शंख करणे आणि घंटा बडवणे, आता भाजपला एव्हढेच काम!

देव आणि देवालये उघडी करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलने केली. भाजपचे आपण शेपूट आहोत, हे पुन्हा एकदा दाखविण्यासाठी इतके दिवस सक्तीच्या मौनात असलेले आणि थोर वगैरे असलेले अण्णा हजारे, देवालये खुली करावीत अशी भाजपची रि ओढते झाले. धर्माचे राजकारण करणाऱ्या समस्त भाजपाईंची, खरे म्हणजे धर्माची दुकाने बंद असल्याने पुरती गोची झाली आहे. देवालये, पुजास्थळे, प्रार्थनास्थळे नसतील, तर समाजमन बिघडवता येत नाही, धर्माच्या नावाखाली राजकारणही करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपला धर्माशिवाय राजकारण करताच येत नाही. त्यामुळे आता विरोध करण्याव्यतिरिक्त कोणताही उद्योग हाती नसलेले समस्त मोकळे भाजपाई देवालये, पुजास्थळे, प्रार्थनास्थळे उघडावीत म्हणून शंख करताहेत आणि घंटाही बडवताहेत. अर्थात पिंपरी चिंचवड शहरासकट राज्यातील भाजपाई शंख करण्या आणि घंटा बडवण्यापूरतेच राहिले आहेत.

देव आणि धर्म यांचे सार्वत्रिकरण करून भाबड्या आणि मूढ जनतेला नादी लावणे, हा भारतीय जनता पक्षाचा जुना फंडा आहे. वस्तुतः कोणी कोणता देव अगर धर्म मानावा, पाळावा, स्वीकारावा ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे. दाखल्यावर हिंदू असलेला व्यक्ती एखाद्या मदारीवर गेला अगर दाखल्यावर मुस्लिम असलेला व्यक्ती एखाद्या देवळात नारळ फोडून आला, तर अल्ला अगर देव त्याच्यावर नाराजही होत नाही, अगर त्याला वेगळे ईनामही देत नाही. त्रास होतो, तो त्यांच्या पुजाऱ्याला अगर भक्तांना. देव आणि देवालये एक विशिष्ट ज्ञातीच्या उदरभरण आणि पोषणासाठी आहेत, हे गेल्या अठरा महिन्यात स्पष्ट झाले आहे. कोरोना महामारीत सर्वच धर्मांची प्रार्थनास्थाने बंद आहेत. पण म्हणून जगरहाटी थांबली नाही. कोरोनासह इतर कारणांनी माणसे मेलीच आहेत, त्याचबरोबर नव्याने जन्मही झाले आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे अगदी सरकारसह सर्वांचीच आर्थिक गणिते पूर्णतः बिघडली आहेत. देव, देवालये, पुजास्थळे, प्रार्थनास्थळे बंद असल्याने काही विशेष फरक पडला नाही. फक्त भटा ब्राह्मणांची चलती बंद झाली आणि धर्माचे राजकारण करणाऱ्यांची पुरती गोची झाली, हे नक्की.

मदिरालये, उपहारगृहे, विक्रीसंकुले, चित्रपटगृहे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, व्यापारसंकुले देश, राज्य, व्यक्ती आणि समाजाच्या अर्थकारणास बढोतरी देणाऱ्या बाबी आहेत. देश आणि राज्याचा महसूल वाढवणाऱ्या या बाबी निर्धोक आणि सुरळीत राखल्याच गेल्या पाहिजेत. शिवाय सामान्य जनजिवनासाठी या बाबी अत्यावश्यक आहेत. देवालये, प्रार्थनास्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यापारउदीम ठप्प आहेत, हे खरे असले तरी, महामारीच्या संकटामूळे हा व्यापारउदीम बंद राहणेच जास्त योग्य आहे. इतर ठिकाणी कोरोना फैलाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करता येतात. मात्र, देवालये आणि प्रार्थनास्थळांवर प्रतिबंध लावले, तर हे धर्माचे तथाकथित ठेकेदार पुन्हा शंख करणार अगर घंटा बडवणारच आहेत. केवळ राज्य शासनाला त्रास देण्यासाठी आणि जनतेला भटकविण्यासाठी भाजप, मनसे आणि तथाकथित समाजसुधारक वगैरे असलेले अण्णा हजारे कमरेचे सोडून सिद्ध झाले आहेत. धर्माचे राजकारण करणे आणि राजकारणात धर्म घुसडणे, असे ढालगज प्रकार करण्यात वाकबगार असलेले भाजपाई आता शंख करण्या आणि घंटा बडवण्यापूरतेच मर्यादित राहीले आहेत.

कोणत्याही देवालय अगर प्रार्थनास्थळांचे षोडशोपचार बंद नाहीत. अगर त्यावर कोणतीही शासकीय बंदी नाही. त्यामुळे पूजाअर्चा अगर प्रार्थना करण्यास प्रतिबंध नाही, हे विशेष. केवळ महामारीमुळे काही निर्बंध घातले गेले आहेत. महामारीची तिसरी लाट देशात निर्माण होण्याची पुरेपूर शक्यता जागतिक स्तरावर वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याची माहिती दिली जात आहे. अशा परिस्थितीत जनजीवन सुरक्षित राखणे महत्वाचे आहे. त्यामुळे ही देवालये, प्रार्थनास्थळे अजून काही दिवस बंद राहिल्याने काही विशेष फरक पडेल, असे नाही. राजकीय कुहेतूने करण्यात येणारी ही आंदोलने आहेतच, शिवाय भाजपच्या दुटप्पीपणाचेही हे द्योतक आहे. एकीकडे केंद्रातील भाजप सरकार, कोरोना महामारीमुळे निर्माण होऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचा विचारपूर्वक सामना करावा, असे निर्देश देत आहे, तर त्याच पक्षाचे महाराष्ट्रातील भाजपाई, देवालये, प्रार्थनास्थळे खुली करावीत म्हणून आग्रही आंदोलने करीत आहेत. ही केवळ राजकीय आसूया नव्हे काय?

पिंपरी चिंचवड भाजपचे गदळ राजकारण!

आपल्या भ्रष्ट अनागोंदी कारभाराने शहर नागवणारे पिंपरी चिंचवड शहर भाजपाई तर केवळ गदळ राजकारणच करताहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पिंपरी चिंचवड महापालिकेत आणि शहराच्या राजकारणात जो भ्रष्टाचारी गदळ गोंधळ भाजपाईंनी घातला आहे, त्यामुळे आता यांच्या नावाने शंख करण्याची आणि घंटा बडवण्याची वेळ शहरातील करदात्यांवर आली आहे. शहर भाजपाईंच्या या कारभारातून सुटका करण्यासाठी देवालाच साकडे घालावे लागेल, अशी परिस्थिती या भाजपाईंनीच निर्माण केली आहे. भाजपाईंच्या कचाट्यातून शहर वाचविण्यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेशिवाय इतर कोणता उपाय या शहर भाजपाईंनी नागरिकांपुढे ठेवलेला नाही. कदाचित त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहर भाजपाई आता देवालये आणि प्रार्थनास्थळे खुली करण्याचा आग्रह धरीत आहेत काय, अशी भावना शहरवासीयांमध्ये दृढ होऊ लागली आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×