कृष्ण प्रकाश यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काय?

काही सामाजिक संस्था, संघटना आपल्याविरुद्ध षडयंत्र रचित आहेत आणि काही पोलीस अधिकारी त्यांना मदत करीत आहेत, असा आरोप पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे विद्यमान आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे षडयंत्र लवकरच उघड करून संबंधितांना योग्य शिक्षा मिळण्याची तजवीज केली जाईल, असेही कृष्ण प्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या सर्व प्रकाराकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले असता पोलीस आयुक्तांवर षडयंत्र रचले जावे अशी परिस्थिती का निर्माण झाली असावी यावर खरे म्हणजे चर्चा व्हायला हवी. आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन अशी ओळख असलेले धाडसी, निस्पृह, निडर आणि निःपक्षपाती म्हणून ख्यातिप्राप्त असलेल्या कृष्ण प्रकाश यांचा षडयंत्र करून बळी घेण्याची कोणाला, का, कशासाठी गरज पडली असावी याचे आत्मपरीक्षण खरे म्हणजे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीच स्वतःहून करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर खरोखरच पोलीस आयुक्तांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असेल, तर हे रचणाऱ्यांना तशी गरज आणि त्यासाठी असणारी हिम्मत का निर्माण झाली असावी याचाही तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे ख्यातनाम आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला पाहिजे.

दहा महिने आणि वर काही दिवस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची या शहरातील कारकीर्द. या दहा महिन्यात असे काय घडले की पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याविरुद्ध कोणीतरी षडयंत्र करावे, हा खरा प्रश्न आहे.ऐन चाळिशीतही पोहणे, सायकल आणि मोटारसायकल चालविणे व त्यानंतर पळणे अशा तिहेरी स्पर्धेत दोनदा भाग घेऊन स्वतःला आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन म्हणून शाबीत करणारे हे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहरात कोणाच्या षडयंत्राला बळी पडू शकतात हेच मुळी अनाकलनीय आहे. बाब तशी छोटीशी, पण त्या बाबीचे षडयंत्रात रूपांतर झाले. कृष्ण प्रकाश अर्थात केपी यांच्या कार्यालयात इतर पुस्तकांखाली भारतीय संविधान ठेवलेले आढळून आले. तसे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये प्रसूत करण्यात आले. हे छायाचित्र त्यांच्याच कार्यालयातील कोणी बाहेर पाठवले असण्याची शक्यता जास्त. ज्यांनी कोणी हे छायाचित्र बाहेर पाठवले त्यांनी ते नेमक्या व्यक्तीच्या हाती सोपवून, त्यावरून केपींना दोषी ठरवण्याचा आणि त्यांच्याविरुद्ध आंदोलन करून मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी ठरवून पुढे आणण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला. काल १२ जुलै रोजी हे आंदोलन काही संस्था संघटनांच्या वतीने करण्यात येणार होते. मात्र नागरी सुरक्षा कायद्याच्या कलम १४९ नुसार संबंधितांना नोटिसा बजावून हे आंदोलन पोलिसी खाक्या वापरून हाणून पाडण्यात आले. दस्तुरखुद्द रामदासजी आठवले यांना आमचे लोक आंदोलनात भाग घेणार नाहीत, अशी शाश्वती देऊन कार्यकर्त्यांवर होऊ घातलेली कारवाई थांबवण्यासाठी थेट केपींना आश्वस्थ करावे लागले. पिंपरी चिंचवडच्या पोलिसांमध्ये आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये केपींविरुद्ध एव्हढा असंतोष का निर्माण झाला असावा, याचा शोध खरे म्हणजे आता केपी अर्थात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला पाहिजे.

पोलीस खाते निर्मळ नाही, हे एक सनातन आणि शाश्वत सत्य आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहतूक सहायकापासून अगदी उच्चाधिकाऱ्यांपर्यंत कोणीही या अनिर्मळ लांछनापासून वाचलेला नाही. सप्टेंबर २०२० मध्ये शहर आयुक्तालयात आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर कृष्ण प्रकाश अर्थात केपी यांनी किमान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्मळ करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड शहरासह खेड, मावळ आणि मुळशी या तीन तालुक्यातील शहरालगतचा भाग मिळून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापित करण्यात आले. अनेक अवैध धंदे आणि बेकायदेशीर कारवायांसाठी हा सगळा परिसर नावाजलेला होता. गुन्हेगार आणि त्यांना पोसणारे पांढरपेशी राजकारणी व व्यावसायिक यांचा मोठाच बोलबाला या परिसरात होता. केपींनी आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून या परिसरातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर कारवायांना बऱ्यापैकी चाप लावला. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाची सवय आणि हाव असणारी अनेक मंडळी केपींवर नाराज असणारच यासाठी वेगळ्या संशोधनाची गरज नाही. हे सर्व अवैध धंदे बंद करून किंबहुना बंद करायला भाग पाडून केपींनी अनेक हितशत्रू निर्माण केले आहेत. अर्थात उडदामाजी काळे गोरे या न्यायाप्रमाणे काही प्रामाणिक अधिकारी, कर्मचारीही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत आहेतच. मात्र, केपींनी सगळ्यांनाच एक तराजूत तोलून या प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींचाही रोष पत्करला आहे. थोडक्यात शहराचे पोलीस आयुक्त केपींनी सर्वच क्षेत्रात आपल्यासाठी हितशत्रू निर्माण केले आहेत. हे हितशत्रू कोणत्याही थराला जाऊ शकतात, हेच या मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीतून स्पष्ट झाले आहे. स्वतःला रॉबिनहूड पांडे म्हणजेच सलमान सिद्ध करण्याच्या नादात केपींनी काहींना वाचवण्याचा आणि काहींना धारेवर धरण्याचा जो प्रसिद्धी लोलुप प्रकार केला, तोही त्यांच्या हितशत्रूंमध्ये वाढ करणाराच ठरला आहे.

अगदी शुल्लक बाबही मोठी करून प्रसिद्ध करायची ही पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्धी माध्यमांची सवय आणि गरज आहे. तशातच केपींसारखा अल्ट्रा आयर्नमॅन गवसणे म्हणजे तर, या प्रसिद्धी माध्यमांसाठी अक्षरशः सोनेपे सुहागा ठरले आहे. त्यामुळे या प्रसिद्धी माध्यमांनी केपींना ब्रोशरमॅन करून टाकले आहे. प्रसिद्धीची नशा काही औरच असते, या नशेची लत लागलेली व्यक्ती मग सातत्याने प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करते. तसाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश अर्थात केपी यांचा झाला असावा काय, या प्रश्नाचे उत्तर खेदाने होय असे द्यावे लागत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची प्रसिद्धी केपींना मध्यवर्ती ठेऊनच करायची असा काहीसा प्रकार सध्या घडतो आहे. मात्र, त्यामुळे आपण खरोखरच काम करणाऱ्या इतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय करतो आहोत, हे कोणीतरी केपींच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून आणि आपल्या अखत्यारीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तशी संधी देऊनही आपण लोकांच्या गळ्यातले ताईत होऊ शकतो, याची जाणीव केपींना होणे देखील आवश्यक बनत चालले आहे. आपल्या वरच्या अधिकाऱ्याने चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप आणि कामात हलगर्जी करणाऱ्यांच्या पाठीत थाप मारली, तर कोणताही कारभार सुकर, सुगठित आणि सुंदर होतो, हेही केपींना आता समजावून सांगितले पाहिजे.

सर्वात मोठया प्रमाणात काळ्या धनाची उत्पत्ती आणि वापर जमिनीच्या व्यवहारात केला जातो, हे वादातीत सत्य आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंदे आणि अनाधिकृत कारवाया यांच्यावर जरब बसवून आळा घालणाऱ्या केपींनी जमिनीचे वाद आणि तंटे या बाबी आपल्या अखत्यारीत ठेऊन स्वतःविषयी अवाजवी शंका निर्माण केली आहे. या जमीनींच्या वाद आणि तंट्याचा संबंध आणि संपर्क सरळपणे छोटेमोठे बांधकाम व्यावसायिक आणि जमिनींच्या व्यवहाराचे काळे पांढरे करण्यात वाकबगार असलेले धनदांडगे यांच्याशी येतो. असे वाद, तंटे स्वतःच्या अखत्यारीत ठेऊन केपींनी नक्की काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात न घेण्यासारखी खुळी मंडळी शहरात नक्कीच नाहीत. उदाहरणादाखल पिंपळे सौदागर येथील बांधकाम व्यावसायिक भोजवानी आणि मूळ जमीन मालक मागासवर्गीय जगताप मंडळी यांचा सांप्रत चालू असलेला वाद सांगता येईल. या वादात पोलीस यंत्रणा बांधकाम व्यवसायिकास सहाय्यीभूत होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे. मग, एकीकडे सर्व अवैध धंदे आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्नरत असलेले केपी, जमिनींचे वाद, तंटे आपल्या अखत्यारीत का प्रयत्नपूर्वक ठेऊ इच्छितात हे मोठेच कोडे आहे.

थोडक्यात या सर्व लेखनप्रपंचाचा मतितार्थ एव्हढाच की कोणत्याही सनदी अधिकाऱ्याने निर्मळपणे कारभार जरूर करावा, मात्र त्यात आतले बाहेरचे काही आहे, याचा संशय निर्माण होऊ देऊ नये. त्याचबरोबरीने कोणत्याही सनदी अधिकाऱ्याने प्रसिद्धीही जरूर मिळवावी, मात्र त्याचा अतिरिक्त सोस असू नये. कोणत्याही बाबीचा अतिरिक्त अतिरेक धोकादायक असून, तो एखाद्याच्या संपूर्ण कारकिर्दीवर अतिरेकी पाणी फिरविणारा ठरू शकतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अल्ट्रा आयर्नमॅन आयुक्त कृष्ण प्रकाश अर्थात केपी यांनी या बाबींचा बोध घेऊन पुढील मार्गक्रमणा केली तर, या लेखनप्रपंचाची इतिश्री झाली असे समजण्यास नक्कीच हरकत नाही. आत्मपरीक्षण कधीही आणि कोणीही करणे हितावहच!    ————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×