पिंपरी विधानसभा मतदारसंघ येत्या महापालिका निवडणुकांचे मुख्य रणांगण ठरणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोनही पक्षांचे येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील मुख्य रणांगण पिंपरी विधानसभा मतदारसंघ आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्या दृष्टीने या दोनही पक्षांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठीची आखणी करण्याचा मनोदय आपल्या कार्यक्रमातून जाहीर केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी नुकताच दापोडी परिसरात आमदार निधीतून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भाजपचे शहर अध्यक्ष महेश लांडगे यांनी मोहननगर परिसरात सुरू केलेले जनसंपर्क अभियान या दोन्ही घटना त्याच पार्श्वभूमीवर घडल्या असल्याची चर्चा शहरात आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आता येत्या महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचे गणित मांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राष्ट्रवादीच्या छत्तीस नगरसदस्यांपैकी अठरा सदस्य भोसरी पिंपरी समाईकात आणि पिंपरी मतदारसंघात आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तर राष्ट्रवादीमध्ये आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे पूर्णतः कार्यरत झाले आहेत.

“अकेला चना भांड नही झोंक सकता!” या न्यायाने पिंपरी मतदारसंघात एकटे आमदार बनसोडे कार्यरत होऊन चालणार नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. मात्र, राष्ट्रवादीला अजून जाग आल्याचे दिसत नाही. भाजप सत्ताधारी असल्याने “मॅन, मनी, मसल” या तीनही पॉवर सध्या भाजपकडे मुबलक प्रमाणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र, पवारांची पॉवर करिष्मा दाखवेल यावर निश्चिंत आहे. राष्ट्रवादीचा एकेकटा स्थानिक नेता आपल्या भागापूरता देखील पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला तर, कदाचित सत्ताधारी भाजपला थोडासा धक्का बसू शकतो. पण हा थोडासा धक्का राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देऊ शकणार नाही. सांघिक, सर्वगामी, सर्वंकष आणि सर्वव्यापी प्रयत्न झाले तरच राष्ट्रवादीची सत्ता कदाचित पिंपरी चिंचवड महापालिकेत येऊ शकते. तशी यंत्रणा कोण उभी करणार आणि त्यासाठी आवश्यक ते कष्ट कोण करणार, हेच अजून शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये निश्चित नाही. नवनायकने पिंपरी मतदारसंघाचे आमदार काहीच करीत नाहीत हे दाखवून दिल्यावर आता राष्ट्रवादीचे शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे आपल्या व्यक्तिगत यंत्रणेसह कार्यान्वित झाले आहेत. मात्र, पक्षाच्या इतर नेत्यांकडून त्यांना योग्य ते सहकार्य मिळण्याची शक्यता धूसर आहे.

तर, भाजपकडे पक्षाव्यतिरिक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण यंत्रणा उपलब्ध आहे. अव्याहत आणि अविरतपणे तळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणाऱ्या या यंत्रणेला रसद आणि जादाचे बळ पुरवले की ती अजून चोख काम करू शकते आणि अशी रसद, बळ सध्या भाजपकडे मुबलक आहे. भाजपने शंभर आणि अधिक नगरसदस्य निवडून आणण्यासाठी पक्षाला कमजोर वाटणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून जुने नवे कार्यकर्ते जोडण्याचे अभियान सुरू केले आहे. अर्थात आपल्यासाठी कमजोर वाटणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या नादात पक्षाची शक्तीस्थाने अबाधित राखण्याचे आणि संघाची पूर्ण यंत्रणा सजग करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. डोके झाकण्याच्या नादात पाय उघडे पडून, पायाखालची माती भुसभुशीत होण्याची भीती भाजपला देखील आहेच. गेल्या साडेचार वर्षाच्या सत्ताकाळात भाजपने अनेक स्वकीय मतब्बरांना आपल्या कुहेतुसाठी जेरीस आणले आहे. सत्ताकाळात आपल्या स्वहितदक्ष कार्यप्रणालीमुळे हे जेरीस आलेले स्वकीय भाजपचे पाय ओढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हेही स्वयंस्पष्ट सत्य आहे.

कमजोर पिंपरी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून भाजपने येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजवलाच आहे. आता आपली शक्तीस्थाने अबाधित राखून भाजपच्या शक्तीस्थानांवर जोरदार प्रहार करण्याची गरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अर्थात हे एकेकट्याने करण्याचे काम नक्कीच नाही. सांघिक प्रयत्न आणि सर्वंकष, सर्वव्यापी कार्यक्रम हाती घेऊन आणि अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने जमा झालेली आणि सांप्रतला आपल्याकडे दाबून ठेवलेली “मॅन, मनी, मसल पॉवर” वापरून केवळ पिंपरी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर, पूर्ण शहरात राष्ट्रवादीने कार्यप्रवण झाले पाहिजे. अर्थात आपल्याला येत्या महापालिका निवडणुकीत खरोखरच सत्ता काबीज करायची आहे काय, याची निश्चिती राष्ट्रवादीने पहिल्यांदा केली पाहिजे.                                                              ———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×