शहर भाजपाई आपलं ठेवताहेत झाकून आणि राणेंच पाहताहेत वाकून!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली म्हणून अटक झाली. या अटकेमुळे गल्ली ते दिल्ली शिवसेना आणि भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांनी गर्दा केला. या गर्द्यात आपण मागे रहायला नको म्हणून पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंनी देखील शहरातील आजीमाजी महापौर, उपमहापौर, पक्षनेते, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अशा तीस पस्तीस लोकांना घेऊन शहराध्यक्ष आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोनलाचा फार्स केला. मात्र, आपल्या पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केल्यापासून जो शहर विकण्याचा मनसुभा दाखवला आहे, त्याबद्दल काही करण्याची इच्छा एकाही प्रामाणिक भाजपाईंना झाली नाही, हे विशेष. शहर भाजपाई भ्रष्टाचारी आहेत, यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्याने शिक्कामोर्तब झाले आहे. आपल्या या भ्रष्टाचारी कारभारामुळे सामाजिक शांतताच नव्हे, तर संपूर्ण समाज धोक्यात आला आहे, याची किंचितही तमा न बाळगता, राणेंसाठी आंदोलन करण्याचा हा शहर भाजपाईंचा ढालगज प्रकार म्हणजे “आपले ठेवायचे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून!” या सदरातील असल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.

आपणंच घातलेल्या भ्रष्टाचारी सावळ्यागोंधळामुळे आपलेच बुड पेटले असताना, राज्य सरकारच्या बुडाखाली अंधार असल्याचे दाखविण्याचा हा भाजपईंचा प्रयत्न असल्याची चर्चा शहरभर होत आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात शहर भाजपाईंनी हे आंदोलन केले. यावर वरताण म्हणजे या आंदोलनाच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे भाजप शहराध्यक्ष म्हणतात की, राणेंची अटक हा प्रकार निंदनीय आहे, राजकारणाला गालबोट लावणारा आहे आणि या अटकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा समोर येईल. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शहर भाजपाईंच्या समोर आलेल्या चेहऱ्याचे काय, असा सवाल खरे म्हणजे जनसमान्यांनी शहर भाजप आणि त्यांच्या शहराध्यक्षांना विचारला पाहिजे. किंवा कदाचित आता पिंपरी चिंचवड शहर भाजपईंच्या उघड झालेल्या चेहऱ्याव्यतिरिक्त अजून वेगळा चेहरा असल्याचे सूतोवाच शहराध्यक्षांना करायचे असावे. तो अजून वेगळा चेहरा, आतापेक्षा जास्त विदारक आणि कुरूप असू शकेल काय, ही बाब अलाहिदा.

स्थायी समितीची सभा घेण्याचा भाजपाई अट्टाहास?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समिती अध्यक्ष, स्वीय सहायक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आपल्या घरगुती कारणांमुळे स्थायी अध्यक्षांना जामीन मिळाला असला तरी, बाकीचे चौघे अजून न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा परिस्थितीतही दर बुधवारी होणारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा घेण्याचा अट्टाहास सत्ताधारी भाजपाईंकडून करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. थोडक्यात, स्थायी अध्यक्षांचा आपल्या भ्रष्टाचारी खेळात बळी पाडूनही पिंपरी चिंचवड शहर भाजपाई, पुन्हा खेळ जरी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नियमाने स्थायी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत हजर सदस्यांपैकी कोणालाही बहुमताने तात्पुरते अध्यक्ष करता येते आणि स्थायी समितीची साप्ताहिक सभा सुरू होऊ शकते. विकासकामे थांबतील या गोंडस नावाखाली आर्थिक स्रोत आटू नये, म्हणूनचा हा अट्टाहास आहे काय, यावर चर्चा झाली पाहिजे.

छापा कांडाने पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंचे नाक कापले गेले आहे. आता निदान दोन चार आठवडे तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा होणार नाही, अशी अटकळ शहरात लावली जात होती. मात्र, आपल्या रक्ताळलेल्या नाकासह स्थायी समितीची सभा घ्यायचीच आणि खेळ चालूच आहे, असा संदेश शहरवासीयांना द्यायचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून होत आहे. अर्थात ही कारवाई झाल्यानंतर लगेच भाजपाई शहाराध्यक्षांनी नाक वर करून बैलं उधळण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आणि राख्या उत्सव साजरा करून, अशा कारवाया आपल्या प्रसिद्धिलोलुपतेला थांबवू शकत नाहीत, हे स्पष्ट केलेच आहे. त्याचबरोबर कारवाई कोणा एकावर झाली आहे, आपण सुतक का पाळायचे, हा हेतूही स्पष्ट केला आहे. आता पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षांचा ठरवून इतर भाजपाईंना दुर्लक्षित ठेवण्याचा मनसुभा भाजपाईंनी ध्यानात घेतला पाहिजे.

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×