निष्काम, निष्फळ, निष्प्रभ आणि निरंकुश शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जान कोण ओतणार?

गेल्या उण्यापुऱ्या साडेचार वर्षांपासून सत्ताउतार झाल्यानंतरच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरता निष्काम, निष्फळ, निष्प्रभ आणि निरंकुश झाला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मधली दिवंगत दत्ताकाका साने यांची कारकीर्द सोडली, तर उर्वरित कालावधीत विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत निष्प्रभ ठरली आहे. शहरात अनेक दिग्गज, जाणकार, प्रशासकीय तज्ज्ञ आणि भक्कम स्थानिक नेते राष्ट्रवादीकडे असतानाही, विरोधी पक्ष म्हणून उल्लेखनीय छाप पाडण्यात ही मंडळी अपयशी ठरली आहेत. पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचारी आहे, महापालिकेच्या कारभारात अनागोंदी आहे, प्रशासन आणि सत्ताधारी संगनमताने महापालिकेची “लांडगेतोड” करताहेत, यावर फक्त मेजचर्चा म्हणजेच टेबल डिस्कशन करण्यात धन्यता मानणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, संघटितपणे भाजपला विरोध करताना दिसत नाही.

युवा राष्ट्रवादीची काही आंदोलने आणि वरून आलेले हुजूर हुकूमाचे आदेश यांची पूर्ण पूर्तता, याव्यतिरिक्त स्वयंसंचलित असे कोणतेही आंदोलन अगर विरोधी पक्षाची ठाम भूमिका बजावण्यात शहर राष्ट्रवादी सपशेल अपयशी ठरली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर गेली तीस पस्तीस वर्षे भक्कम पकड असलेले राष्ट्रवादीचे धुरंधर असे निष्काम कसे आहेत, यावर शहरवासीयांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. शहर राष्ट्रवादीचे हे धुरंधर आपला धुर्तपणा कशासाठी आणि कुठे वापरत आहेत, यावर खरे म्हणजे अलाहिदा संशोधन केले पाहिजे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर या धुरंधरांना मुखपट्टी घालण्यात मिळविलेले यश वादातीत आहे. भाजपने हे राष्ट्रवादीच्या धुरंधारांचा मुखभंग करण्यात मिळवलेले यश इतके चपखल आहे, की कोणताही राष्ट्रवादीचा नेता सांप्रतला मूग गिळून आहे.

मुखपट्टी आणि तोंडात धरलेले मूग यामुळे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी पूर्ती निष्प्रभ झाली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणारे हे राष्ट्रवादीचे धुरंधर नेते, सत्ताधारी भाजपच्या इतके कच्छपी आहेत की, जणू भाजपाईंच्या बगलबच्च्यांमध्ये यांचा समावेश तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ शकते. त्यांचे स्वत्व आणि स्वाभिमान नक्की कुठे नदारद झाला आहे, शहरातील या सत्ताकांक्षी मंडळींचा कर्तुमअकर्तुम भाव भाजपाईंनी नक्की कोठे गाडून टाकला आहे, हे शोधावे लागेल. आता ही निष्प्रभ मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पुरती निष्फळ ठरताहेत काय, याचेही उत्तर आता शोधले गेले पाहिजे.

राष्ट्रवादीच्या या धुरंधरांना आपल्या बगलबच्च्यांमध्ये सामील करून भाजपाईंनी सत्तेत नसतानाही सत्तेचे तुकडे टाकले आहेत. त्यामुळे आता हे धुरंधर सत्ताधारी भाजपाईंसाठी दंतक्षय झालेले नरपूंगव ठरले आहेत. यांचे गुरगुरणे आता सत्ताधारी भाजपऐवजी स्वपक्षीयांवरच जादा चालू आहे. यांच्या या दंतक्षयी गुरगुरण्यावर कोणाचाही अंकुश उरला नाही. हे निरंकुश नरपुंगव आता व्यक्तिगत पातळीवर मिळणारे तुकडे चघळण्यात मश्गुल आहेत. पक्षीय पातळीवर मात्र, हे निष्काम, निष्फळ, निष्प्रभ आणि निरंकुश नरपूंगव कुचकामी ठरत आहेत. या दंतक्षयी नरपुंगावांना त्यांच्या दातांची क्षमता सिद्ध करण्यासाठी आणि आपणही शिकार करू शकतो, याचा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्यासाठी आता शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एखादा खराखुरा नरपूंगव निर्माण होणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परिपक्व आणि धुरंधर स्थानिक नेते, आता महापालिका निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्याची स्वप्ने पाहात आहेत. मात्र, त्यासाठी काही निश्चित कार्यक्रम आखून ठोस पावले उचलणार कोण यावर सगळे घोडे अडले आहे. सत्ताधारी भाजपच्या तुकड्यात मश्गुल असणाऱ्या या मंडळींना सत्ता तर अगदी हवीच आहे, पण आयती आन8 स्वतःला झळ नालागू देता. शहरावर अधिराज्य गाजवण्याची गरज जर अजितदादा पवारांना असेल, तर त्यांनी या झोपेचे सोंग घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंडळींना दचकवून जागे करण्याची गरज आहे. सत्ताधारी भाजपाईंचे लांगुलचालन करून मरगळलेल्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जान ओतणारा महाभाग हवा आहे, तो मिळाला तर कदाचित ही मंडळी पुन्हा जानदार होतील, त्यांची झापड उडेल.                                                               —————————————————––

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×