बदल्यांचे राजकारण, आयुक्तांनी निश्चित प्रशासकीय धोरण तयार करणे आवश्यक!

नेमक्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि त्यावर गर्व करणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निश्चित धोरण तयार करण्याच्या मागणीची कुजबुज पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू झाली आहे. नुकत्याच काही कार्यकारी, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या महापालिका आयुक्तांनी केल्या. त्याचबरोबर इतर विभागातीलही काही फुटकळ बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या बदल्या झाल्यावर अनेकांनी नापसंती दर्शवून बदल्या रद्द करण्यासाठी काही ठिकाणी खेट्या मारल्या, मात्र झालेला बदल थांबत नाही, हे लक्षात आल्यावर निमूट बदल्या स्वीकारल्या. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेत, कोणत्याही कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या ही प्रशासकीय आणि म्हणूनच नियमित बाब असली तरी, या बदल्यांवर राजकारण खेळले जाते, हेही सनातन सत्य आहे. बदल्या टाळण्यासाठी आणि आहे त्या ठिकाणचे हितसंबंध टिकविण्यासाठी राजकारण केले जाते, हे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेसाठी नवे नाही. त्यासाठी नियमित आणि निश्चित बदल्यांचे ठोस आणि ठाम धोरण असावे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेत दबक्या आवाजात होत आहे.

बदल्यांचे आदेश मागे घेण्याची नामुष्की गेल्या वेळी तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांना पत्करावी लागली होती. विशेष म्हणजे त्यांनीही त्यावेळी कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. हे कनिष्ठ अभियंते स्थानिक राजकारणाचा अविभाज्य भाग असतात. यांचा थेट संबंध नगरसदस्य, त्यांचे हितसंबंधी, त्यांचे आणि इतर कार्यकर्ते यांच्याशी सातत्याने येत असतो. आपल्या भागातील नगरसदस्य आणि कार्यकर्ते यांना नक्की काय हवे असते आणि ते कसे पुरवायचे याचे चपखल गणित मांडणारा कनिष्ठ अभियंता सगळ्यात यशस्वी आणि लाडका असतो. मग आपल्या लाडक्याला हातचे जाऊ न देता त्याचे आणि आपलेही लाड पुरवून घेण्यासाठी राजकीय मंडळी प्रशासनाला कोलांटउड्या मारण्यास भाग पाडतात. राजकारण्यांचे वरदहस्त प्राप्त झालेली ही मंडळी शिरजोर आणि बेलगाम झाली तर नवल वाटायला नको. फक्त त्यांची बेलगाम शिरजोरी प्रशासकीय आदेश धुडकावण्याएव्हढी वाढू नये आणि त्यासाठीच वेळोवेळी त्यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. आता झालेल्या बदल्या त्यासाठी पुरेशा नाहीत, अजूनही काही मक्तेदार मंडळी ठाण मांडून आहेतच. या कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच निविदा लिपिक ही एक अशीच एकाच ठिकाणी पाय रोवून बसलेली जमात महापालिकेत अस्तित्वात आहे. हे निविदा लिपिक ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील दुवा असतात. सर्व निरोप आणि गरजा या निविदा लिपिकांमार्फत ठेकेदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रघात आहे. या प्रघातातूनच मग संगनमत नावाचा प्रकार उदयास येतो.

“अतिपरीचयात अवज्ञा” नावाचा एक गंभीर आणि गंमतीशीर प्रकार आहे. हा प्रकार कोणत्याही कारभाराच्या गांभिर्याचे मस्करीत रूपांतर करणारा असू शकतो आणि या मस्करी मस्करीत गैरप्रकाराची सुरुवात होते. मग असे गैरप्रकार भ्रष्टाचार, अनागोंदीला लेखी निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे अतिपरिचय टाळला जाणे महत्त्वाचे आणि त्यासाठी नियमित बदल्याही महत्वाच्याच. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेत त्यामुळेच बदल्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा बदल्या निश्चित आणि नियमित होणेही तितकेच महत्त्वाचे आणि त्यासाठी निश्चित आणि नियमित धोरण असणेही त्यामुळे अतिमहत्त्वाचे. राजकीय बापांच्या आशिर्वादाने अतिचापल्य मिळालेल्या या मांजर, बोक्यांच्या गळ्यात घंटा बांधणे म्हणूनच महत्त्वाचे. आता हे असे अति अति महत्वाचे काम सांप्रतच्या महापालिका आयुक्तांनी हाती घ्यावे, हे देखील त्यामुळेच महत्त्वाचे झाले आहे.

प्रशासकीय यंत्रणेपुढे आपला दचकदिवा तेवता ठेवण्याचा प्रयत्न कोणताही राजकारणी सातत्याने करीत असतो. या दचकदिव्याला न दचकता कारभार करणारा अधिकारी यशस्वी अधिकारी ठरतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सत्य, पूर्णत्वाने सत्यात उतरवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असेल, तर ते वावगे ठरू नये. महापलिकेतील सर्व विभागांच्या बदल्यांची एक निश्चित, नियमित, निःसंदेह आणि निरलस पद्धत निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ठाम धोरण ठरविण्याचे भीमदेही काम हाती घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिका प्रशासनात एक उत्तम कार्यपद्धती निर्माण करावी, अशी साधीसुधी अपेक्षा!             ————————————————––—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×