भुंकण्याचा सल आणि स्मार्टसिटीचा विनयभंग!

हत्तीचे चित्कारणे, वाघाचे डरकाळणे, सिंहाचे दहाडणे, कोल्ह्या, लांडग्यांचे फिस्कारणे, मानवाचे बोलणे, यांप्रमाणेच श्वान प्रजातीतील पशूचे भुंकणे, ही त्या त्या पशूंची बोली या प्रकारातील बाब आहे. आता ही त्या त्या प्रजातीची बोली, दुसऱ्या प्रजातीसाठी वापरली, तर त्यातून गदळ विरोधाभास निर्माण होतो. उदाहरणार्थ हत्तीला फिस्कारणे, वाघाला चित्कारणे, कोल्ह्या, लांडग्यांना डरकाळणे अगर मानवी बोलीला भुंकणे म्हणणे, म्हणजे त्या त्या प्रजातीसाठी सल निर्माण करणारे असू शकते.

विनयभंग ही संकल्पना, विनय या प्रकाराशी जोडली गेली आहे. विनयचा संबंध हा सार्वजनिक जीवनातील नैतिकता आणि सभ्य वर्तनाशी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक पातळीवर नैतिकतेचे आणि सभ्य वर्तनाचे अधःपतन होऊ न देणे म्हणजे, विनयाने वर्तणे असा याचा मूलतः अर्थ आहे. आता जो व्यक्ती अगर समाजघटक वरीलप्रमाणे वर्तत नाही, तो विनयभंग करतो असा याचा साधा सोपा अर्थ आहे.

श्वान प्रजातीच्या बोलीला मानवी बोलीत संबोधित करणे आणि विनयाने असलेले वर्तन त्यागून विनयभंग करणे, किंबहुना, या लेखनाच्या मथळ्यात उल्लेखलेल्या, भुंकण्याचा सल आणि स्मार्टसिटीचा विनयभंग, या बाबींचा एकमेकांशी काय संबंध असा प्रश्न निर्माण होतो. तर, हा संबंध निर्माण झाला, तो नुकत्याच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण आमसभेत चर्चिल्या गेलेल्या भुंकणे, विनयभंग आणि स्मार्टसिटीचा भ्रष्टाचार या विषयांवरून. वस्तुतः या तीन वेगवेगळ्या बाबी असल्यातरी, त्यांचे एकत्रित मंथन करण्याचे कारण म्हणजे, या आमसभेत सर्वसामान्यपणे सुमारे पांच तास झालेल्या समय अपव्ययी चर्चेत या तीनही बाबींवर मल्लिनाथी झाली. कोणाएकने, कोणाएकच्या मानवी बोलीस, भुंकणे हि संज्ञा वापरली. ज्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली गेली त्यांनी आणि ज्यांनी ही संज्ञा वापरली त्यांनी, खरे म्हणजे या संज्ञा वापरण्याची चर्चा खासगीत करण्यासारखी होती.

मात्र, ही संज्ञा ज्या दोन व्यक्तींच्या खाजगी चर्चेचा विषय होती, त्या दोनही लोकांनी याचे सार्वजनिकीकरण करून नैतिकतेचे आणि सभ्य वर्तनाचे अधःपतन गाठले आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. वस्तुतः भुंकणे ही संज्ञा या दोनही मंडळींची नित्याची बाब होती आणि ही दोनहि मंडळी पूर्वी एकत्रितपणे अनेकांवर भुंकली आहेत. कोणाच्या व्यवसायावर भुंकणे, कोणा व्यावसायिकावर भुंकणे, कोणाच्या रंगावर भुंकणे, कोणाच्या सवयीवर भुंकणे, कोणाला बेडूक संबोधून भुंकणे, कोणी विनयभंग केला म्हणून खोटेच भुंकणे, कोणाचा विनयभंग करण्यासाठी भुंकणे, प्रशासनावर भुंकणे, राजकारणावर भुंकणे, सार्वजनिकरित्या भुंकणे, उगाचच भुंकणे, असे भुंकण्याचे अनेक प्रयोग या मंडळींनी केले आहेत.

मग, अचानकपणे या सार्वत्रिक भुंकण्याचा सल निर्माण होऊन, भुंकण्यामुळे विनयभंग झाला असे म्हणण्याची पाळी का आली असावी, हा खरा प्रश्न आहे. तर, एक समर्थाची चाकरी सोडून, दुसऱ्या समर्थाचा पट्टा गळ्यात घातल्यावर, पहिल्या समर्थावर भुंकण्यासाठी शिधा, निधी मिळू लागल्यामुळे भुंकण्याची आर्तता वाढवून भुंकणे भाग पाडले आहे आणि म्हणून ही भुंकण्याची क्रिया या दोनही मंडळींना एकमेकांविरुद्ध वापरावी लागली आहे. आता श्वानाने, श्वानावर भुंकणे इथपर्यंत ठीक होते, मात्र, मानवी बोली त्यागून मानवाने श्वान बोली वापरणे आणि तीही अशी सार्वजनिकरित्या वापरणे, यामुळे विनयभंग झाला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा विनयभंग कोना एकाचा नसून या दोनही श्वान बोली वापरणाऱ्यांनी समस्त शहराचा केला आहे, हे महत्वाचे.

भ्रष्टाचार या प्रकाराची व्याप्ती फार गदळ आणि विदारक अशी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या छपन्न महिन्यांच्या भाजपाई सत्ताकाळात तर, हा भ्रष्टाचार, शिष्टाचार झाल्याची प्रचिती आली आहे. शौचालयापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत कशातही भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींनीच भ्रष्टाचारावर, शिष्टाचारी पद्धतीने भुंकणे, हे या शहरवासीयांचा विनयभंग करणारेच आहे, असे म्हटल्यास , वावगे ठरू नये. स्मार्ट सिटी हा पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात अनेकांच्या तुंबड्या आणि खळगी भरल्या आहेत. आता ज्यांच्या तुंबड्या आणि खळगी कमी भरली अगर इतर ठिकाणी भरूनही या प्रकल्पाचा हिस्सा मिळाला नाही म्हणून उडालेल्या आगडोंबामुळे तिळपापड झाला, अशांनी या प्रकल्पावर भुंकावे, हा श्वान प्रजातीचा विनयभंगच नव्हे काय? आपल्या स्वामिनिष्ठेबद्दल आणि प्रामाणिकतेबद्दल गौरवशाली परंपरा असलेल्या श्वान प्रजातीला, या काही मतलबी आणि स्वहितासाठी स्वाहाकार, भ्रष्टाचार, अनाचार करणाऱ्यांनी अशा प्रकारे आपली बोली वापरल्याचा किती खेदखंत झाला असावा, यावर विचार करून समस्त शहरवासीयांचा नक्कीच खरा विनयभंग झाला आहे.

——————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×