स्वच्छ इंदौरचा पाहणी दौरा, शहर स्वच्छतेसाठी की आणखी कशासाठी?

सुप्रसिद्ध व्यंगकार संपत सरल यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल एक उल्लेखनीय टिप्पणी केली आहे. आपल्या व्यंगात ते म्हणतात, “वह लोगो देखा आपने, स्वच्छ भारत अभियानका, गांधीजीका चष्मा, उसके एक शिशेपर स्वच्छ लिखा है, एक पर भारत. यानी जहाँ स्वच्छ लिखा है, वहाँ भारत कही दिखाई नही देता और जहाँ भारत लिखा है, वहाँ स्वच्छ नजर नही आता!” काहीशी अशीच गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ अभियानाची आहे. फरक एव्हढाच की, या शहराच्या स्वच्छता अभियानात मानसिकतेची स्वच्छता दिसत नाही. केवळ आणि केवळ कोणालातरी वाटले किंवा कोणीतरी सांगितले म्हणून काहीतरी करणारी मानसिकता या शहराचे प्रशासन, राजकीय पदाधिकारी आणि कोणतीही योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा यांच्यात ठासून भरलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा नुकताच गुपचूपपणे झालेला इंदौर दौरा हीच मानसिकता दर्शवितो.

स्थायी समितीची दर बुधवारची बैठक गेल्या बुधवारी झाली नाही आणि का झाली नाही हे शोधल्यावर हा इंदौर दौरा उघडकीस आला. पिंपरी चिंचवड महापलिकेतील भाजपचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि स्थायी समितीचे सहा सदस्य यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय एव्हढी शहरातून गायब असलेली मंडळी इंदौरमध्ये प्रकट झाल्याची माहिती प्रसूत झाली. कोणताही प्रशासकीय दौरा आयोजित करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीनुसार अशा दौऱ्याला आयुक्तांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. महापालिकेच्या स्थायी समितीपुढे तसा ठराव मांडून आयुक्त तो ठराव मंजूर झाल्यावर दौऱ्याला अनुमती देतात. ही प्रचलित कायदेशीर पद्धत मोडीत काढून हा दौरा अचानक गायब झालेल्या मंडळींनी केला.

या दौऱ्यातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी रीतसर आयुक्तांना कळवून आणि मान्यता घेऊन वेगळा विमानाने प्रवास करून गुरुवारी या इंदौर दौऱ्यात आपला समावेश करून घेतला,असा खुलासा दिला आहे. तर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ वेगळे आपल्या खाजगी कामासाठी त्या भागात गेले होते आणि दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला सहभाग या पाहणीत नोंदवला. शिवाय एखादा चांगला प्रकल्प पाहायला मिळत असेल, तर आपली उपस्थिती का नसावी, अशी पुष्टीही राजू मिसाळ यांनी आपल्या सहभागाबद्दल दिली आहे. डॉ. अनिल रॉय यांनी काल सोमवारी आपल्या इंदौर दौऱ्यातील निरीक्षण अहवाल कार्यालयीन पद्धतीनुसार आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी भाजपचे पक्षनेते, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे लेखी सादर करून कर्तव्यपूर्ती केली.

पिंपरी चिंचवड शहर आणि इंदौर शहर लोकसंख्या, गरजा, विस्तार आणि विकास या बाबींचा विचार करता जवळपास सारखे असल्याचे सांगून आपल्या निरीक्षणात डॉ. रॉय म्हणतात की, कचऱ्याचे नेमके विलगिकरण आणि त्यासाठी असलेले राजकीय पाठबळ, यांच्या जोडीनेच लोकांचा ठाम सहभाग शहराच्या स्वच्छतेसाठी मूलतः कारणीभूत आहे. इंदौर शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक शहर स्वच्छतेसाठी स्वतःच आग्रही आहेत. तेथील प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांची मानसिकता तयार करण्यासाठी लोकशिक्षण आणि लोकजागृती इतक्या व्यवस्थितपणे केली आहे की, यंत्रणेची चूक नागरिकच लक्षात आणून देतात. लोकसहभाग हेच इंदौर शहराच्या स्वच्छतेचे मूळ गमक असून, त्यामुळेच सलग काही वर्षे सातत्याने स्वच्छ शहर म्हणून इंदौरला सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. अनिल रॉय यांनी सादर केलेल्या पाहणी अहवालाचे निरीक्षण केले असता, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या मानसिकतेची पूर्ण जुळणी होऊनच इंदौर शहर स्वच्छ शहर म्हणून मान्यता पावले आहे, हे स्पष्ट होते. आता ही ठाम मानसिकता आणि पिंपरी चिंचवड शहर याची सांगड कितपत मजबूत आहे, याचा विचार होणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाची मूळ मानसिकता तपासणे अगत्याचे आहे. कोणीतरी एखादा गारेगार सल्ला देणारा सल्लागार येतो आणि आपले नयनमनोहर संगणकीय सादरीकरण सादर करून आणि त्यातील उद्योगी मेखा वेगळ्या सांगून प्रशासनाला नादवतो, हा या महापालिकेचा आतापर्यंतचा प्रघात आहे. मग प्रशासन त्या उद्योगी मेखांचे विस्तारीकरण करून लोकप्रतिनिधींना नादी लावते. आम नागरिकांना काय हवे, अगर आम नागरिकांच्या काय पचनी पडेल, याचा विचार न होता त्या सादरीकरणातील उद्योगी मेखांचा विस्तृत उहापोह होऊन तो गार सल्ला शहराच्या माथी आदळला जातो. इंदौर शहराचे कचरा विलगिकरण आणि त्यासाठी मानसिकता तयार करण्याचे काम करणारी बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स ही संस्था आता पिंपरी चिंचवड महापलिकेतील तीन प्रभाग प्रायोगिक तत्वावर स्वच्छ करणार आहे. महापालिका प्रशासन आणि महत्त्वपूर्ण लोकप्रतिनिधी यांची “मानसिकता” तयार करण्यासाठी या बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स संस्थेने पदरमोड करून हा दौरा आयोजित केला असल्याचे ज्ञातव्य आहे. मात्र, आशा प्रकारे खाजगी दौरा अत्यंत गोपनीयता पाळून करण्याचा हा अतिरंजित प्रकार अतिरिक्त आयुक्त आणि राजकीय पदाधिकारी यांनी का केला असावा हे अनाकलनीय आहे. ही गुप्त दौऱ्यातील मानसिकता नक्की काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेने पदरमोड करून हा दौरा आयोजित केला असेल तर, या संस्थेची त्यामागची मानसिकताही तपासावी लागेल.

स्वच्छ भारत अभियानावरील आपल्या व्यंगात प्रसिद्ध व्यंगकार संपत सरल असेही म्हणतात की, “एक आदमीने सर पिटते हुए मुझे बताया की, संपतजी, एक चोर स्वच्छ भारत अभियान के तहत मेरा घर साफ कर गया!” आता हा स्वच्छ इंदौर दाखवण्याचा खाजगी दौरा पिंपरी चिंचवड महापालिकेची तिजोरी साफ करणारा असेल किंवा कसे, हे येत्या काळात स्वच्छपणे दिसेलच. अर्थात “सर पिटने” एव्हढे वाईट दिवस पिंपरी चिंचवड महापालिकेवर नक्कीच नाहीत, हे खरे असले तरी, तिजोरीवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नांवर बारकाईने नजर ठेवणे अगत्याचे आहे. महापालिका आयुक्त ते करतील अशी अपेक्षा ठेवण्यास प्रत्यवाय नक्कीच नसावा.              ————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×