही. आण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्याने दाखविलेल्या समयसूचकता आणि चपळाईमुळे पिस्तूलाची दिशा बदलली आणि एक मोठा अनर्थ टळला.  महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो हा की, लोकांना पोलिसांची काही भीती राहिली आहे की नाही.एखाद्या गुन्ह्यात सहभागी होताना कायद्याचा धाक कोणालाही परावृत्त करतो, तो धाकच नसेल, तर कोणीही कधीही कायद्याला मोडून तोडून टाकू शकतो. हेच या घटनेतून प्रकर्षाने निदर्शनात येते.

मग प्रश्न निर्माण होतो की पोलीस काय करताहेत? कायदा सुव्यवस्था राखणे आणि कायद्याचे राज्य स्थापित करणे, ही पूर्णतः पोलिसांची जबाबदारी आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. कृष्ण प्रकाश हे या पोलीस आयुक्तालयाचे तिसरे आयुक्त. एक धडाडीचा, निस्पृह, निःपक्षपाती अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर आता शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल अशी आशा पिंपरी चिंचवड वासीयांच्या मनात उत्पन्न झाली होती. मात्र, शहरातील गुन्हेगारीचे एकंदर प्रमाण पाहता, कृष्ण प्रकाश यांच्यामुळे शहराच्या गुन्हेगारीत विशेष काही फरक पडल्याचे दिसून येत नाही. थोडक्यात सध्याची पोलिसांची कामकाजाची पद्धत विशेष उपयोगाची नाही, हेच यातून सिद्ध होत आहे.

मग काय करताहेत या शहरातील पोलीस आयुक्त? तर, पोलिस आयुक्त नकली दाढीमिश्या लावून शहरात फिरताहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी तसा प्रयोग केला आणि त्या प्रयोगाची वारेमाप स्तुती करणाऱ्या बातम्याही मुद्रित, दृक्श्राव्य आणि सामाजिक प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करवून घेतल्या. खरे म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच प्रसिद्धी माध्यमे बातम्यांची फारच भुकेली असतात. त्यामुळे ही माध्यमे या शहरात घडणाऱ्या कोणत्याही अतिशुल्लक घटनेलाही कोणतीही शहानिशा न करता अगर जागा भरण्याच्या कार्यक्रमात, बक्कळ प्रसिद्धी प्रदान करतात. शिवाय सवंग व्यक्तिपूजा हा या शहराचा स्थायीभाव असल्यासारखी बातमीदारी या शहरात केली जाते. नव्याने रुजू झालेल्या प्रशासकीय अगर पोलीस अधिकाऱ्याला अवाजवी प्रसिद्धी देण्याची शहरातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये चढाओढ लागते. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, केलेले न केलेले कर्तृत्व, एव्हढेच काय त्याच्या दाढीमिश्या आणि इतरचे केस किती सेंटीमीटर आहेत, याच्याही बातम्या होतात. मग, या प्रसिद्धीने भारावून गेलेला तो व्यक्ती प्रसिद्धीलोलुप होऊन जातो. ही प्रसिद्धीची हाव मग या शहरातील प्रसिद्धी माध्यमे वाढीस लावतात.

या प्रसिद्धी तंत्राच्या नादी न लागता शहरासाठी, इथल्या लोकांना भय, भ्रष्टाचार मुक्त जीवन जगता यावे म्हणून अधिकारी, प्राधिकाऱ्यांनी कार्यरत राहायला हवे. कारण या शहरातील भय आणि भ्रष्टाचार अजून संपलेला नाही. पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळताना, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर पिस्तूलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडणारा तानाजी पवार हा इसम केंद्रीय राखीव पोलीस दलाचा माजी कर्मचारी आहे आणि सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी कचरा वाहतुकीचा ठेका घेतलेल्या ए. जी. एनव्हाईरो कंपनीच्या व्यवस्थापनाकडे कार्यरत आहे. राखीव पोलीस दलाचा माजी कर्मचारी म्हणून त्याला स्वरक्षणार्थ पिस्तुल आणि त्याचा परवाना देण्यात आला असावा. त्याने आमदारांपुढून बाहेर आल्यावर त्यांच्या दिशेने गोळ्या झडले आहेत, असे सकृतदर्शनी दिसते. यावरून तानाजी पवार या इसमाने स्वसंरक्षणार्थ गोळ्या नक्कीच झाडल्या नाहीत, तर आमदार आण्णा बनसोडे यांच्या जीविताला हानी पोहोचविण्याचाच त्याचा हेतू असावा, असे वाटते. म्हणजे राखीव पोलीस दलाने सन्मानपूर्वक बहाल केलेल्या अग्निशस्त्राचा त्याने जीवितहानी करण्यासाठी दुरुपयोग केला, असे म्हणण्यास जागा आहे. ए. जी. एनव्हाईरो कंपनीच्या लोकांनी आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. परस्परविरोधी असलेल्या या पोलिस तक्रारींची शहानिशा पोलीस करतीलच. तरीही महापालिकेचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारास अग्निशस्त्र बाळगणारा अधिकारी कशासाठी हवा, यावरही तपास झाला पाहिजे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहरातील कायद्याचा धाक बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांच्या एव्हढ्याच अपेक्षा आहेत, की हे शहर भय आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावे.सवंग प्रसिद्धीच्या मागे न लागता आणि एखाद्याची प्रसिद्धीची हाव जोपासणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांच्या नादी न लागता, पोलीस आयुक्तांनी क्षीरनिर न्याय मिळणेकामी शहराला सहाय्यीभूत व्हावे. नाहीतर आयुक्तांना प्रसिद्धी मिळेलही, शहरातील सामान्य जनांना मात्र अनागोंदी, अनाचार यांचा सामना करीत आपले निर्वाहन करावे लागेल.

—————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×