शहर राष्ट्रवादीचे सुभेदारच राष्ट्रवादीला मारक ठरताहेत काय?

सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसदस्यत्व अबाधित राहिले, याचा आनंद महेशनगर, संत तुकारामनगर येथील सामान्यजनांसह, पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्कीच झाला. अर्थात शहर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना आणि काही स्थानिक नेत्यांनाही तो झाला असल्याची चर्चा आहे.पण दुर्दैवाने समस्त राष्ट्रवादी, सुलक्षणा शिलवंत धर यांच्या आनंदात सहभागी नव्हती, यावरही शहरभर चर्चा आहे. असे का झाले असावे? वस्तुतः शहर राष्ट्रवादीच्या एक नगरसदस्यावरचे एखादे बालंट टळले, याचा आनंद यच्चयावत राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात शहरभर अगदी डांगेघोडे नाचवून करणे सांयुक्तिक होते. मात्र, तसे झाले नाही आणि त्याचे पडसाद शहरभर उमटले देखील. यावर संशोधन केले असता पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यावरही आणि पुन्हा सत्ता मिळेल की नाही, याची ठाम शाश्वती नसतानाही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत लथाळी, एकमेकांचा आसुयायुक्त दुस्वास, स्वतःच्या मतलबाचे आणि स्वतःला हवे तसेच राजकारण करण्याची सवय गेलेली नाही. महापालिका निवडणूका अगदी तोंडावर आल्या असतानाही शहर राष्ट्रवादीत एकोपा आणि एक कलमी सत्ताकांक्षी कार्यक्रम का अवलंबला जात नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

राष्ट्रवादीचे सवते सुभेदारच अडचणीचे!

आपल्यावर लादले गेलेले कुभांडी कारस्थान हाणून पाडण्यात आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यात सुलक्षणा शिलवंत धर यशस्वी झाल्या. शहर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अगर राष्ट्रवादीचे पक्षाश्रेष्ठी यांच्याकडून सुलक्षणा यांना कोणतीही मदत मिळाली नाही, हे सर्वच खाजगीत मान्य करतात आणि ते खरेही आहे. कारण तसे झाले असते तर सुलक्षणावर ही पाळी आलीच नसती, हे नक्की. या प्रकरणाच्या मूळ तक्रारदाराला थांबविणे, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना सहज शक्य होते. त्याही पुढे जाऊन विभागीय आयुक्तांनी नगरसदस्य पद अनर्ह ठरवेपर्यंत राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी झोपले होते काय, असाही दुसरा प्रश्न निर्माण होतो. नक्की काय झाले असावे, सुलक्षणा शिलवंत यांना पक्षाच्या कोणत्याही पातळीवरून मदत का झाली नसावी, याचे कारण शोधले असता, पक्षश्रेष्ठींचे दुर्दैवी दुर्लक्ष आणि स्थानिक सुभेदाराची मक्तेदारीची खोड याला कारणीभुत असल्याचे स्पष्ट होते. त्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, शहर राष्ट्रवादीत कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात राहिला नाही. राष्ट्रवादीच्या पक्षाश्रेष्ठींनी निर्माण केलेले सवते सुभेदार आता मुजोर झाले आहेत आणि ते कोणाचेही, अगदी आपल्या नेत्याचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रत्येक सुभेदार आपल्या मतलबाचे आणि स्वहिताचे राजकारण करण्यात मश्गुल आहेत.

पक्ष खड्डयात गेला तरी चालेल, आपले राजकारण रेटायचे ही या मक्तेदार सुभेदारांची गदळ प्रवृत्ती अजूनही गेलेली नाही आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनीही या घातक प्रकाराला रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचे कधी जाणवले नाही. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात ताकद आणि साधनसामग्रीने संपन्न झालेल्या काही सवत्या सुभेदारांनीच राष्ट्रवादीला सत्ताच्युत केले, हे निखालस आणि स्वयंस्पष्ट सत्य आहे. तरीही सुभेदारांना गोंजारण्याचे राजकारण राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी का थांबवित नाहीत, हे अनाकलनीय आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता मिळण्याचे स्वप्न पाहणारे हे सवते सुभेदार, जोपर्यंत आपले सवते सुभे आणि स्वाधिष्ठित राजकारण सोडत नाहीत अगर राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी जोपर्यंत त्यांना तसे करण्यास भाग पाडत नाहीत, तोपर्यंत यांचे हे स्वप्न दिवास्वप्नच ठरणार आहे.

सवत्या सुभेदारांचे संतुनगर मधले गदळ राजकारण.

राष्ट्रवादीच्या पक्षाश्रेष्ठींनी निर्माण केलेले सुभेदार किती गदळ राजकारण करतात, याचा नमुना म्हणजेच सुलक्षणा शिलवंत धर यांच्यावर रचलेले कुभांडी कारस्थान होय. संत तुकारामनगर म्हणजेच संतुनगरचे एकूणच राजकारण केवळ एकाच वर्तुळात फिरणारे झाले आहे. अर्थातच याला राष्ट्रवादीचे सुभेदारच कारणीभूत आहेत. हे उमद्या व्यक्तिमत्वाचे आणि देखणे सुभेदार आपल्याव्यतिरिक्त कोणाचेही थांबडे स्थिर होऊ देत नाहीत. प्रत्येकवेळी वेगळा साथीदार आणि नवा जोड तयार करण्याच्या नादात अगोदरच्या साथीदाराला गोत्यात आणणे हा या सुभेदाराचा जुना खेळ आहे. आपल्यापेक्षा कोणतेही आणि कोणाचेही व्यक्तित्व संतुनगर परिसरात तयारच होऊ द्यायचे नाही, तरीही एखादे व्यक्तित्व स्वबळावर तयार होत असले तर, आपल्या बगलबच्च्यांकरवी त्याला अडथळे निर्माण करायचे, हा संतुनगरच्या राजकारणाचा आतापर्यंत या देखण्या सुभेदाराने पडलेला पायंडा आहे. आपल्या कब्जात न राहू शकणारे कोणीही शिल्लक ठेवायचे नाही ही इथल्या सुभेदाराची कार्यपद्धती आहे. मात्र, आता ही पद्धत संतुनगरच्या मतदार नागरिकांच्या लक्षात येऊ लागली आहे.

वस्तुतः पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि भाजपमधून फिरून शिवसेनेत आलेले जितेंद्र ननावरे या सुभेदारांचा ऐकण्यातले नाहीत असे अजिबात नाही. तरीही त्यांनी राष्ट्रवादीच्याच सुलक्षणा शिलवंत यांच्याविरोधात तक्रार केली आणि सवते सुभेदार आळीमिळी गुपचिळी धरून राहिले. सुभेदारांचे बगलबच्चे सुलक्षणाला झालेला दुर्लक्षणी त्रास पाहून खुदखुदत होते. आता या सुभेदारांना नविन चाणक्य आणि त्या चाणक्यांच्या नवीन कारस्थानी साथीदार लाभले आहेत. त्यामुळे आता जुने साथीदार आणि राजकीय सहकारी या सुभेदारांना नको आहेत. मग परस्परांना एकमेकांवर कुरघोडी करण्यास लावणे आणि त्या दोघांनाही गोत्यात आणणे हे या सुभेदारांचे मूळ हेतू आहेत काय, असा विचार आता संतुनगर मधील मतदार नागरिकांच्या मनात उद्भवल्यास वावगे ठरू नये. आता या सुभेदारांनी समस्त संतुनगरच्या आपल्याच मतदारांना वेडे ठरावण्याऐवजी हे समजून घ्यावे की, कोणीही प्रत्येकाला प्रत्येकवेळी मूर्ख बनवू शकत नाही!

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×