कधीही पराभव न पाहिलेले राजकीय खेळीया, लोकनेते शरद पवार!
घटना डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीची आहे, बारामती लोकसभा मतदारसंघात त्यावेळी पिंपरी चिंचवड होते. काँग्रेसचे उमेदवार होते, शंकरराव बाजीराव पाटील. त्यांच्या प्रचारसभेसाठी राजीव गांधी आले होते. ती प्रचारसभा केएसबी चौकातील फिनोलेक्सच्या मैदानात होती, त्यावेळी काही तरुण राजीव गांधी यांच्या मदतीला, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बहुदा शेख असावेत, यांच्या सांगण्यावरून नेमण्यात आले होते, त्यात अस्मादिकही होते. त्या सभेच्या मंचावर बसल्यावर राजीव गांधी यांनी शं. बा. पाटील यांना विचारले की त्यांनी हेलिकॉप्टर मधून सुमारे तीन चार किलोमीटरची वाहनांची रंग पहिली, ती आपल्या सभेसाठीच येते आहे काय? त्यावर पाटील यांनी सांगितले की, ती आपले विरोधी उमेदवार शरद पवार यांची रॅली आहे. त्यावर राजीव गांधी यांनी पाटील यांना विचारले, “फिर आप कैसे जितोगें?” आणि राजीव गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून की काय, शरद पवार त्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी एस काँग्रेसचे, तेही पहिल्यांदा, खासदार झाले.
त्यापूर्वी, शरद पवार हे नाव माहीत होते, आमचे बंधू नामदेव ढसाळ, आमचे मेहुणे पांडुरंग जगताप, खेड लोकसभेचे खासदार प्रा. रामकृष्ण मोरे, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास कामत, देवनारचे आमदार आणि मंत्री जावेद खान, कामगार नेते दत्ताजी नलावडे यांच्या चर्चेतून. मात्र प्रत्यक्ष राजीव गांधी यांनी केलेला तो उल्लेख मनाला भावणारा ठरला. त्यानंतर प्रत्यक्ष शरद पवार या व्यक्तीची भेट पहिल्यांदा झाली, ती पांडुरंग जगताप यांच्या ” पिंपरी चिंचवड आवाज” या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात, १९८५ साली. त्यानंतर सातत्याने पांडुरंग जगताप, मोरेसर, शहरातील ज्येष्ठ पत्रकार भा. वि. कांबळे, सुभाष सरीन आदींबरोबर कधी पुलोदच्या, एस. के. कुसाळकार यांच्या घरी झालेल्या बैठकीत, १९८६ सालच्या पहिल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत, त्या निवडणुकी नंतरच्या सोपानराव भोईर यांच्या घरी झालेल्या एस काँग्रेसच्या बैठकीत, मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या राज्य अधिवेशना दरम्यान आणि त्यानंतर सातत्याने शहराच्या राजकारणात आणि समाजकारणातही शरद पवार हे नाव आणि त्या नावाचा आवाका दिसत गेला, कळत गेला.
प्रकटपणे फुले, शाहू, आंबेडकर मांडणारे, नेते!
महाराष्ट्राच्या मातीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचाच सुगंध आहे, या मातीतील राजकारण आणि समाजकारण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशिवाय साध्यच होऊ शकत नाही, याची जाण आणि भान ठेवून शरद पवार यांनी आपले पुरोगामी राजकारण केले. मराठवाडा विद्यापीठाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करताना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण देताना, मंडल आयोगाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करताना त्यांनी आपले नुकसान होईल, उच्चभृ राजकारण आपल्या विरोधात जाईल, याचा विचार न करता पवारसाहेबांनी राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण साधले. फुले, शाहू, आंबेडकर हाच राजकारणाचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आहे, यावर ठाम विश्वास असलेल्या या सर्वंकष नेत्याला त्यामुळेच लोकांनी “लोकनेते” आणि “जाणते राजे” म्हणून संबोधले आहे.
धर्म, जात, प्रांत, भाषा यांच्या भेदावर आपली पोळी भाजून घेणारे राजकारण या मातीला रुचणारे नाही, याची ठाम समजूत आणि पुरोगामीत्व हीच राजकारणाची विचारसरणी असू शकते, यावरच अचल, अडीग विश्वास त्यांनी महाराष्ट्राचे सध्या अस्तित्वात असलेले विकास आघाडीचे सरकार स्थापन स्पष्ट केलं आहे. आपले महाराष्ट्रातील राजकीय वारसदार आणि सक्खे पुतणे अजितदादा पवार यांनी भाजपाईंबरोबर घेतलेल्या भल्या पहाटेच्या, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतरही, विचलित न होता त्यांनी विकास आघाडीचे राजकारण केले आणि कधीही एकत्र येऊ न शकणाऱ्या शिवसेना, काँग्रेस यांच्याबरोबर अशक्य वाटणारी मोट बांधून, पवारसाहेबांनी या महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सिद्ध केले आहे. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचाच आहे आणि हेच या भूमीचे भवितव्य आहे, हे त्यांनी आघाडीचे सरकार स्थापून निश्चित केले आहे.
राजकारणातील जबरदस्त खेळीया, पवारसाहेब!
आपल्या खेळावर आणि आपल्या डावावर जबरदस्त विश्वास असलेले, डाव बदलण्याची क्षमता असलेले, असे पवारसाहेबांचे व्यक्तिमत्व आहे. आपले पत्ते झाकून ठेवून, समोरच्याचा डाव उघडा पाडण्याचे कसब असलेले अस्सल खेळीया म्हणजे पवारसाहेब! एस काँग्रेसची स्थापना करून पुलोदचा डाव मांडणारे पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना लोकांना आंधळा वाटणारा डाव, पवारसाहेबांनी डोळसपणे मांडला. त्यातून निर्माण झालेले राजकारण आज देशाचे राजकारण होऊ पाहात आहे. स्वतः उभ्या पावसात भिजून विरोधकांना थंडीताप आणणारे पवारसाहेब, एकमेवाद्वितीयच! व्यासपीठावर उभे राहून, आता कोणी मध्ये पाय घातला तर, तो पाय काढूच असे थाप मारून सांगणारे, अनेकांना मातीतून बाहेर काढून सोन्याची झळाळी देणारे, स्वतःला अस्सल सोने समजणाऱ्यांची माती करणारे, राजे असोत अगर प्रधानमंत्री, कोणालाही त्यांची खरी लायकी आणि जागा दाखवून देणारे, अगदी कर्करोगालाही हार मानायला भाग पडणारे, असे हे लोकनेते शरदचंद्रजी पवार, या भूमीला लाभलेले अधोरेखित व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा खेळ कळणारे अगर त्यांच्या खेळाचा आदमास असणारे लोक जवळपास नाहीतच!
अशा या जबरदस्त खेळीया आणि अधोरेखित व्यक्तिमत्व धारण करणाऱ्या पवारसाहेबांना त्यांच्या वाढदिवशी “नवनायक” परिवाराच्या वतीने अब्जावधी शुभेच्छा!
———————————————————–