शहराला कचऱ्यात लोटणारेच आता कचरा विरहित शहर करायला निघालेत!
अचानक शहर स्वच्छतेचा कळवळा आलेले पिंपरी चिंचवड महापलिकेतील भाजप पदाधिकारी गेली सुमारे साडेचार वर्षे काय करीत होते, असा प्रश्न आता शहरवासीयांना पडला आहे. शहरात दररोज निर्माण होणारा सुमारे नऊशे टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावणे हे जिकिरीचे काम आणखी जिकिरीचे करणारे सत्ताधारी भाजपाई अचानकपणे कचऱ्यासंबंधी इतके भावुक झालेले पाहून त्या कचऱ्यालाही भावना अनावर झाल्या असतील. इंदौर शहराचा संशयास्पद खाजगी किंवा ठेकेदार पुरस्कृत दौरा उरकून आलेल्या या भाजपाई पदाधिकाऱ्यांनी गेल्या साडेचार वर्षात कचऱ्याचा कसा खेळखंडोबा केला हे मात्र या अचानक आलेल्या कळवळ्याने अजून स्पष्टपणे आठवू लागले आहे. २०१७ च्या मार्च मध्ये शहरात सत्ता स्थापित केल्या पासून अगदी कालपर्यंत शहराच्या कचऱ्यात मलिदा शोधण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई आश्चर्यकारक पद्धतीने कचरा व्यवस्थापन कसे करावे, याची चर्चा करू लागले आहेत.
सुमारे नऊशे टन कचरा किती मलिदा देऊ शकतो, याची चाचपणी अगदी सुरुवातीलाच तत्कालीन भाजपाई स्थायी समितीने सुरू केली होती. त्यावेळी कचरा वाहतूक आणि संकलन करणारे सर्व ठेकेदार दमात घेऊन त्यांच्या परस्पर बैठका आयोजित करण्यात पुढाकार घेणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडवण्यास खरी सुरुवात केली. शहरात भाजपची सत्ता येण्यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने दोनदा शहर स्वच्छतेची पारितोषिके मिळविली आहेत, हे उल्लेखनीय. शहरातील स्वयंरोजगार संस्था आणि काही छोटे वाहतूकदार शहर स्वच्छता राखीत असताना, या वाहतूकदार आणि स्वयंरोजगार संस्थांचे काम बंद करण्याची धमकी देऊन अगदी सुरुवातीलाच कचरा व्यवस्थापन गोत्यात आणण्याचा प्रयत्न शहर भाजपाई पदाधिकाऱ्यांनी केला आहे. स्वयंरोजगार संस्था आणि छोटे वाहतूकदार आपले पोट भरू शकत नाहीत, हे लक्षात आल्यावर कचरा वाहतुकीची सुमारे साडेआठशे कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण करून भाजपाईंनी शहर ए. जी. एन्व्हायरो आणि बिव्हीजी या कचरा वाहतुकदारात वाटून दिले. अर्थात असे दोनच ठेकेदार सात वर्षांसाठी महापालिकेच्या बोकांडी बसवून स्वतःचे कोटकल्याण करून घेण्यास हे भाजपाई विसरले नाहीत.
दरम्यानच्या काळात पिंपरी चिंचवड महापलिकेच्या आणखी एका स्थायी समिती अध्यक्षाने शहरात ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात गोळा करता यावा म्हणून काही कोटी रुपयांचे कचरा डबे खरेदी करून शहरात वाटले. अर्थात तीस रुपयांचा प्लास्टिक डबा सुमारे सव्वाशे रुपयांना विकत घेऊन आपला हेतू साध्य करणारे भाजपाई आता त्या गायब झालेल्या घरोघरच्या डब्यांसारखेच नदारद झाले आहेत, हा भाग अलाहिदा! पिंपरी चिंचवड शहरात रोज सुमारे नऊशे टन निर्माण होणारा कचरा संकलित करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे गेल्या अडीच वर्षांपासून घाटत आहे. कचरा संकलनासाठी शहराचे किती आणि कसे भाग करायचे, यावर एकमत न झाल्यामुळे ही प्रक्रिया प्रलंबित आहे. शहराचे कचरा वाहतुकीसारखे दोन भाग करून कचरा संकलन करणारा ठेकेदार नेमायचा की आठ भाग करून कचरा संकलन करायचे, यावर अजूनही पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपाईंमध्ये एकमत नाही. आपले संकलन कसे आणि कितपत होईल याची खात्री नसल्याने हे एकमत होत नाही, अशी वादंता आहे. या सगळ्या संकलन प्रक्रियेत अडकलेला कचरा संकलनाचा विषय गेली अडीच वर्षे चर्वणात आहे, मात्र चरायला किती मिळणार या वादात डिसेम्बर २०१९ मध्येच मुदत संपलेले आणि सतत मुदतवाढीच्या चक्रात अडकलेले सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, डी. एम. एंटरप्रायजेस, हेमांगी एंटरप्रायजेस, शुभम उद्योग, तिरुपती इंडस्ट्रीयल सर्विसेस, परफेक्ट फॅसिलिटी सर्विसेस आणि गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. हे जुने सात ठेकेदार मेटाकुटीस आले आहेत.
आता इंदौर शहराचा खाजगी दौरा करून आल्यावर आपले शहरही तिथे कचरा संकलन करणाऱ्या बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस देण्यात हरकत नाही असा दृष्टांत पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपला झाला आहे. त्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर तीन चार प्रभाग या संस्थेकडे सुपूर्द करण्याचेही ठरवून टाकण्यात आले आहे. हे सर्व परस्पर ठरवताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे कचरा व्यवस्थापन नक्की कसे चालते आणि त्या अनुषंगाने शहराच्या नक्की गरजा काय याचा विचार अगर आभ्यास सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी किती केला आहे, हे संशयास्पदच आहे. सांप्रतला पिंपरी चिंचवड महापालिका गांडूळखत प्रकल्प आणि प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करित आहे. अर्थात त्यातून निर्माण होणारे गांडूळखत कोणते गांडूळ खाते आणि निर्माण होणारे इंधन कोणाला इंधन पुरवते, यावर अलाहिदा संशोधन होणे आवश्यक आहे. इंदौरमध्ये जे जे केले जाते, ते ते पिंपरी चिंचवड महापालिकेनेही केले आहेच, हे स्पष्ट आहे. प्रश्न उरतो तो मानसिकतेचा. इंदौर शहरातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि तो ठेकेदार यांची मानसिकता अडीग आणि स्पष्ट आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षात कचरा व्यवस्थापनेचा बोऱ्या वाजवून शहर कचऱ्यात लोटणाऱ्या भाजपाईंना अचानक उपरती होण्याचे कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तर नाहीत ना, हे तपासून पाहावे लागेल. ——————————————————–