आयुक्तांवर आगपाखड! शहर भाजपाईंना, “समृद्धीची” समृद्धी कमी पडली काय?

नेहमीप्रमाणे सामान्यजनांचा खोटा कळवळा आणून गळा काढायचा आणि आपला हेतू साध्य करायचा हा जुना पायंडा पुन्हा शहर भाजपाईंनी वापरला आहे. आयुक्तांवर आगपाखड करून आपल्या पदरात काहीतरी पडून घेण्याची ही पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न शहर भाजपाईंनी केवळ पात्रे बदलून वापरला. विषय तसा भाजपाईंच्या पथ्यावरच पडला होता तरी, सगळेच चाटून पुसून खायचे आणि वर बोंबा मारायच्या ही पद्धत काही या मंडळींकडून सुटत नाही. कोणाएका भाजपाईच्या मर्जीने महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली महिलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याचे काम समृद्धी मोटार ड्रायव्हिंग स्कुल या नदीपल्याडच्या संस्थेला देण्यात आले. मात्र, संपूर्ण शहराचे काम देण्याऐवजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी निम्मे काम या संस्थेला देऊन उरलेल्या निम्म्या कामासाठी अजून काही संस्थांनी अर्ज करावेत, अशी तरतूद केली. मात्र आपल्याच पोळीवर तूप ओढण्याचा हव्यासापायी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी हा कांगावा करून आपली समृद्धी वाढवण्याचा हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचारी कारभाराचा अजून एक नमुना असल्याचे म्हणावे लागेल.

महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ प्रभागनिहाय आठ निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. दोन तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर केवळ ड प्रभागासाठी सांगवी स्थित समृद्धी मोटार ड्रायव्हिंग स्कुल या संस्थेने संगनमत करून निविदा भरली. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी ती मंजूरही केली. सत्ताधारी भाजपाईंना समृद्धीची समृद्धी आवडली म्हणून त्यांनी याच संस्थेला आठही प्रभागांचे काम द्यावे, असा आग्रह धरला. एका प्रशिक्षणार्थीसाठी ६९५०/- रुपये इतका या संस्थेचा दर आहे. संपूर्ण आठही प्रभागात आतापर्यंत आकराशेच्या जवळपास महिलांचे मोटार चालक प्रशिक्षणासाठी अर्ज आले आहेत. चालू महिनाअखेरपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या मुदतीत अजून हजारभर अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरले जात आहे. थोडक्यात सुमारे दीड कोटी रुपयांचे हे काम भाजपाई नगरसेवकाच्या संबंधित असलेल्या संस्थेला मिळावे, यासाठी आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंचा आटापिटा चालला आहे.

तीन महिन्यांच्या कालावधीत द्यावयाच्या या वाहन चालक प्रशिक्षणासाठी एकविसशे महिलांना प्रशिक्षण देण्याची यंत्रणा उभारणे एक संस्थेला जिकिरीचे अगर अशक्यप्राय असल्याचा विचार करून महापालिका आयुक्तांनी निम्मे काम समृद्धी मोटार ड्रायव्हिंग स्कुल या संस्थेला देण्याचे आदेश पारित केले आहेत. उरलेले निम्मे काम याच दराने करण्यासाठी अजून काही संस्थांकडून अर्ज मागवावेत अशा सूचना संबंधीत विभागाला दिल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांच्या हातून निम्मे काम सुटेल आणि टक्केवारीत घपला निर्माण होईल, या भीतीने आता सत्ताधारी भाजपाईंना ग्रासले आहे. त्यासाठी नदीपल्याडच्या आदेशाने आता हे सत्ताधारी भाजपाई आयुक्तांवर आगपाखड करीत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळाल्यापासून, अक्षरशः महापालिका धुवून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सत्ताधारी भाजपने राबविला आहे. निर्माण होणारे कोणतेही काम आपल्या अगर आपल्या बगलबच्च्यांच्या आणि हितसंबंधितांच्या तावडीतून सुटू नये, असाच प्रयत्न भाजपाईंनी आतापर्यंत केला आहे. पूर्वीच्या आयुक्तांनी ही मनमानी करण्याची खुली छूट भाजपाईंना दिली होती. फेब्रुवारी २०२१ पासून पदभार स्वीकारलेले महापालिका आयुक्त राजेश पाटील मात्र, ही मनमानी चालू देत नाहीत. रितसर आणि कायदेशीर बाबी पडताळून कोणतेही काम करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा असा आग्रह आयुक्त धरताहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाईंच्या भ्रष्टाचारी आणि आपमतलबी कारभाराला बऱ्यापैकी आळा बसला आहे.

शहर वाटून घेणाऱ्या भाजपाईंचा त्यामुळे तिळपापड झाला असल्यास नवल नसावे. म्हणूनच आयुक्तांवर सध्या आगपाखड करण्याचे उद्योग सत्ताधारी भाजपाईंनी चालविले आहेत. यापूर्वीदेखील आपला कुहेतु सध्या होत नाही म्हणून एका भाजपाई नागरसेविकेने, आयुक्तांवर काळिखमय दबाव आणण्याचे प्रयत्न केले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत प्रशासनावर आणि प्रामुख्याने आयुक्तांवर आगपाखड करण्याचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपाई राबवित आहेत. सत्ताधाऱ्यांना हवे तसे निर्णय घेऊन, त्यांची आणि त्यांच्या सगेसोयरे, हितसंबंधी, बगलबच्च्यांची खळगी भरू दिली, तर आयुक्त चांगले, अन्यथा वाईट, असा खाक्या चालणार नाही, हे आतातरी सत्ताधाऱ्यांना कळावे. याच शहरवासीयांच्या अपेक्षा!

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×