कापलेले नाक लपवण्यासाठी शहर भाजपाईंचा पत्रकबाज तडफडाट!

आपला भ्रष्टाचारी नंगानाच आणि आतापर्यंतचे गदळ राजकारण लपवण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपाईंच्या कोलांटऊड्या सुरू झाल्या आहेत. शहरवासीयांसमोर आपले उघडे पडलेले खरे चेहरे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने कापलेली नाके झाकण्याचा प्रयत्न आता शहर भाजपाई करताहेत. “मी नाही त्यातली……!” हे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणजे सत्ता जाते की काय, या भीतीने झालेला तडफडाट आहे काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधारी भाजपाईंनी पिंपरी चिंचवड महापालिका अक्षरशः नागवली आहे. आपली आणि आपल्या बगलबच्च्यांची खळगी भरण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारताना, आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, याचा विसर या भाजपाईंना पडला होता. तशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने आपले नाक कापले गेले आहे, हेही या मंडळींच्या आता लक्षात आले आहे. कापलेल्या आणि रक्ताळलेल्या नाकांनी मतदारांसमोर जाणे शक्य नाही म्हणून, कारवाईला राज्य शासन जबाबदार असल्याची ओरड ही मंडळी करीत आहेत.

शहर भाजपईंचा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता डागडुजी करण्याचा प्रयत्न भाजपचे नव्याने नियुक्त झालेले प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रक प्रसिद्ध करून केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्यातील महाविकास आघाडी सरकार भाजपचे माजीआजी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांच्यावर दबावतंत्राचा अवलंब करीत आहे. या भाजपच्या माजीआजी शहराध्यक्षांना नामोहरम करण्यासाठी पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोपही, अमोल थोरात यांनी राज्य शासनावर केला आहे. कदाचित अमोल थोरात यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायीसमिती अध्यक्षांवर झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आणि नानासाहेब गायकवाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे यांचा संदर्भ राज्य सरकारशी जोडायचा असावा. मात्र, तसा स्पष्ट उल्लेख करण्याची त्यांची हिम्मत झाली नसावी.

उद्योग यांनी केले, बोल राज्य सरकारला का लावता?

पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांनी कारवाई केलेले नानासाहेब गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मावसभाऊ आहेत. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेले नितीन लांडगे विद्यमान भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेशदादा लांडगे यांचे चुलतभाऊ आहेत. या दोन्ही व्यक्तींवर झालेली कारवाई महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने करायला लावली, अशी ओरड शहर भाजपाईंकडून केली जात आहे. तशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांद्वारे पेरण्याचा प्रयत्न शहर भाजपच्या प्रसिद्धी यंत्रणेद्वारे केला जात आहे. त्यासाठी काही मंडळींचे खिसेही भरण्यात आले आहेत. आपले पितळ उघडे पडल्यावर आलेल्या उद्विग्नतेमुळे असे हडेलहप्पी उद्योग शहर भाजपाईंकडून केले जात आहेत. आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. म्हणून आपली करतूत झाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा शहरवासीयांना मूर्ख बनवण्यासाठी राज्य सरकारला दोष देण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नानासाहेब गायकवाडांचे उद्योग आणि शहर भाजपाईंचा भ्रष्टाचार झाकला जाणारा नाही!

आपल्या स्नुषेचा अपमानजनक छळ गायकवाड कुटुंबियांची गच्छंती करणारा ठरला. आजमितीस भयानक आणि गंभीर असे विसपेक्षा जास्त गुन्हे या कुटुंबाविरुद्ध नोंदले गेले आहेत. सावकारी पाशात अडकवून अनेकांचा या लोकांनी अमानुष छळ केल्याच्या कहाण्या सांगितल्या जात आहेत. राजकीय वरदहस्त वापरून मिळवलेल्या बेहिशेबी संपत्तीच्या जोरावर सावकारी करताना वसुलीसाठी केलेली संघटित गुन्हेगारी यांनी केली. गायकवाडांना असले गलिच्छ उद्योग करण्याची परवानगी कोणी दिली होती, आणखी कशाच्या आणि कोणाच्या जोरावर यांनी हे उद्योग केले आहेत, असा प्रश्न खरे म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासह शहर भाजपाईंनी मनोमन स्वतःला विचारायला हवा. गायकवाडांनी केलेले उद्योग कधी न कधी उघड झाले असतेच, ती सुरुवात त्यांच्या स्नुषेचा तक्रारीपासून झाली एव्हढेच.

नितीन लांडगे यांच्यावर झालेली कारवाई तर, सत्ताधारी भाजपाईंच्या भ्रष्टाचारी कारभाराचाच परिपाक असल्याचे स्पष्ट चित्र आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे असले तरी, कामकाज सत्ताधारी भाजपच्या माजीआजी शहराध्यक्षांच्याच पूर्ण हस्तक्षेपाने केले जात होते. स्थायी समितीच्या वसुलीसाठी या शहराध्यक्षांनी स्वतःची यंत्रणा तयार केली होती. ही यंत्रणा स्थायीसमितीत आलेल्या प्रत्येक ठेकेदाराला जादाच्या टक्केवारीसाठी अक्षरशः नागवत होती, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. आपल्या करारनाम्यावर सहीशिक्के मिळावेत म्हणून स्थायीसमितीची मनधरणी करणारा हा जाहिरात व्यवसायिकही असाच नागवला गेला. कोणताही व्यवसायिक आपले काम होण्यासाठी काही तडजोडी मान्य करतो. मात्र पाणी डोक्यावरून चालले आहे, या जाणिवेने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आसरा घेतला. याला जबाबदार, वसुलीसाठी यंत्रणा उभारणारे आणि स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंना गोत्यात आणणारे माजीआजी भाजपाई शहराध्यक्ष नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

आता नानासाहेब गायकवाडांवर झालेली पोलिसी कारवाई आणि स्थायी समितीवर झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, या दोन्ही बाबी शहर भाजपाईंचा राळ उडालेला आणि रया गेलेला चेहरा दाखवणारा आरसा ठरला आहे. आपला गदळ चेहरा साफ करणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता अक्षरशः भोगणाऱ्या सत्ताधारी भाजपाईंना शक्य नाही. यातही महत्त्वाचे म्हणजे, आरसा खोटे बोलत नाही. म्हणून आरसाच घाण आहे आणि तो राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या काचेचा आहे, अशी ओरड शहर भाजपाईंनी चालवली आहे. मात्र, आरश्याला कितीही दोष दिला, तरी आपला बरबटलेला चेहराच, आपला येत्या महापालिका निवडणुकीत घात करणार आहे, हे शहर भाजपाईंच्या आता पुरते ध्यानात आले आहे. म्हणूनच राज्य सरकारवर आरोप करून नामानिराळे होण्याचा प्रयत्न शहर भाजपाईंनी चालवला आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरवासी एव्हढे बधिर नक्कीच नाहीत. त्यांना सत्ताधारी भाजपचा चेहरा बरबटलेला आहे, की आरसा खोटे बोलतो आहे, यातील तथ्य समजणार नाही असा समज सत्ताधारी भाजपने करून घेऊ नये.

———————————————————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×