नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरण विभागाचा सवत्या सुभ्याचा फंडा!
राजकारणातच सवते सुभे असतात, अशी धारणा असलेल्या जनसामान्यांना प्रशासनातही सवते सुभे असू शकतात, याचे प्रत्यंतर देणारा आता पिंपरी चिंचवड महापालिका देत आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी आणि संतपीठासाठी असे सवते सुभे निर्माण करण्यात आले आहेतच. आता नदी सुधार प्रकल्पासाठी नवीन सवता सुभा निर्माण करण्यात आला आहे. खास उद्देश वाहन अगर स्पेशल परपज व्हेईकल अर्थात एसपीव्ही या गोंडस फंड्याखाली निर्माण करण्यात आलेले सवते सुभे, काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपल्या मतलबी कारस्थानांसाठी निर्माण केले आहेत. हे खास उद्देश वाहक, नक्की कसला खास उद्देश ठेवतात आणि हा खास उद्देश नक्की कोणासाठी आणि कसा वापरला जातो यावर सखोल संशोधन केले पाहिजे.
अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेली खास उद्देश वाहन यंत्रणा, महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला छेद देणारी असते. यंत्रणेची उतरंड नाकारणारी ही व्यवस्था निर्माण करताना मनमानी कारभार करण्याची खुली मुभा, एव्हढाच उद्देश असतो. यापूर्वीच्या खास उद्देशाचे वहन करण्यासाठी निर्माण केलेल्या स्मार्ट सिटी अगर संतपीठ यांचा कारभार पाहिला, तर हा उद्देश किती खास आहे आणि त्याचे वहन किती खास पद्धतीने केले जाते, हे स्पष्ट होईल.स्मार्ट सिटी मध्ये आज नक्की काय चालले आहे, निविदा कशा काढल्या, कोण ठेकेदार आहे, तो नेमताना काय निकष लावले, नक्की किती आणि कसे काम झाले याचा कसलाही थांगपत्ता लागू न देता, या स्मार्ट सिटीचा स्मार्ट कारभार चालू आहे. हा चालू कारभार इतका “चालू” आहे, की या चालुपणाची चावी देऊन अनेकांची तोंडे बंद करण्यात आली आहेत.
हाच प्रकार चिखलीच्या संतपीठातही झाला आहे. इंग्रजी भाषेशी सुतराम संबंध नसलेले संत वाङ्मय आणि इंग्रजी भाषेत शिक्षण देणारी सीबीएसई पद्धत, हा बादरायण संबंध जोडून, संतपीठात शाळा सुरू करण्याची “शाळा” करण्यात आली. या संतपीठाच्या शाळेची परवानगी कोणी आणली, सीबीएसईच का, प्रवेश कोणी स्वीकारले, काय निकष आहेत, शाळा शुल्क कोणी ठरवले, शुल्क का घ्यायचे, किती घ्यायचे यापैकी कोणत्याही बाबी, कोणालाही थांगपत्ता लागू न देता ठरविण्यात आल्या आहेत. काही विशिष्ट व्यक्ती आणि संस्था डोळ्यासमोर ठेऊन हे खास उद्देशाचे उद्योग करण्यात आले आहेत.
आता नव्याने सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली खास उद्देश वाहन तयार करण्यात आले आहे. हे खास उद्देश वाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अखत्यारीत असणार आहे, हे एक वेगळेच खास उद्देशाचे वहन आहे. हा खास उद्देश, पर्यावरण विभागाने मोठ्या कारस्थानी पद्धतीने केला असल्याचा संशय निर्माण झाला आहे. जून महिन्यात या खास उद्देशाची पायाभरणी पर्यावरण विभागाने बिनबोभाट करून घेतली. पर्यावरणाचा सवता सुभा निर्माण झाला आहे आणि विशेष म्हणजे आता या विभागातील सर्व अधिकारी या विभागाव्यतिरिक्त इतरत्र बदली अगर बढती मागणार नाहीत, अशी सोय करण्यात आली आहे. थोडक्यात या विभागातील कनिष्ठ, उप, कार्यकारी यापैकी कोणत्याही अभियंत्याची अवस्था “इसके सीवा जाना कहां” करून टाकण्यात आली आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे, नदी सुधार प्रकल्पाचे खास वहन कायम गुलदस्तात राहावे, याची सोय त्याच वेळी करण्यात आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पासाठी निर्माण करण्यात आलेल्या या खास उद्देश वाहक यंत्रणेचे संचालक असणार आहेत. शहराचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे मुख्याधिकारी, पुणे विभागाचे जलसंपदा विभागप्रमुख, शहर अभियंता आदी तेरा मंडळींचे संचालक मंडळ, सर्व बाबींचे निर्णय घेणार आहे. संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिपत्याखाली हा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे कर्जरोखे प्रकरण अलाहिदा संशोधनाचा विषय आहे.
कर्जरोखे घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका अजून कसले, कसले प्रयोग करणार आहे, त्याचा फायदा अगर तोटा कोणाला, या बाबी अलाहिदा ठेऊन कर्जरोख्यांद्वारे निधी उभारला जाणार हे नक्की. राज्य शासन, केंद्र शासन या प्रकल्पाला अनुदान देतील, या अध्याहृत कल्पितावर प्रकल्पाचा डोलारा उभा आहे. तूर्तास कर्जरोखे घेउनच प्रकल्प सुरू केला जाणार आहे. थोडक्यात ऋण धेऊन सण करण्याचा हा आतबट्ट्याचा प्रकार आहे हे महत्त्वाचे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा, तेरा संचालकांच्या नियंत्रणाखाली आणि पर्यावरण विभागाच्या अखत्यारीतील नदी सुधार प्रकल्प शहराच्या हद्दीतील नद्या सुधारणारा ठरेल की महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून, तीन तेरा वाजवणारा, हे देखील काळसापेक्षी आणि अध्याहृतच आहे.
——————————————————-