लोकप्रतिनिधींनी आपल्या नेत्यांचे, काय आणि किती ऐकावे हे ठरविले पाहिजे!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अडकलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंना तात्पुरता जामिन मिळाला आणि तात्पुरता दिलासाही. या छाप्यात प्रत्यक्षात रोख रक्कम स्वीकारणारे लांडगेंचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे आणि इतर तीन लोक अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. घटना घडली, तिचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. शहरभर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या गेल्या. आता या घटनेची न्यायालयीन चिरफाड होईल. मात्र, ही घटना घडण्यामागच्या कारणांचे काय? या कारणांची खरी चिरफाड होणे गरजेचे आहे. “नवनायक” ने ही चिरफाड आणि सत्यशोधनाचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका सगळ्यात महत्त्वाचा बाबीची प्रचिती आली. ती बाब म्हणजे कोणी, कोणाचे, किती ऐकावे याची सद्सद्विवेक बुद्धी प्रत्येकाने वापरली पाहिजे. ही सद्सद्विवेक बुद्धी वापरून स्वतः निर्णय घेणे अगर यंत्रणा चालवणे आवश्यक आहे. अन्यथा असे एखादे कांड होऊ शकते. ज्या कांडाचा परिणाम अगर दुष्परिणाम, निर्णयाला अगर यंत्रणेला जबाबदार असलेल्याला भोगावे लागतात. दुसऱ्या कोणाचे ऐकून अगर त्यांच्या मर्जी आणि म्हणण्यानुसार निर्णय घेणारा अगर यंत्रणा चालवणारा कायम गोत्यात येतो.

लोकप्रतिनिधींनी या बाबीचा विचार केला पाहिजे. एखाद्याच्या अखत्यारीतील निर्णय प्रणाली अगर यंत्रणा दुसऱ्या कोणाच्या मर्जीनुसार आणि हस्तक्षेपाने चालविली जात असेल, तर घात होणार हे निश्चित. नेमका हाच प्रकार झाला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला. स्थायी समितीचे संचालन आणि व्यवहार नितीन लांडगे यांच्या मर्जी आणि निर्णयानुसार झाले असते, तर ही वेळच आली नसती. कदाचित ही बाब एव्हाना नितीन लांडगे यांना कळली असावी. मात्र, आता वेळ निघून गेली आहे. “जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!” या उक्तीप्रमाणे आता नितीन लांडगेंची अवस्था झाली असावी, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांच्या मर्जीने आणि इशाऱ्यावर नितीन लांडगेंच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा कारभार चालत होता, त्यापैकी एक बैलं उधळायला आणि राख्या बांधायला गेले, तर दुसरे आपल्या बिळात लुप्त झाले.

स्थायी समितीचा कारभार नितीन लांडगेंनी दुसऱ्यांच्या हातात सोपवला. या दुसऱ्यांनी कारभारपण करताना आपल्या मालकांच्या तुंबड्या भरल्या. त्यासाठी ठेकेदारांना छळले, या छळण्यामुळे, अनेक ठेकेदार त्रासले आहेत. या त्रासातूनच जाहिरात फलकांचा तो संबंधित ठेकेदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आसऱ्याला गेला. याचे परिणाम मात्र, एकट्या नितीन लांडगेंना भोगावे लागत आहेत. शहर वाटून घेणारे, माजीआजी भाजपाई शहराध्यक्ष आणि त्यांचे बगलबच्चे आता नामानिराळे झाले आहेत. त्यांच्या मर्जी आणि इच्छेनुसार नितीन लांडगेंना स्थायी समितीचा कारभार स्वतःकडे राखता आला नाही. या नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी नितीन लांडगे इतके वाहावत गेले की, इच्छा असूनही आपले स्वीय सहायक बदलणे त्यांना शक्य झाले नाही.

आता नितीन लांडगे यांचा चांगुलपणा आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर लांडगे यांची बेदाग कारकीर्द याची द्वाही देऊन, आपले घाणेरडे राजकारण झाकण्याचा प्रयत्न भाजपाई करीत आहेत. स्वतःला पिंपरी चिंचवड शहराचे मालक समजणारे हे माजीआजी भाजपाई शहराध्यक्ष आता “दूध का दूध, पानी का पानी” म्हणून आपला भ्रष्टाचारी आणि गदळ कारभार झाकण्याचा आणि आपण किती “दूध के धुलें” आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत. मग चांगुलपणा असलेल्या नितीन लांडगे आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या वडिलांच्या कारकिर्दीची काळजी या दोनही आमदारांनी आणि त्यांच्या छोट्यामोठ्या बगलबच्च्यांनी का घेतली नाही, यावर आता नितीन लांडगेंनी स्वतःच आत्मनिरीक्षण केले पाहिजे, हे आगत्याचे. थोडक्यात काय, तर आपले राजकीय नेते आणि त्यांचे लाभधारक बगलबच्चे यांच्या कितपत कच्छपी लागायचे, हे प्रत्येकाने स्वतः ठरविले पाहिजे. अन्यथा कोणात्याही राजकारण्यांचा नितीन लांडगे होऊ शकतो, हे ठरलेले.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×