भोसरीच्या औरंगजेबी भाजपाई राजकीय अट्टहासापुढे छत्रपती संभाजी महाराजही हतबल!
भोसरीच्या भाजपाई राजकीय अट्टहासापायी छत्रपती संभाजी महाराज देखील हतबल होतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोशीच्या बोऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर या तीन बाजूंनी टोलेजंग इमारतींनी घेरलेल्या एकशे सोळा गुंठे जागेत छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा हा प्रयत्न मुघल बादशहा औरंगजेब याच्यापेक्षाही खतरनाक आहे. केवळ भोसरीच्या भाजपाई आमदारांची इच्छा म्हणून टोलेजंग इमारतींच्या मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद राहावे लागणार आहे. हा आधुनिक औरंगजेबी अट्टहास हाणून पाडण्यासाठी शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटना कार्यरत झाल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभर फुटी पुतळ्यासाठी ही खोपच्यातली जागा योग्य नसून नागरवस्तीने घेरलेली ही जागा बदलावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्था, संघटनांकडून होत आहे.
मोशीचा बोऱ्हाडेवाडीतील विनायकनागर हा भाग पूर्णतः नागरी वस्तीचा आहे. तीस फुटी रस्त्याला लागून तीनही बाजूंनी टोलेजंग इमारतींनी घेरलेल्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा हा प्रकल्प सध्या चाळीस फुटी चौथरा आणि त्यावर शंभर फुटी पुतळा असा सुरू करण्यात आला आहे. १२.४७ कोटींचा चौथरा आणि ३२.८४ कोटींचा मुख्य पुतळा असे हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत देण्यात आले आहे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी पोट ठेकेदार नेमून हे मुख्य पुतळ्याचे काम दिल्लीस्थित प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांना दिले आहे. मोशीच्या विनायकनागर येथिल ही नियोजित जागा आरक्षण क्रमांक ४६६अ आणि ४६६ब अशी शाळा इमारत आणि उद्यानासाठी आरक्षित होती. त्यापैकी रस्त्याच्या कडेची जागा महापालिकेच्या ताब्यात येणे बाकी असून, आतली जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे सध्या केवळ चौथरा आणि पुतळा एव्हढीच निविदा काढली असून रस्त्यालगतचे प्रवेशद्वार, बहुउद्देशीय इमारत आणि सुमारे साडेचारशे आसन क्षमता असलेले खुले व्यासपीठ हा या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या एकूण सुमारे दोनशे कोटींच्या कामाचा पुढचा भाग प्रलंबित आहे.
सुमारे दोनशे कोटींचा हा छत्रपती संभाजीराजे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा मूळ प्रकल्प असून, प्रलंबित भागात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांसह संभाजीराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची भित्तिशिल्पे असणार आहेत. छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीला राज्याच्या कला संचालनालयाने मान्यता दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून प्रसिद्ध इतिहासकार विश्वास पाटील यांची नेमणूक पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. एव्हढा मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा टोलेजंग इमारतींनी घेरलेला नसावा, अशा भावना शहरवासीयांमध्ये निर्माण झाली असल्यास ते वावगे ठरू नये. मात्र, पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजप आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार, यांनी अट्टहासाने हा प्रकल्प तेथेच व्हावा म्हणून आग्रह धरला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराज आणि शिवशंभू कालीन इतिहासातील एक अनन्यसाधारण व्यक्तित्व, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे प्रेक्षणीय स्मारक व्हावे, याबाबत कोणत्याही शहरवासीयांचे दुमत असणार नाही. शंभुप्रेमी मंडळींची मागणी एव्हढीच आहे, की हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असा नागरवस्तीच्या मध्यावर होणे गैरवाजवी आहे. छत्रपती शंभूराजांच्या निधनापश्चात उभा महाराष्ट्र सलग अठरा वर्षे औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी झुंजता राहिला, तो केवळ शंभूराजांच्या स्वराज्य हितकर प्रेरणेने आणि हिमतीनेच. ही प्रेरणा आणि हिम्मत मोशीच्या बोऱ्हाडेवाडीतील विनायकनगरच्या नागरवस्तीने वेढलेल्या छोट्याश्या जागेत कोंबली जाऊ नये, अशी मागणी शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनी केली आहे. छत्रपती शंभूराजांच्या विचारांची भव्यता मुघल बादशहा औरंगजेबाला महाराष्ट्रातच प्राण सोडण्यास भाग पाडणारी ठरली आहे, विवादातीत सत्य आहे. शंभूराजांच्या विचारांची हीच भव्यता पिंपरी चिंचवड शहरातील औरंगजेबी भाजपाईंना महापलिकेतील आगामी निवडणुकीत सत्तेतून बाहेर फेकणारी ठरू नये, म्हणजे झाले! ————————————————————