भाजपाई शहराध्यक्षांच्या नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तिमत्वाला शहर कमी पडतेय काय?

नुकतेच समाज माध्यमांद्वारे एक छायाचित्र पाहण्यात आले, भाजपचे केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्र सरकारचे तारणहार, मारणहार अमितजी शहा यांच्या सत्कार प्रसंगीच्या या छायाचित्रात भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अमितजी शहा यांना भेट देताना दिसले. या छायाचित्रात भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, शहराच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले, सभागृह नेते नामदेवराव ढाके, शहर भाजपाई पदाधिकारी देखील होते. मात्र, ठळक आणि स्पष्टपणे दिसणारे, अमितजी शहा यांच्यानंतरचे एकमेव व्यक्तिमत्व होते ते भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष. तद्नंतर यासंबंधीची बातमीही भाजपाई शहराध्यक्षांच्या प्रसिद्धी यंत्रणेद्वारे प्राप्त झाली. ही बातमी आणि छायाचित्र पाहिल्यावर एक सहजचा विचार मनाला शिवला की, हे शहर आता भाजपाई शहराध्यक्षांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाला अपुरे पडू लागले आहे काय? अमितजी शहा यांच्याबरोबरचे शहराध्यक्षांचे ते छायाचित्र पाहिल्यावर, हे उमदे, पौरुषवान, देखणे, सुदृढ, बलशाली व्यक्तिमत्व या शहरात का खितपत पडले असावे, असा साधासरळ प्रश्न अक्षरशः पडला.

अर्थात सुरुवात होताना कोणतेही व्यक्तिमत्व अगदी शून्यातून वर येते, ते शून्य फूटल्यावर त्या व्यक्तिमत्वाची भव्यदिव्यता समजू उमजू लागते. मग आहे तो परिपेक्ष त्या व्यक्तिमत्वाला कमी पडू लागतो आणि त्या व्यक्तिमत्वाचा परिपेक्ष वाढवला नाही, तर ते व्यक्तिमत्व त्याचत्या वर्तुळात बद्ध होऊन जाते. पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्षांच्या बाबतीत असेच काही झाले असावे काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. तशातच अमितजी शहा यांच्यासोबतचे ते छायाचित्र पाहिल्यावर तर भाजप शहराध्यक्षांचे हे उमदे व्यक्तिमत्व या शहरासाठी नाहीच, असे विचार निर्माण झाल्यास वावगे ठरू नये. आता या उमद्या व्यक्तिमत्वाने आपला परिपेक्ष बदललाच हवा अशी भावना आहे. तशीही या शहाराध्यक्षांनी या शहराची अतुलनीय, म्हणजेच तुलना करता न येणारी आणि अनुपमेय, म्हणजेच कोणत्याही उपमेत न बसणारी सेवा केली आहे. त्यासाठी सर्व शहरावर बारीक नजर ठेवून, आपल्या हातून काही सुटले तर नाही ना हे तपासण्याची मोठी यंत्रणा त्यांनी तयार करून कामास लावली आहे. त्यासाठी त्यांचे छोटेमोठे चाणक्य अविरत कार्यरत आहेत. शहरात होणाऱ्या प्रत्येक बदलात आपला सहभाग असलाच पाहिजे, याचा दुर्दम अट्टाहासपूर्वक प्रयत्न या चाणक्यांनी आणि त्यांनी निर्माण केलेल्या यंत्रणेने केला आहे.

कोणत्याही निधड्या योध्याला सम्राटपदावर नेण्यासाठी एखादा चाणक्य हवा असतो, तसा सुदैवाने भाजपाई शहराध्यक्षांकडेही आहे. या चाणक्याने प्रत्येक कुळांची जंत्री ठेवणारी प्रासादिक यंत्रणाही तयार केली आहे. या यंत्रणेने मग पिंपरी चिंचवड शहरात घडणाऱ्या प्रत्येक मोठ्याबारीक घटनांमध्ये भाजपाई शहराध्यक्ष, दस्तुरखुद्द अगर आपपर भावाने कसे सामील आहेत, याची माहिती बापड्या जनसामान्यांना देणारी चपखल कार्यपद्धती निर्माण केली. त्यासाठी अनेक प्रसिद्धी माध्यमींना तनखे सुरू केले. त्यामुळे शहरात घडणाऱ्या सर्वच बदलाला भाजपाई शहराध्यक्षच कसे उत्तरदायी आहेत, याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविली गेली.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक बदलावर आणि विकासावर भाजपाई शहराध्यक्षांचा अमूर्त असा ठसा उमटला आहे. संडास बांधणे, स्वच्छ करण्यापासून कचऱ्यातून काहीतरी निर्माण करण्यापर्यंत, पादचारी पुलापासून पुलाखालच्या सुशोभीकरणापर्यंत, पाण्यावर प्रक्रिया करण्यापासून ऐतिहासिक दृष्टांतांसह शंभूराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा शहराच्या सर्वदूर विकासावर भाजपाई शहाराध्यक्षांनी आपल्या करतुमअकरतुम कर्तृत्वाचा खोलवर ठसा उमटवला आहे. हा ठसा उमटवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या यंत्रणेने, काही धनंजयी वैष्णव्या निर्माण केल्या, आता त्यातून काही प्रवीण भास्कर गोत्यात आले, तो भाग अलाहिदा! शहरात आणि परिसरात निर्माण होणारा कोणताही प्रश्न, वारकऱ्यांनी दिंडीत सहभागी व्हावे किंवा कसे, इथपासून ते थेट बैलगाडा शर्यतीपर्यंतचे प्रत्येक प्रश्न, या उमद्या नेतृत्वाने, आपले आणि आपल्या चाणक्यिय यंत्रणेचे कर्तृत्व वापरून लिलया सोडवले आहेत.

आता काही वावदूक आणि खोडील प्राणी, भाजपाई सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिका आणि एकूणच शहरात अनागोंदी, अराजकता आणि भ्रष्ट बजबजपुरी निर्माण करण्यात भाजपाई हात असल्याचा आरोप करताहेत. त्यासाठी अनेक ठेक्यात भाजप सामील असल्याचा आरोपही केला जातो आहे. घनकचरा व्यवस्थापनापासून कुत्र्यांच्या नसबंदीपर्यंत अनेक दाखले त्यासाठी दिले जात आहेत. कधी नव्हे ते, महापालिकेच्या स्थायी समितीवर पडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्याचा, आयुक्तांवर झालेल्या भाजपाई काळिखमय प्रयोगाचा, रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते, हे कळणार नाही अशा विकासाचा, लांबलेल्या अमृत अगर २४×७ च्या प्रकल्पांचा, स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीटच्या घोळाचा ठरवून उल्लेख केला जातो आहे. पण मग या सगळ्या उल्लेखानंतरही भाजपाई शहराध्यक्षांच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाची उंची कुठे कमी होते आहे, हे कोणी लक्षात का घेत नाही, हा खरा प्रश्न आहे. ही उंची प्राप्त करण्यासाठी भाजपाई शहराध्यक्षांचे चाणक्य आणि त्यांच्या यंत्रणेने जे जीवाचे रान आणि रात्रीचा दिवस करून काबाडकष्ट केले, हे कसे नाकारता येईल?

तसेही आता पिंपरी चिंचवड शहर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासह आजूबाजूच्या परिसरातील अडचणीतले शेतकरी आणि त्यांच्या बहिणीबाला मार्गी लागलेलेच आहेत. ठसा उमटावा असा विकासही आता शिल्लक राहिला नसावा. मग भाजपाई शहराध्यक्षांच्या या उमद्या, पौरुषवान, देखण्या, सुदृढ, बलशाली कर्तृत्ववान नेतृत्वी व्यक्तिमत्वाने, या शहर आणि परिसराच्या छताखाली घिरट्या का घालाव्यात, असा विचार निर्माण झाल्यास वावगे ठरू नये. हे छत सोडून आता या व्यक्तिमत्वाने खुला आसमंत आपल्या गरूडझेपीने कवेत आणावा. या बापड्या देशापुढे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत, राज्याच्या सीमाप्रश्नापासून ते सरकारी उद्योगांच्या खाजगिकरणापर्यंत अनेक मोठ्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची क्षमता असलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आता या शहर आणि परिसराच्या छताखाली राहून उपयोगी नाही. सक्षम चाणक्यिय यंत्रणेने समृद्ध असलेल्या भाजपाई शहाराध्यक्षांनी आता हे शहर इतर पामरांसाठी बक्शावे, हे पामर बिचारे या शहरासाठी काहीतरी करतीलच. ज्या छायाचित्राकडे पाहून हा विचार उद्भवला, त्या छायाचित्रातील भाजपाई केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा आणि प्रांताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने साकडे घालण्यात येत आहे की, आता या भाजपाई शहाराध्यक्षांनी आपले बहुआयामी आणि बहुपेडी नेतृत्व मोठ्या आसमंतात वापरावे, त्यासाठी त्यांच्या चाणक्यिय यंत्रणेने आता कार्यरत व्हावे, यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, तसेही हे शहर आता यांच्या लायकीचे राहिले नाही, हेच खरे!

——————————————————-––

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×