अजित गव्हाणेंनी केलेला कार्यक्रम, भोसरीच्या भाजपाईंना पोटसुळ?

आपलाच पार्श्वभाग सगळ्यात जास्त लालचुटुक आहे, इतरांचा मात्र काळाबेंद्रा, अशी मर्कटप्रौढी भोसरीच्या भाजपाईंमध्ये सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणी काही चांगले करायला गेले, की या भोसरीच्या भाजपाईंना पोटसुळ निर्माण होतो. स्वतःला भोसरीचे तारणहार समजणारे हे भोसरीकर भाजपाई आणि त्यांचे डावेऊजवे आता पोटसुळ झाल्याने गडबडा लोळत आहेत, असे दृश्य निर्माण झाले आहे. भाजपाई आमदार आणि त्यांची पगारी प्रसिद्धी माध्यमे या पोटसुळामुळे किती बद्ध झाली आहेत, याचा प्रत्यय नुकताच भोसरीच्या सामान्यजनांना झाला. निमित्त होते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा थेट लाभ भोसरीकरांना, अजित गव्हाणेंनी दिला. त्यासाठी देखणा आणि आटोपशीर कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर भोसरीच्या भाजपाईंचा पोटसुळही उठला.

आयुष्यमान भारत या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल माहिती देताना अजित गव्हाणेंनी ही योजना सर्वसामान्यांना सुलभ आणि सुकर वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत ९३७ वैद्यकीय सुविधा आणि १८६२ वैद्यकीय प्रक्रिया, याशिवाय पाच लाख रुपायांपर्यंतचे वैद्यकीय विमा संरक्षण देण्यात येते. अशी ही योजना, सध्याच्या अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय अडचणींना सामोरे जाताना सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी दिलासादायक आहे. या योजनेचा लाभ परिसरातील सामान्यजनांना मिळावा म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून अजित गव्हाणे यांची यंत्रणा राबते आहे. या यंत्रणेने किचकट तरीही लाभदायक असलेल्या या योजनेचा लाभ जवळपास सतराशे लोकांना मिळवून दिला. त्यासाठी लागणारा खर्च अजित गव्हाणे यांनी व्यक्तिगत पातळीवर केला आहे. त्यामुळे गरजूंना या योजनेचा लाभ आजच्या आपत्कालीन परिस्थितीत मिळवून देणाऱ्या अजित गव्हाणेंचे कौतुक केले जात आहे. आपल्याव्यतिरिक्त इतर कोणालाही, कोणीही चांगले संबोधलेले भोसरीच्या भाजपाईंना आणि त्यांच्या बगलबच्चे प्रसिद्धी माध्यमींना खपत आणि रुचत नाही. त्यातूनच उठलेल्या पोटसुळामुळे या भाजपाईंनी आपली पगारी प्रसिद्धी माध्यमे अजित गव्हाणेंच्या अंगावर भुंकण्यासाठी सोडली आहेत.

या पगारी प्रसिद्धी माध्यमांनी आता, अजित गव्हाणे भाजपच्या योजनांचा कसा पुरस्कार करताहेत, ते भाजपच्या कसे फायद्याचे आणि राष्ट्रवादीला अडचणीत टाकणारे आहे, असा टाहो फोडण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कशी भाजपाई योजनेंची भलामण करताहेत, अशी मल्लिनाथाही ही मंडळी करताहेत. वस्तुतः या योजना सरकारी आहेत, करदात्या नागरिकांच्या पैशातून या आमलात येतात, या काही भाजपच्या खाजगी आणि पक्षीय योजना नाहीत, याचे भान आणि ज्ञानही या पगारी प्रसिद्धी माध्यमांना नाही. अर्थात पगारी असल्याने, भोसरीचे भाजपाई सांगतील तेच आणि तसेच करण्यासाठीच पगार मिळत असल्याने, बहुदा या प्रसिद्धी माध्यमांचाही नाईलाज झाला असावा. या व्यतिरिक्त भोसरीच्या भाजपाईंचा पोटसुळ अजून वेगळाच आहे. गेला महिनाभर भाजपच्या शहराध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घातलेला धुडगूस आणि घोळगोंधळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक, अजित गव्हाणेंच्या, जनतेला थेट लाभ देणाऱ्या या एकाच कार्यक्रमामुळे फिका आणि निष्फळ ठरला, ही भावना भाजपाईंमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली पगारी प्रसिद्धी माध्यमे अजित गव्हाणेंच्या मागे सोडून देण्याचे उद्योग या भोसरीच्या भाजपाईंनी केले आहेत.

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

×