शहरवासियांनी झोपेचे सोंग घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता का द्यावी?

झोपलेल्याला उठवता अगर जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार? कारण त्याला उठायचेच नसते, म्हणून तर त्याने झोपेचे सोंग घेतलेले असते. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची अवस्था झोपेचे सोंग घेतलेल्या निसुर आळशासारखी झाली आहे. याचा प्रत्यय काल १० जून रोजी शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आला. काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन होता. ऐन तारुण्यात आलेल्या या पक्षाला आलेले अकाली वृद्धत्व काल पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षानेत्याच्या कार्यालयात दृष्टिगोचार झाले. या शहरावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवारांचे प्रेमच नाही, या भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या राष्ट्रवादीने डोळे थोडेसे किलकिले करून आमचे दादा या शहरावर कसे प्रेम करतात हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका आणि शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, राजू बनसोडे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या विलीनीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहराचे कसे नुकसान झाले आहे, यावर भाजपने नामदार अजित पवारांचे या शहरावर प्रेम नाही असे विधान केल्यामुळे आणि कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांनी त्यावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला प्रतिक्रिया विचारली नाही म्हणून ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही झोपलेलो नाही हे दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. मधूनच आपण जागे आहोत, हे लक्षात आणून देण्यासाठी असे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी करीत असतात. त्यातलाच हा एक प्रयत्न असल्याचे या पत्रकार परिषदेत पुन्हा सिद्ध झाले.

कोरोना महामारीतून उसंत मिळाली तर, येत्या सात महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला, २०१७ च्या निवडणुकीत सत्ता गमावल्यावर आता पुन्हा ती मिळवायची स्वप्ने पडत आहेत. “देईल दाता, खाईल प्राणी!” या निसुर कार्यपद्धतीमुळे २०१७ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेली. आता देखील सत्ता मिळविणे हे आपला दाता नामदार अजितदादांचे काम आहे, त्यामुळे ते त्यासाठी काहीतरी करतीलच, आपण फक्त सत्तेची फळे खायची, या अविर्भावात सध्या राष्ट्रवादीचे शहरातील कर्तुमअकर्तुम नेते आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत शहरात आपलीच सत्ता येईल असे खोटे दृश्य यातीलच काही मंडळींनी नामदार अजितदादांसमोर निर्माण करून त्यांना अंधारात ठेवले होते, हे विशेष. आता देखिल ही मंडळी तेच करीत आहेत काय असा संशय निर्माण होतो आहे.

कालच्या पत्रकार परिषदेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उत्तरे देण्याची पद्धत त्याच प्रकारातील होती. भाजपने आपल्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, पिंपरी चिंचवड शहरवासी आता भाजपच्या कारभारामूळे त्रासले आहेत, त्यामुळे आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ, हा युक्तिवाद शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत केला. मात्र, भाजपने केलेला भरष्टाचार जनतेसमोर आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात, या प्रश्नाला कोणतेही उत्तर शहर राष्ट्रवादीकडे नाही. विरोधक म्हणून पुरेसा संख्याबळ असतानाही विरोध करण्याची मानसिकता या मंडळींमध्ये नाही. ती का नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनीच एकमेकांना विचारले पाहिजे. कालच्या पत्रकार परिषदेत, भाजपने महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी जो गदारोळ उठवला, त्या विध्वंसक पद्धतीचा वापर आम्ही करणार नाही, आम्हाला काही प्रतिष्ठा आहे, असे उत्तर देऊन आम्ही सत्ता मिळविण्यासाठी काहीही करणार नाही, हे राष्ट्रवादीने पुन्हा स्पष्ट केले आहे. थोडक्यात, आमचे झोपेचे सोंगच आम्हाला हवे आहे, आम्ही जागे होणार नाही, असेच मंतव्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो हा की, शहरातील मतदारांनी सोंग घेऊन झोपलेल्या राष्ट्रवादीची ही झोप उघडू द्यायचीच नाही असे ठरवले तर?

वस्तुतः काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन होता. कोरोना महामारीचे नियम पाळूनही २०१७च्या पराभवापूर्वी सलग पंधरा वर्षे सत्ता भोगलेले राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी शहरवासीयांना आपला जागेपणा दाखविण्यासाठी बरेच काही करू शकले असते. मात्र, त्यासाठी शहर राष्ट्रवादीत एकसंघ जागरूकता असणे अनिवार्य आहे. व्यक्तिगत पातळीवर येती महापालिका निवडणूक लढणे या पदाधिकाऱ्यांना धोक्याचे आहे. स्वतः निवडून आले आणि पक्षाची सत्ताच आली नाही तर काय, याचा विचार या मंडळींना का सतावत नाही, यावर संशोधन केले गेले पाहिजे. हे संशोधन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आताच करणे गरजेचे आहे. नपेक्षा इतर कोणी केले तर ती राष्ट्रवादीच्या शहरातील एकंदर कारभाराची चिरफाड ठरली तर वावगे ठरू नये. झोपेचे सोंग घेतलेल्या या स्थानिक मंडळींना हासडून जागे करण्यासाठी पक्षाचे नेतृत्व काही करणार आहे काय हे काळच ठरवेल. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानेच पिंपरी चिंचवड शहराबाबत झोपेचे सोंग घेतले आहे?

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×