“शिलवंत” सुलक्षणाने बाजी मारली, विरोधकांचे कुभांडी मनसुभे रोखून “धर”ले!

नाकाला मिरची लागणे म्हणजे काय याचा प्रत्यय तक्रारकर्ते आणि विरोधकांना देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने, सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसदस्यत्व अबाधित झाले आहे. तक्रारदार, सध्या शिवसेनेत असलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीपासून सुरू झालेल्या या “नगरसदस्य पद जाणार” नाट्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पडदा पडला असून तक्रारकर्त्यांच्या वकिलांवर, आम्ही चुकलो, असे मान्य करण्याची नामुष्की ओढवली. संत तुकारामनगर आणि समस्त शहरातील राजकीय आणि सामाजिक व्यक्तींचे लक्ष लागून राहिलेले हे नाट्य संपुष्टात आणून सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आपण सुलक्षणी आणि शिलवंतही आहोत, हे अधोरेखित केले आहे.

वस्तुतः केवळ राजकीय आसूयेपोटी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी विभागीय आयुक्तांकडे नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत-धर या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लाभार्थी असल्याची आणि म्हणून त्यांचे नगरसदस्यत्व रद्द करावे अशी तक्रार केली होती. मुखपट्टी म्हणजेच मास्क पुरवठ्यावरून केलेली ही तक्रार बिनबुडाचीच होती. याबद्दलची खरी हकीकत अशी की, सुलक्षणा याच्या बंधूंच्या वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा व्यवसाय करणाऱ्या एडिसन लाईफ या पुरवठादार संस्थेने कोरोना महामारीच्या कडक टाळेबंदी दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेला एक लाख मुखपट्या पुरवल्या होत्या. आपात्कालीन परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी, गोरगरीब शहरवासीयांना वाटण्यासाठी मिळेल तिथून मुखपट्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांच्या या मागणीला प्रतिसाद देऊन एडिसन लाईफने या मुखपट्या महापालिकेला दिल्या. आमच्याकडून मुखपट्या घ्या अशी कोणतीही मागणी अगर त्यासाठी कोणत्याही निविदेत एडिसन लाईफने सहभाग नोंदवलेला नव्हता.

आपल्या बंधूंच्या या मुखपट्या पुरवठ्यामुळे सुलक्षणा या महापालिकेच्या सरळ लाभार्थी ठरतात आणि म्हणून त्यांचे नगरसदस्य पद रद्द करावे, अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. ननावरे, त्यांचे उमद्या चेहऱ्याचे बोलविते धनी आणि त्यांच्या कंपूने काही असंतुष्ट प्रसिद्धी माध्यमींना हाताशी धरून, आता सुलक्षणा यांचे पद जाणार अशी हाकाटी पिटली. विभागीय आयुक्तांनी यावर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा खुलासा मागविला. या खुलास्यात महापालिका आयुक्तांनी, आपत्कालीन परिस्थितीत एडिसन लाईफ या संस्थेने, महापलिकेच्या विनंतीवरून मुखपट्या पुरवल्याचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर केला. तरीही विभागीय आयुक्तांवर सातत्याने दबाव आणून ननावरे आणि संबंधितांनी सुलक्षणा यांना अनर्ह ठरविण्याचा निष्कर्ष नोंदविण्यास भाग पाडले. यावर सुलक्षणा शिलवंत यांनी उच्च न्यायालयात दाद मागणारी याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान तक्रारदार जितेंद्र ननावरे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि शासनाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले. त्यावर उच्च न्यायालयाने सुलक्षणा शिलवंत याचे नगरसदस्यत्व अनर्ह ठरविण्याचा विभागीय आयुक्तांचा निष्कर्ष अवैधानिक आणि अधिकार नसताना नोंदविल्याचे स्पष्ट करून याचिका निकाली काढली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अक्षम्य दुर्दैवी दुर्लक्ष?

कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना अगर एखादा राजकीय विषय मार्गी लावताना, विभागीय आयुक्त कायम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात, असा पायंडा आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. प्रशासनावर त्यांचा मोठा वचक असल्याचे अनेकवेळा, अगदी राज्यात भाजपचे सरकार असतानाही आणि ते पालकमंत्री नसतानाही, स्पष्ट झाले आहे. मग, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसदस्यांचे पद अनर्ह ठरविण्याचा निष्कर्ष का आणि कशामुळे नोंदविला असावा, हे अनाकलनीय आहे. नियमित पायंड्यानुसार सुलक्षणा यांचे पद अनर्ह ठरविण्याचा निष्कर्ष नोंदविताना, विभागीय आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या कानावर ही बाब टाकली नसावी, हे होणे अशक्यच. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सर्वेसर्वा नेत्याने, या प्रकाराकडे अक्षम्य आणि दुर्दैवी दुर्लक्ष केले आहे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यास वावगे ठरू नये. त्याही पुढे जाऊन, विभागीय आयुक्तांनी हा निष्कर्ष नोंदविताना पालकमंत्र्यांना त्याची माहिती दिली नसेल तर, असे का व्हावे, हा प्रश्नही अलाहिदा निर्माण होतो. कोणत्या कारणांनी विभागीय आयुक्त, हा आपल्या अखत्यारीत नसलेला आणि म्हणूनच बेकायदा ठरणारा, निष्कर्ष नोंदविण्यास तयार झाले असावेत, यावर वेगळे संशोधन होणे अत्यावश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे हे संशोधन राष्ट्रवादीच्या पक्षाश्रेष्ठींनी करणे, राजकीयदृष्ट्या अगत्याचे आहे.

कारण काहीही असो, आंबेडकरी चळवळीतील एक स्वयंसिद्ध नाव असलेल्या कालवश अशोक शिलवंत यांची कन्या आणि काश्मिरी पंडित राजू धर यांची पत्नी असलेली, आणि या सगळ्या प्रकारामुळे तावून सुलाखून तयार झालेली ही “सुलक्षणा” खऱ्या अर्थाने “शिलवंत” असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर विरोधक कोणीही असोत, त्यांचे खोटे कुभांड रचण्याचे मनसुभे तीने लीलया रोखून “धर”ले, हे अत्यंत महत्वाचे!


आगामी आकर्षण;

शहर राष्ट्रवादीचे सुभेदारच राष्ट्र्रावादीला मारक ठरताहेत काय?

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×