कुत्र्यांसह शहराची भाजप प्रणित नसबंदी आणि प्रसिद्धीलोलुप, आपमतलबी राजकारण!
नसबंदी, एक अत्यावश्यक बाब, नको असलेल्या बाबीची पुनरुत्पत्ती अगर पुनर्निर्माण थांबविणारी शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया करून समाजविघातक अगर समाजाला पिळणाऱ्या, पिडणाऱ्या बाबींची उत्पत्ती थांबविणे, ही काळाची गरज आहे. घरात, खाणाऱ्या तोंडांपासून अगदी रस्त्यांवर भटकणाऱ्या कुत्र्यांपर्यंत, नसबंदी झालीच पाहिजे, यावर कोणाचेही दुमत नाही. मात्र, समाजाच्या भल्यासाठी नसबंदीचा निर्णय घेतल्यावर, ती करताना खोटेपणा झाला तर काय अगर काही समाजहिताच्या बाबींची चुकून अगर जाणूनबुजून नसबंदी झाली तर काय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका वर्तुळात गाजत आणि वाजत असलेला, भटक्या कुत्र्यांची नसबंदी हा असाच एक विषय. प्राणी हक्क सुरक्षा कायदा आणि तत्संबंधीचे नियम असे सांगतात की, भटक्या कुत्र्यांना मारून टाकत येत नाही. त्यामुळे त्यांची पुनरुत्पत्ती होऊ नये म्हणून, त्यांची नसबंदी करून, त्यांना सोडून देण्यात यावे असा कायदा आहे.
या कायद्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम काही खाजगी संस्थांना दिले होते. नसबंदी झालेल्या कुत्र्यांची खोटी संख्या देऊन या संस्थांनी अगर त्यांच्यापैकी काही संस्थांनी महापालिकेला लुबाडल्याचा आरोप केला जात आहे. त्याही पुढे जाऊन यांपैकी एक अगर अनेक संस्था महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संबंधित असून, भाजपच्या काही लोकांनी काम दाखवून आपल्या तुंबड्या भरल्याची बोंब आहे. याबाबत खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी नेमलेल्या संस्थांनी गेल्या जानेवारी २०२० पासून सप्टेंबर २०२१ या एकवीस महिन्यांच्या कालावधीत ४१,७०२ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा केला असला तरी, नसबंदी खरोखरच झाली आहे काय, हे तपासण्याची पद्धत आणि यंत्रणा नसल्यामुळे ही आकडेवारी खोटी असण्याचीआणि त्यामुळेच काही लोकांना अतिरिक्त फायदा मिळाला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुत्र्यांच्या नसबंदीची घोळ घालणारी आकडेवारी!
एकवीस महिन्यात सुमारे बेचाळीस हजार कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागातील आकडेवारीत आहे. सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये देखील या विभागाने काम केले असे गृहीत धरले तरी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आणि कमी मनुष्यबळ व सुविधांमध्ये हे अशक्य काम, त्यांनी करून दाखवले असेल तर, त्यांना निश्चितच गौरविले पाहिजे. महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीसाठी चार संस्थांना विभागून काम दिले होते. सोसायटी फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल, उदगीर, लातूर, एनीमल वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई, जेन्सिस स्मिथ एनीमल वेल्फेअर ट्रस्ट, सातारा या तीन मूळ संस्थांमध्ये मे २०२० पासून मे २०२१ पर्यंत सामील झालेली जीवरक्षा एनीमल वेल्फेअर ट्रस्ट, पुणे ही चौथी, अशा चार संस्था कुत्र्यांच्या नसबंदीचे काम करीत होत्या. सुरुवातीच्या तीन संस्थांनी एकवीस महिन्यात अनुक्रमे ११६४२, ११२०६, ११८३४ तर चौथ्या जीवरक्षाने एक वर्षात ७०२० इतक्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते.
थोडक्यात प्रत्येक संस्थेने दररोज कोणत्याही सुट्ट्या न घेता साडेपाचशे ते साडेसहाशे कुत्र्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता यातील घोळ असा की, एक शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे सवा ते दीड तास लागतो, कारण कुत्र्याला भूल देणे, नर असेल तर त्याचे वृषण काढणे आणि मादी असेल तर तिचे गर्भाशय काढणे, परत टाके टाकून जखम बांधणे, हि सगळी प्रक्रिया या शस्त्रक्रियेत करावी लागते. यानुसार २४×७ काम केले तरी जास्तीत जास्त सोळा शस्त्रक्रिया होऊ शकतात, मग या संस्थांनी प्रत्येकी एक शस्त्रक्रिया मेज वापरून दिवसाला वीस ते एकवीस शस्त्रक्रिया कशा केल्या, हे गणित अतर्क्य आहे. यापेक्षा खोलात गेले तर हि सर्वच आकडेवारी फोल ठरते. पिंपरी चिंचवड महापालिकेकडे या संस्थांना कुत्रे पकडून आणून देण्याची जबाबदारी होती. महापालिकेकडे त्यासाठी दोन गाड्या उपलब्ध होत्या, या दोन गाड्या सोळा तास काम करूनही चाळीसपेक्षा जास्त कुत्रे पकडू शकत नाहीत. मग सर्व संस्थांनी मिळून दिवसाला साठ ते पासष्ट शस्त्रक्रिया कशा केल्या हे अनाकलनीय आहे. थोडक्यात अगदी २४×७ काम करूनही या संस्था ही आकडेवारी गाठू शकत नाहीत, हे निखालस सत्य आहे.
कुत्र्यांच्या नसबंदीत भाजपाई हस्तक्षेप?
एका शस्त्रक्रियेसाठी महापालिकेने या सर्वच संस्थांना नऊशे नव्याण्णव रुपयांचा दर निश्चित केला आहे. त्यानुसार ४१७०२ कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी महापालिकेला ४,१६,६०,२९८/- रुपये मोजावे लागले आहेत. मात्र, यातील निम्मी आकडेवारी खोटी असल्याचे स्पष्ट होत असल्याने, सुमारे दोन कोटी आठ लाख रुपये कोणाच्यातरी तुंबड्या भरण्यात खर्च झाले आहेत, हे नक्की. आता याचे मूळ लाभधारक कोण यावर खरे म्हणजे चर्चा झाली पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर, योगेश बहल यांनी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर भाजपचे पदाधिकारी यातील एका संस्थेच्या भ्रष्टाचाराचे लाभधारक असल्याचा आरोप केला आहे. मात्र, इतर तीन संस्थांची आकडेवारी देखील खोटीच आहे, याकडे त्यांनी जाणूनबुजून अगर नजरचुकीने दुर्लक्ष केले असावे काय, हे कळण्यास मार्ग नाही. तरीही त्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आकांडतांडव करून ” मी नाही त्यातला” सांगण्याचा गदळ प्रकार केला. मात्र, कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार झालाच आहे, हे आकडेवारीच स्वयंस्पष्ट करते आहे. त्यातही या चार संस्थांपैकी एक संस्था नंतर या कामात, अगदी कोरोना महामारी उच्चांकावर असताना घुसवली गेली, हेही स्पष्ट होत आहे. मग ही चौथी संस्था घुसवण्यासाठी कोणी संगनमत केले हे शोधणे क्रमप्राप्त आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाई या संगनमतात नसतील तर कोण, हे जसे स्पष्ट झाले पाहिजे, तसेच, हे भाजपाई संगनमत असेल तर, इतका गदळ भ्रष्टाचार करून वर शुचिर्भूत असल्याचा आव आणणाऱ्या भाजपाईंचा पर्दाफाश झालाच पाहिजे. कारण महापालिकेच्या तिजोरीतील एक एक पैसा या शहरातील कष्टकरी, कामगार करदात्यांच्या घामातून आलेला आहे.
भाजप प्रणित नसबंदी, कुत्र्यांची आणि शहराचीही!
गेल्या उण्यापुऱ्या पावणेपाच वर्षांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाई सत्ताकाळात टक्केवारीचे गदळ आपमतलबी राजकारण इतके फोफावले आहे, की मतलबाशिवाय ही मंडळी लघुशंका तरी करीत असतील काय, असा संशय निर्माण व्हावा. प्रत्येक ठेक्यात आपण किंवा आपला माणूस घुसविण्याचा या शहरातील भाजपाईंचा प्रधात सर्वश्रुत आहे. वर “पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट” किंवा “सोशल पॉलिटिक्स” असे इंग्रजाळलेले शब्द वापरून आपली प्रसिद्धीलोलुपताही जोपासण्याचा हडेलहप्पी प्रकार ही भाजपाई मंडळी करताहेत. कुत्र्यांची खोटी नसबंदी करून आपल्या भ्रष्ट तुंबड्या भरून या शहराच्या विकासाची खरीखुरी नसबंदी करण्याचा हा भाजपाई कार्यक्रम आता बास्स झाला, असे म्हणण्याची वेळ सध्यातरी पिंपरी चिंचवड शहरवासीयांवर आली असल्यास वावगे ठरू नये.
————————————————————-