शहरात राष्ट्रवादीची सत्ता कोणाला हवी, अजितदादांना की स्थानिक लाभधारकांना?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्वर्यू शरद पवार यांच्या येत्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. महापालिकेत चौतीस नगरसदस्यांचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शहर कार्यकर्त्यांच्या बैठकीला केवळ तीन नगरसदस्यांनी हजेरी लावल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नगरसदस्यांना शरद पवार यांच्यासाठी वेळ नसेल, तर शहरासाठी वेळ कसा काढणार याबाबत शहरवासीयांच्या मनात सांशकता निर्माण झाल्यास वावगे ठरू नये. काही नगरसदस्यांना कार्यबाहुल्य असेलही, मात्र चौतीस पैकी चार हे जरा अतिच झाले, हेही तितकेच खरे. गेल्या महापालिका निवडणुकीत सत्ता हातातून गेल्यामुळे आलेली राष्ट्रवादीतील ही उदासिनता काही महिन्यावर पुन्हा महापालिका निवडणूक आली तरी गेलेली नाही, हेच यातून प्रतित होते आहे. महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राष्ट्रवादीला मग, महापालिकेत सत्ता कोणासाठी हवी, या उदासीन लाभधारकांसाठी, की नामदार अजितदादा पवार यांच्यासाठी, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यावर देखील सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना सत्तेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यातील काहींचे सत्ता नसली तरी फारसे काही नुकसान झालेले नाही. शिवाय आपले जुने मित्र आणि एकमेकात गुंतलेले नातेवाईक, भाजपच्या झेंड्याखाली सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या काही मंडळींना सत्ता नसल्याचे दुखः झाले नाही. भाजपाई सत्ताधाऱ्यांनीही प्रमुख विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादीचा असलेला फुगा, त्यांना दिलेल्या अतिरिक्त लाभाच्या टाचणीने फुस्स्स करून टाकला. त्यामुळे हवा सोडलेला फुगा जसा इतस्ततः भीती दाखवत फिरतो आणि हवा संपली की, उगाचच ताणलेला रबर होऊन कचऱ्यात जमा होतो, तशी काहीशी अवस्था सत्ताधारी भाजपाईंनी राष्ट्रवादीची करून टाकली आहे. मात्र, स्वतः सत्तेत असणे आणि सत्ताधाऱ्यांचे लाभधारक असणे, यातील फरक न जाणवलेल्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहरात स्वतःची संभावना हवा काढलेल्या आणि कचऱ्यात जमा झालेल्या फुग्यासारखी करून घेतली आहे.
आता महापलिकेतील सत्ताधाऱ्यांनी पाडलेले भोक बुजवून अगर लिपून, पुन्हा या मरगळलेल्या फुग्यात हवा भरणारा “मसीहा” यायची ही राष्ट्रवादीची मंडळी वाट पाहात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार अजितदादा पवार हे आता आमचा “मसीहा” आहेत, या धारणेने राष्ट्रवादी अजूनही निवांत आणि निसूर आहे. या निवांत निसुरपणातूनच अगदी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठरविण्याच्या बैठकीला या मंडळींनी पाठ दाखवली आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा ठरवतील, अजितदादा करतील, अजितदादाच पुन्हा सत्ता आणतील, आपण का उगाच स्वतःला शिणवायचे, ही भावना या उदासिनतेमागे असल्याचा प्रत्यय येतो आहे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची ही उदासिनता घालविण्याचा प्रयत्न म्हणून अजितदादांनी अक्षरशः शहर राष्ट्रवादीच्या मुख्य, महिला आणि युवक अध्यक्षांना राजीनामे देण्याचे निर्देश दिले.
यापूर्वी शहरवासीयांचे मंतव्य जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी शासनाचा थेट संपर्क व्हावा म्हणून, नामदार अजितदादांनी एक शासकीय अधिकारी दर सोमवारी अर्धा दिवस शहरात बसविण्याचा निर्णय घेतला. वस्तुतः किंकर्तव्यविमूढ शहर राष्ट्रवादीला अजितदादांनी दिलेली ही चपराक होती. राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्थानिक नेते कुचकामी आहेत, हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, त्यातूनही शहर राष्ट्रवादी शहाणी झाली नाही, हे विशेष. काही तोंडदेखली आंदोलने करून, आपली निष्क्रियता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न शहर राष्ट्रवादीने केला. मात्र, त्या आंदोलनात नाचण्या बागडण्या व्यतिरिक्त सत्ताधारी भाजपाई अडचणीत येतील, असे काही झाले नाही. सत्ताधाऱ्यांच्या अतिरिक्त लाभाचा लाभ घेऊन सुस्तावलेल्या या मंडळींचा निवांत निसुरपणा काही दूर झाला नाही. राष्ट्रवादीची सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेत पुनःप्रस्थापित करण्यासाठी आता अजितदादाच “मसीहा” बनून येतील, याची वाट सध्यातरी समस्त शहर राष्ट्रवादी पाहात आहेत, बाकी सर्व आलबेल!
————————————————————