महाराज, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं, कुणाचं फळफळतं, कुणाचं जळफळतं!

सह शहर अभियंत्यापासून लिपिकांपर्यंत अनेक बदल्या, बढत्या आणि खांदेपालट आणि त्याचबरोबरीने काही ठेकेदार, सल्लागारांवर कारवाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने साफसफाईचा धडाका लावला आहे. पण या साफसफाईमूळे अनेकांचे भावी मनसुभे साफ झाले आहेत. कोरोना महामारीने उसंत दिली, तर येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिका निवडणुका होतील आणि तशी उसंत मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्यातरी आहे. अशा अटीतटीच्या वेळी महापालिका प्रशासनाला कोण अवदसा सुचली आणि “बनाबनाया खेल” बिघडून टाकून सगळे कारस्थान ढवळण्याचे काम महापालिका करते आहे, अशी भावना काहींची निर्माण झाली असल्यास नवल नाही. पवनेच्या अलीकडे पलीकडे शहर वाटून घेणाऱ्या महाभागांमध्ये तर ही भावना सर्वात जास्त निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महाभागांचा जळफळाट झाला असल्यास वावगे ठरू नये. अर्थात या सगळ्या बदलामुळे काहींच्या नशिबाचा फळफळाट झाला, हेही तितकेच खरे.

पण, म्हणतात ना की, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं! त्या जळण्या, कळण्यामुळे आता शहर वाटून घेणाऱ्या महाभागांमध्ये उद्विग्नता निर्माण झाली आहे आणि आता ती उद्विग्नता “वड्याचे तेल, वांग्यावर” या पद्धतीने बाहेर येते आहे. प्रशासकीय पातळीवर झालेले हे बदल नदीपालिकडच्या आणि नदीअलिकडच्या दोनही सुभेदार महाभागांच्या आतापर्यंतच्या प्रशासन मुठीत ठेवण्याच्या कार्यक्रमाला मूठमाती देणारे ठरले आहेत. हा मूठमाती देण्याचा कार्यक्रम आपसूक घडतो आहे, की ठरवून, याबाबत नदीपालिकडचे आणि नादीअलिकडचे दोनही सुभेदारांमध्ये साशंकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त ऐकत नाहीत आणि खडा पडला तरी पूर्वी लगोलग खबर देणारी, आतापर्यंत पोसलेली मंडळी ताकास तूर लागू देत नाहीत, आशा अवस्थेत सध्या शहराचे हे दोनही ताबेदार महाभाग अजून उद्विग्न झाले नसतील तरच नवल.

मात्र, आता या महाभागांची ही उद्विग्नता शिवराळ झाली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. अर्थात शिवराळपणा ह्या महाभागांचा तसा स्थायीभाव आहेच, मात्र तो आतापर्यंत भ्रमणध्वनी वरून करण्याची गरज या महाभागांना भासली नव्हती, ती आता भासली असावी. या कारवाई आणि बदलाची इत्यंभूत माहिती असलेले सहायक सध्या या महाभागांच्या शिवराळपणाचे शिकार झाले आहेत. आयुक्त आणि अतिरिक्त यांना आपली महती आणि माहिती समजावून सांगण्यास हा सहायक कमी पडला अगर कामी आला नाही, म्हणून या दोनही मक्तेदार महाभागांच्या शिवराळ दूषणांचा हकनाक बळी ठरला आहे. लगेहात आयुक्त आणि अतिरिक्तांनी आपलीही बदली करून टाकावी अशी उद्विग्न विनंती या सहायकाने आता केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत होत असलेला हा उद्विग्नतेचा घोळ किती खालपर्यंत आणि किती वरपर्यंत जातो हे पुढचा काळच ठरवील. अर्थात, यासाठी महापलिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त किती कार्यकुशल आणि कार्यतत्पर राहतात यावर हे अवलंबून आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापलिकेतील या साफसफाईमूळे राजकीय बापांच्या आश्रयाखाली जगणाऱ्यांची पुरती बोंब झाली आहे. खरे म्हणजे राजकीय बाप असणे हे कोणत्याही प्रशासकीय व्यक्तींसाठी हितावह नसते. करण राजकारणात बदल होत राहणे, हे एक सनातन आणि शाश्वत सत्य आहे. आज ज्या राजकीय बापाची सद्दी आहे, ती तशी कायम राहील याची कोणतीही शाश्वती नसतेच. पण पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकीय बाप असणे हा नियमित प्रघात आहे आणि बदल होणे ही कालपरत्वे घडणारी बाब असल्याने अशा राजकीय बापांना आणि त्यांच्या आश्रितांना होलिकोत्सवात बोंबा मारण्यासारखे मनगटावर चुना घालण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. आता पिंपरी चिंचवड महापलिकेतील ही साफसफाई कोणकोणत्या राजकीय बापांना आणि त्यांच्या कोणकोणत्या आश्रितांना मनगटावर चुना घालण्याची वेळ आणणार आहे, याचे दार्शनिक बनून इतरांनी त्याची मजा घ्यावी एव्हढेच!                                                          ——————————————-–—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×