शहर राष्ट्रवादीची खांदेपालट, नवे गडी कोण, राज्य कोणाचे येणार?

“नवे गडी, नवे राज्य” या हिशोबाने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची पुनःश्च सुरुवात करण्याचे मनसुभे जाहीर करण्यात आले आहेत. ही पुनःश्च सुरुवात कितपत परिणामकारक असेल आणि ही नवी पारी खेळण्यासाठी शहर राष्ट्रवादीचा कप्तान कोण, यावर सध्या शहरभर चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक वेळेत झाली तर, राहिलेल्या तीन महिन्यात हा नवा कप्तान कितीसा प्रभावीपणे काम करू शकतो, हा एक अलाहिदा प्रश्नच आहे. त्यातही हा नवा कप्तान कोण, तो कितपत योग्य आहे, सवतेसुभे असलेली राष्ट्रवादीची सुभेदार, वतनदार, मालक, चालक, पालक या कप्तानच्या अधिपत्याखाली काम करतील का, केलेच तर, ते काम आणि त्या कामाची पद्धत नव्या कप्तानाच्या कितपत पचनी पडेल, किंबहुना नवा कप्तान या मंडळींना कितपत पचेल, रुचेल, हे सगळेच प्रश्न निर्माण होतात. अर्थात हा नवा कप्तान कोण, त्याचा बकुब किती, यावर हे सगळे अवलंबून आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, शहर राष्ट्रवादीच्या कप्तानीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. आपापले सुभे सांभाळण्यात आणि मक्तेदारी राखण्यात मश्गुल असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील स्थानिक पुढारी, नेते, आपापल्या डबक्याबाहेर साधे डोकावताही नाहीत, ही आजपर्यंतची पद्धत आहे. त्याही पुढे जाऊन, असेही म्हणता येईल की, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी या शहरात सर्वंकष आणि सर्वसमावेशक नेतृत्व कधी निर्माणच होऊ दिले नाही. ज्या कोणी आपल्या डबक्याबाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला, त्याच्या डोक्यावर लगेच टपली मारण्याचा प्रघात राष्ट्रवादीत आहे. तरीही कोणी जास्तच वळवळू लागला तर, डोकी मारण्याचाही प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत ज्याचे सर्व ऐकतील आणि जो सर्वांचे ऐकेल असा नवा खेळगडी कोण, यावर सध्या शहर राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी अडचण म्हणजे, या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्या, नेत्या, श्रेष्ठींना नैतिक अगर वैचारिक अशी नीती, नियम, नियत आणि निष्ठा नाही. दुसऱ्या कोणत्या पक्षात जमणार नाही अगर आपल्याला जमवून घेणार नाहीत, म्हणून राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारणाऱ्यांची संख्याच मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची शिडी करून पुढे जायचे आणि इथल्या पायऱ्या संपल्या अगर पुढची पायरी गाठणे दुरापास्त झाले, की शिडी बदलायची, असाच विचार करणाऱ्यांची संख्या राष्ट्रवादीत जास्त आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नीती, नियम, नियत आणि निष्ठा पाळणाऱ्यांचे कितपत ऐकले जाईल, याबाबतही शंकाच आहे. या सर्व विवेचनाचे कारण म्हणजे, जे नवे गडी आता नव्याने डाव मांडतील यांच्या पुढील आव्हानांची माहिती त्यांच्यापर्यंत जावी. यातही ज्यांचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य मतदार भरोसा धरतील अगर ज्यांच्यावर राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी भरोसा करतील, अशी माणूसे आज शहर राष्ट्रवादीची खरी गरज आहे.

आज शहर राष्ट्रवादी काँग्रेस एका संक्रमण अवस्थेत आहे. नव्याने उभारी घेण्याची ही अवस्था मोठी बिकट आणि किचकट असते. गेल्या छपन्न महिन्यांच्या भाजपाई कारभाराला आणि कारभाऱ्यांना कंटाळलेले, त्रासलेले, पिडले अगर पिळले गेलेले आणि तिथली शिडी ज्यांच्यासाठी कुचकामी आहे, असे अनेक जण राष्ट्रवादीच्या घड्याळात आपली वेळ साधण्याच्या प्रयत्नात आहेत. यात आपमतलबी, गैरमतलबी, स्वाहाकारी, ढालगज, अनाचारी, भ्रष्टाचारी मंडळीही असण्याची शक्यता आहेच. त्याचबरोबर स्वगृही परतण्याची इच्छा असलेलेही आहेतच. या सर्वांना तपासून, सुलाखून घेण्याचा वकूब आणि तयारी असलेला कप्तान ही शहर राष्ट्रवादीची आजची गरज आहे. या सर्व निकषांचा विचार करता, या निकषांबरहुकूम ठरणारे अगर त्याच्या जवळपास जाणारे व्यक्तीमत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाश्रेष्ठींना शोधावे लागेल.

सांप्रतला, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, मयूर कलाटे आणि नाना काटे ही चार नावे आहेत. महिला शहराध्यक्षा म्हणून ज्येष्ठ नगरसेविका अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर आणि युवक शहराध्यक्ष पदासाठी शहरातील दिग्गज नेते आझमभाई पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे अथवा सध्याचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर या नावाची चर्चा आहे. याच नावांपैकी कोणाचे तरी पदाग्रहण होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता वर उधृत केलेली आव्हाने कोण समर्पकपणे पेलू शकेल, हे कालदर्शी आहे. “आले देवाजींच्या मना” या न्यायाने राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार, त्याचबरोबर राज्य प्रांताध्यक्ष जयंत पाटील कोणाच्या गळ्यात माळ घालतील हे पाहणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान का करावे, याचे कारण कोण आणि कितपत निर्माण करील, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता मिळवू शकेल अगर कसे हे अवलंबून आहे.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×