नवनाथ जगताप म्हणतात, चौकशी कसली करताय, नार्को टेस्ट करा, सुरुवात माझ्यापासून करा!

पिंपरी  (दि.२८ ऑगस्ट, २०२१)

शहरातील मोठे नेते घोळ घालायला लावतात आणि पदावरच्या माणसाला त्यांचे गुमान ऐकावे लागते. ही खरी परिस्थिती आहे. पदाधिकारी या नेत्यांचे गुलाम असल्यासारखे, हे नेते आमच्याकडून त्यांना हवे ते करवून घेतात. सर्वच स्थायी समिती अध्यक्षांची चौकशी करा असे सध्या बोलले जात आहे. मी तर म्हणतो, चौकशी कसली करताय, आमच्या नार्को टेस्ट करा, म्हणजे या नेत्यांनी आम्हाला करायला लावलेले घोळ खरेपणाने बाहेर येतील आणि शहरातील सर्वच नेत्यांचे पितळ उघडे पडेल. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मी स्थायी समिती अध्यक्ष होतो. चौकशीची आणि नार्को टेस्टची सुरुवात माझ्यापासून करा. अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नवनाथ जगताप यांनी “नवनायक”शी बोलताना दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहायक आणि इतर तीन कर्मचारी यांच्यावर कारवाई केली. त्या कारवाईनंतर महापालिकेत आणि पिंपरी चिंचवड शहरात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे. कारवाईची ही राळ किती लोकांच्या डोळ्यात अश्रू आणते, हे आता ही चौकशी किती गांभीर्याने आणि चोख होईल यावर अवलंबून आहे. मात्र, भाजपच्या गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वच स्थायीसमिती अध्यक्षांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत सत्ताधारी भाजपचे महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळातीलही स्थायी अध्यक्षांची चौकशी करावी, असे म्हटले आहे. त्यावरून “नवनायक” ला उपलब्ध झालेले माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नवनाथ जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर लगेच सत्ताधारी भाजपच्या दोनहि आजीमाजी शहराध्यक्ष आमदारांनी “दूध का दूध, पानी का पानी” होईल अशी ग्वाही दिली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने स्थायी अध्यक्ष नितीन लांडगे यांना दिलेला अंतरिम जामीन नंतरच्या तारखेला रद्द केला आहे. पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपच्या जिव्हारी लागलेला हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा घाव खोलपर्यंत जखम करणारा ठरला आहे. आपल्या सत्ताकाळात आपण किती भ्रष्टाचारी नंगानाच घातला, याची वाच्यता केली नाही तरी मनोमन खात्री या भाजपाईंना नक्कीच आहे. मात्र आपला घोळगोंधळ लपविण्यासाठी आणि आम्हीच नव्हे तर, सर्वच तसे आहेत, हे दर्शविण्याचा सोसापायी सत्तारूढ पक्षनेते यांनी आतापर्यंतच्या सर्वच स्थायी अध्यक्षांची चौकशी करावी अशी मागणी केली.

ही मागणी करताना पक्षनेत्यांनी दोन्ही आमदारांची परवानगी घेतली आहे काय? – राहुल कलाटे            भाजपचे पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी आतापर्यंतच्य सर्वच स्थायीसमिती अध्यक्षांची चौकशी करावी अशी मागणी करताना नक्कीच आपल्या दोन्ही आमदारांची परवानगी घेतली असावी. हे दोन्ही आमदार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. आपला पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, हे दाखवण्यासाठी तरी, ढाकेंनी चौकशीची सुरुवात आपल्या आमदारांपासून करावी. नामदेवराव ढाके सत्तारूढ पक्षाचे सभागृह नेते आहेत. एक जबाबदार नेते म्हणून त्यांनी केलेल्या मागणीचा जरूर विचार व्हावा आणि सुरुवात म्हणून भाजपच्या दोन्ही आमदारांची चौकशी व्हावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

राहुल कलाटे यांनी भाजपच्या दोनहि आमदरांपासून चौकशीची सुरुवात करावी, या मागणीला सत्ताधारी भाजपाईंकडून सकारात्मक उत्तर मिळण्याची मुळीच अपेक्षा नाही. आपला गेल्या साडेचार वर्षातला कारभार ही मंडळी पक्की ओळखून आहेत. महापालिकेची तिजोरी, आपली वडिलार्जित मिळकत असल्यासारखी सत्ताधारी भाजपाईंनी दोहो हातांनी उधळली आहे. आपले बगलबच्चे आणि हितसंबंधी पोसण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अत्यंत गदळ पद्धतीने वापरल्याचे आरोप भाजपाईंवर होत आहेत. अशा आरोपांच्या सततच्या माऱ्यामुळे भाजपाई सत्तारूढ पक्षनेत्यांनी सर्वांचीच चौकशी करण्याची मागणी केली असावी, असे मत शहरातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

————————————————————

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×