शहरासाठी भाजपाई घेताहेत आंबेडकरी विचारांच्या चेहऱ्याचा शोध!

प्रत्येक समाजघटकाशी संबंध प्रस्थापित करून, पक्षाचे धोरण त्या समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य कार्यकर्ता, व्यक्ती शोधणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे समिकरण असते. जात, प्रांत, जिल्हा, भाषा यांचा भेदभाव नसल्याचे प्रत्येक राजकीय पक्ष दाखवत असला तरी, राजकीय पटलावर या बाबी विचारात घेऊन व्यक्ती सांभाळल्या जातात, हे उघड गुपित आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाई या वर्गवरीप्रमाणे व्यक्ती नेमण्याचा प्रयत्नात आहेत. समाजातील प्रत्येक जात, भाषा, प्रांत, जिल्हा यांसाठी सांप्रतला शहर भाजपकडे चेहरे आहेत. मात्र, शहर पातळीवर उपयोगी पडेल असा आंबेडकरी विचारांचा चेहरा शहर भाजपाईंना अजूनही सापडलेला नाही. आक्खा आठवले गट भाजप बरोबर असतानाही, भाजपचा म्हणून एखादा आंबेडकरी चेहरा सध्या शहर भाजपाईंची गरज असून, तो शोधण्याचे निर्देश शहरातील नेत्यांना, राज्यातील पक्षाश्रेष्ठींनी दिले असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. स्थानिक नेत्या, पुढाऱ्यांनी एखादे नाव सुचवावे अगर प्राथमिक बोलणी करावीत, पुढची चर्चा करण्याचे आणि आगामी राजकीय किंमत आणि हिम्मत देण्याचे आश्वासन, दस्तुरखुद्द राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते, देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत दिले जाणार आहे.

सध्याच्या विद्यमान नगरसदस्यांमध्ये चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना तर पंधरा भाजप नगरसदस्य अनुसुचित जातीचे आहेत. शिवाय पिंपरी चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी एक पिंपरी मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे, येथे राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. भाजपकडे असलेल्या अनुसुचित जातीच्या नगरसदस्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सांगणारे आहेत, मात्र त्यातील काही बदनाम आहेत आणि काही कुचकामी आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीशी संबंधित एकही व्यक्ती भाजपकडे नाही. शहराच्या लोकसंख्येत सुमारे अठरा टक्के हिस्सा असलेल्या या समाज घटकामध्ये वावरून त्यांच्यापर्यंत भाजपाई धेय्यधोरणांची माहिती समर्पकपणे पोहोचविणारी व्यक्ती ही शहर भाजपची नितांत गरज आहे.

अशी व्यक्ती, तसे पाहिले तर मागच्या विधानसभा निवडणुकीपासून शोधण्याची मोहीम शहर भाजपाई राबवित आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अमर साबळे या नवख्या उमेदवाराला भाजपने मैदानात उतरवले होते. मात्र, अमर साबळे हे एकदमच नवखे असल्याने त्यांना बरीच मजल मारूनही हार पत्करावी लागली होती. त्यानंतर अमर साबळे यांना राज्यसभेवर घेऊनही काही विशेष कामगिरी त्यांच्याकडून घडू शकली नाही. याचे मूळ कारण म्हणजे, ते आंबेडकरी चळवळीच्या कधीही संपर्कात नव्हते. त्यामुळे शहरातील अगर अन्यत्रच्याही आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी सांगणाऱ्या नेत्या, कार्यकर्त्यांना ते भाजपशी जोडू शकले नाहीत. पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात भाजपला अशा व्यक्तींची कमतरता जाणवत आहे. ही कमतरता अमर साबळे यांच्यानंतर पुन्हा भरून काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. अर्थातच पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात, आंबेडकरी चळवळीशी संबंधित व्यक्ती भाजपच्या झेंड्याखाली आणण्याचे प्रयत्न, सुप्तपणे आणि गुप्तपणे केले जात आहेत.

राष्ट्रवादीलाही आंबेडकरी विचारांच्या चेहऱ्याची गरज!

पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी भाजपला मतदान करायचे नाही असे ठरवले, तरी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील का मतदान करावे, याचे कारण निर्माण करण्यात राष्ट्रवादीची मंडळी कुचकामी ठरली आहेत. तशातच नागरिकांचा मागासवर्ग या संवर्गाचा स्थानिक निवडणुकीतील सहभाग अजून स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे किमान अनुसुचित जातींच्या संवर्गाची मोट बांधून ती कार्यान्वित करणे, ही शहर राष्ट्रवादीची देखील पराकोटीची गरज आहे. मात्र, सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या मंडळींनाही मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी काही विशेष कार्यक्रम राष्ट्रवादीकडे नाही. उलट अनुसुचित जाती संवर्गातील नगरसदस्यांना निर्णय प्रक्रियेत घेणे तर दूरच, नीटसे कामही करू दिले जात नाही, ही सांप्रतची वस्तुस्थिती आहे. शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे आणि चार नगरसदस्य अनुसुचित जाती संवर्गातील आहेत. मात्र, या सर्वांनाच स्थानिक राजकारणापासून आणि निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे काय, असा संशय आहे. आंबेडकरी चळवळीशी नाळ बांधलेली अगर आंबेडकरी विचारांचा पाईक असलेली व्यक्ती, ही राष्ट्रवादीची देखील गरज आहेच.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×