पार्थ पवारांची आयुक्तांशी चर्चा, शहराच्या राजकारणात खळबळ!
उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे कायदेशीर आणि राजकीय वारस पार्थ पवार यांनी अजितदादांच्या स्वप्नातील आदर्श नगरीचे म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची सडी भेट काल ८ जून रोजी घेतली. “ते आले, ते बोलले आणि ते निघूनही गेले!” अशा या सड्या म्हणजेच एकट्याने घेतलेल्या या भेटीची चर्चा, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, सत्ताधारी भाजप, आणि विरोधातील राष्ट्रवादी यांच्या आतल्या गोटात मोठाच गहजब निर्माण करणारी ठरली. पार्थ पवार यांची आयुक्तांशी झालेली भेट दिवसभर चर्चेचा विषय होती. अनेक तर्ककुतर्क या भेटी बाबतीत शहरातील लोकांनी लढवले. पार्थ पवारांची ही भेट राजकीय होती का, एखाद्या प्रकल्पाबाबत होती का, एखादी तक्रार या भेटीमागे होती का असा सगळा तर्क करून झाल्यावरही ही भेट गुलदस्तातच राहिली.
विशेष म्हणजे पार्थ पवार आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या भेटी दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही पदाधिकारी अगदी शहराध्यक्षही त्यांच्या बरोबर नव्हते. एव्हढेच नव्हे तर, आयुक्तांच्या कक्षात झालेल्या या भेटीप्रसंगी इतर कोणी अधिकारीही उपस्थित नव्हते. ज्या काही एखाद्यास या भेटीची पूर्वकल्पना होती, त्यांनाही पार्थ पवारांनी बरोबर येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळेच पार्थ पवार आणि आयुक्त पाटील यांच्या या सड्या भेटीने महापालिका वर्तुळात गांभीर्य निर्माण होऊन गहजब झाला. सद्यस्थितीत कार्यबाहुल्ल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादांना पिंपरी चिंचवड शहराकडे विशेष लक्ष देणे काहीसे दुरापास्त होत आहे. म्हणून मग त्यांचे वारसदार सुपुत्र पार्थ पवार शहरातील राजकीय, सामाजिक आणि एकूणच कारभाराकडे लक्ष देत आहेत. पिंपरी चिंचवड शहराला वेळ देता यावा म्हणून त्यांनी शहरात वास्तव्य करण्याची सोय केली आहे. शहरातील काही मान्यवर नागरिक आणि स्वपक्षासह इतर पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींशी पार्थ पवारांचा चांगला संपर्क आहे. शहरवासीयांशी सामाजिक दृष्ट्या संवाद साधण्यासाठी पार्थ पवार सोशल फाउंडेशन निर्माण करण्यात आले आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी अन्नधान्य वाटप, महापालिकेकडे सॅनिटायझर, ऑक्सिजन, औषधे यांची पूर्तता अशा प्रकारे सहाय्यीभूत होण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. थोडक्यात, आता अजित पवारांपुर्वी पार्थ पवारांची भेट घेणे आवश्यक ठरणार आहे.
अशा परिस्थितीत पार्थ पवार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची सडी आणि कोणताही तपशील कळू न शकणारी भेट महापालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात गहजब निर्माण करणारी ठरली तर वावगे नसावे. या भेटीचे ज्ञातव्य असे आहे की, पार्थ पवारांनी पुढे येऊ शकणाऱ्या कोरोना महामारीची तिसरी लाट, त्यातील बालकांना बाधा होण्याची शक्यता, त्यासाठीची महापालिकेची तयारी, काळ्या बुरशीसंदर्भातील उपचार पद्धती, त्यासाठी पुरेसा औषधसाठा या बाबींची माहिती महापालिका आयुक्तांकडून घेतली. पार्थ पवार सोशल फाउंडेशन मार्फत काही सहाय्यही या भेटी दरम्यान देण्याचे आश्वासन पार्थ पवारांनी आयुक्तांना दिले. कोरोना महामारीमुळे त्यांनी गर्दी टाळून आयुक्तांची सडी भेट घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अनावश्यक गर्दी टाळण्याच्या पार्थ पवारांच्या या निक्षून केलेल्या प्रयत्नांमुळेच नक्की काय अत्यावश्यक चर्चा या उभयतांमध्ये झाली, याचे तार्किक मांडण्याचा प्रयत्न राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर जोरदारपणे सुरू असतानाच सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेमुळे होत असलेली चर्चा मागे ठेऊन पार्थ पवार निघून गेले.
वस्तुतः वरील ज्ञातव्य विषयाच्या चर्चेत गोपनीयता पाळण्याचे कोणतेही विषय नव्हते, या सड्या चर्चेचे प्रयोजन शोधण्याचा आणि आपली अक्कल पाजळण्याचा साशंक प्रयत्न कोणी करीत असेल, तर तो करत राहावा. भेट झाली, चर्चाही झाली आणि महापालिका वर्तुळात गडबडही उडाली हे या भेटीनंतरचे वास्तव मात्र, अनेक चोरांच्या मनात चांदणे निर्माण करणारे ठरले आहे.
———————————————————–