नामदार अजितदादांचा बाळावलेला खोकला आणि शहर राष्ट्रवादीचा आवळलेला गळा!
ते आलेच नाहीत, त्यांच्यापुढे काय सांगायचे, कसे सांगायचे, कोणी सांगायचे, किती सांगायचे याचे सगळे मनातले मांडे त्यामुळे मनातच राहिले. आता पुन्हा संधी केव्हा, याची वाट पाहणे नशिबी आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार येणार म्हणून अनेकांनी केलेल्या तयाऱ्या, अक्षरशः वाया गेल्या. अजितदादांचा खोकला अचानक बळावला आणि सगळेच मुसळ केरात गेले. त्यांना भेटण्याच्या तयाऱ्या करणाऱ्यांमध्ये नुकतेच राजीनामे द्यायला सांगितलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, महिला आणि युवक शहराध्यक्षांसह, इच्छुकांनी देखिल तयारी केली होती. पण ज्यांच्यासाठी एव्हढ्या तयाऱ्या केल्या, ते आलेच नाहीत, त्यामुळे आता शहर राष्ट्रवादीचा गळा आवळला गेला आहे. त्याचबरोबर आता उभीआडवी राष्ट्रवादी फाडता येईल, या तयारीत काही पगारी पत्रकारही होतेच, शिवाय घाईघाईत निवेदने तयार करून तयारीत असलेले कार्यकर्तेही होते. पण नामदार अजितदादांचा खोकला बळावला. आता हा खोकला राजकीय होता की खरोखरचा, यावर शहरात चर्चा सुरू आहे.
पूर्वनियोजित म्हाडाच्या कार्यक्रमात लॉटरी लागलेल्यांना घराची चावी वाटप करण्याचा कार्यक्रम शनिवारी होता. या कार्यक्रमात नामदार अजितदादा आले नाहित. त्यामुळे मसलत आणि कैफियत कोणासमोर मांडायची, या चिंतेत असलेल्या शहर राष्ट्रवादीत सामसूम आहे. नको त्यावेळी शहर राष्ट्रवादीत असलेली ही स्मशान शांतता, पिंपरी चिंचवड शहरवासीयांना खलते आहे. येत्या पाच दिवसात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, महापालिका निवडणुका वेळेत होण्याची शक्यता निर्माण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत खांदेपालटाची शक्यता निर्माण करून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्षांसह युवक आणि महिला शहराध्यक्षांचे राजीनामे घेतले. मात्र आता पुढे काय, याबाबत गेल्या सात दिवसात कोणताही निर्णय नाही. ही बधिरावस्था लवकर दूर झाली नाही, तर पुन्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अराजकता पसरेल, याची जाणिव राष्ट्रवादीच्या राज्यातील पक्षश्रेष्ठींना नाही काय, असा प्रश्न सांप्रतला निर्माण होतो आहे.
एकीकडे भाजपाई शहराध्यक्षांचा धुमधडाक्यात साजरा होणारा वाढदिवस आणि दुसरीकडे शहर राष्ट्रवादीतील स्मशान शांतता, हे चित्र राष्ट्रवादीसाठी फारसे आशादायक नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हातातली सत्ता भाजपने शब्दशः हिसकावून घेतली. आता पुन्हा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणारी शहर राष्ट्रवादी अशा प्रकारे वेळ वाया घालवीत असेल, तर या शर्यतीत टिकणार कशी, यावर राष्ट्रवादीला मतदान करू इच्छिणारे मतदाते संभ्रमात आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेली भाजप आणि सत्ताकांक्षी राष्ट्रवादी, यांची ही सत्तेची शर्यत पारंपरिक ससा कासवाची शर्यत ठरणार असल्याची भावना तर शहर राष्ट्रवादीत नाही ना, याबाबत आता शहरात चर्चा सुरू आहे. ससा कासवाच्या या पारंपरिक गोष्टीतला ससा अतिआत्मप्रौढीने झोपला आणि मंदगती कासव जिंकले, अशी ती गोष्ट आहे. मात्र याची सर्व मदार ससा झोपेल, यावर आहे. मग, ससा झोपलाच नाही, तर या शर्यतीचा निर्णय काय, याचा विचार शहर राष्ट्रवादीने, किंबहुना, राष्ट्रवादीच्या पक्षाश्रेष्ठींनी केला आहे काय, हा खरा संशोधनाचा विषय आहे.
———————————————————