एक, दोन, तीन, चार, राजकारण्यांना संभ्रम फार?

बहुसदस्यीय प्रभाग होणार, की एक सदस्यीय वार्ड, यावर अजूनही चर्चा सुरूच असल्याने, सर्वच राजकारणी अजूनही संभ्रमात आहेत. नुकतेच या संभ्रमात वाढ करणारे मतप्रदर्शन करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी संभ्रम मिटला नसल्याचे सूतोवाच केले आहे. काल शुक्रवार २४सप्टेंबर रोजी पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, त्यांनी राज्यातील सत्तेत सहयोगी असलेल्या पक्षांचे वेगळे मत असल्याने, पुन्हा येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुका एक, दोन, तीन की पुन्हा चार उमेदवारांना लढाव्या लागतील याबाबत इच्छूक राजकारण्यांमध्ये फारच संभ्रम आहे. पन्नास टक्के महिला आरक्षण हा अडचणींचा मुद्दा या सदस्यसंख्येचा मुळाशी असल्याची चर्चा आहे. एक, दोन अगर चार सदस्यीय प्रभाग रचना झाली तर, पन्नास टक्के महिला आरक्षण सोपे होऊ शकते. मात्र, तीन सदस्यीय प्रभागात काही ठिकाणी दोन महिला आणि काही ठिकाणी एक, असा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, २०१२च्या महापालिका निवडणुकीत महिला आरक्षण तेहतीस टक्के, म्हणजेच एक त्रितियांश इतके होते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एक महिला उमेदवार असणे, सहजसोपे झाले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण करण्यात आल्याने, पुढच्या म्हणजे २०१७च्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग सोपा झाला. मात्र, चार सदस्यीय प्रभाग हे देखील पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता जाण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याची धारणा शहर राष्ट्रवादीत आहे. चार सदस्यीय प्रभागात एकत्र आलेल्या मोठ्या मतदारसंख्येमुळे आणि प्रभागरचनेत घातलेल्या घोळामुळे, भाजपचा विजय आणखी सोपा झाला. मग अशा परिस्थितीत तीन सदस्यीय प्रभाग करून काय वेगळे घोडे मारले जाणार आहेत, हे अनाकलनीय आहे.

वस्तुतः कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक अगर दोन सदस्यीय निवडणूक कमी कटकटीची होते. इच्छूक उमेदवार वैयक्तिक ताकदीने निवडणूक आवाक्यात आणू शकतात. मात्र, तीन अगर चार सदस्यीय निवडणुकीत राजकीय पक्षाला ताकद लावावी लागते आणि निवडणूक पूर्णतः पक्षीय होते. पक्षीय संघटन आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष कधीही केडर पार्टी नव्हता अगर भविष्यातही तसे केडर निर्माण होण्याची शक्यता नाही. प्रत्येक भागात सुभे निर्माण करणे आणि त्या सवत्यासुभ्याच्या सुभेदारांना एकत्र येऊ न देणे, हे आणि हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख राजकीय धोरण आहे. या सवत्या सुभेदारांनीच राष्ट्रवादीला गोत्यात आणले, हा भाग अलाहिदा!

तळचा कार्यकर्ता अगर पक्षाचा कार्यकर्ता ही बाब तशी भाजप साठी सगळ्यात महत्त्वाची आणि उपयोगी आहे. पक्षीय राजकारण करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षीय आणि समाजशाखा भाजपकडे आहेत. या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या शाखा अगर घटक, कोणत्याही निवडणुकीत पक्षमत तयार करण्यात अग्रेसर असतात. काँग्रेस आणि शिवसेनेतही असे केडर बेस काही प्रमाणात का होईना, पण आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा केडर बेस कधीच तयार होऊ शकला नाही, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. अमुक एकाचा कार्यकर्ता, अमुक एकाचा माणूस, अमुक एक गटाचा प्रतिनिधी, अमुक एकाचा मतदार, अमुक एकाचा बगलबच्चा, नातेवाईक अगर हितसंबंधी, सगासोयरा या प्रकारावरच राष्ट्रवादीचे राजकारण उभे आहे. पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा प्रतिनिधी, पक्षाचा मतदार हा प्रकार राष्ट्रवादीत कधी निर्माण होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ऐन एकविशीत आला, म्हणजेच तारुण्याने मुसमुसलेला झाला. मात्र हे मुसमूसलेपण व्यक्तिवादी अगर व्यक्तिगत मालकीचे आहे, हे त्यातील खरे विदारकपण आहे. हे गंभीर आणि विदारक सत्य जाणून घेऊन, त्यावर ठोस उपाययोजना करून आणि त्यात बदल करून पक्षीय ताकद निर्माण करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी गरज आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×