शहरात भाजप, राष्ट्रवादीचा राजकीय हुतूतू!

“हु तू, तू, तू, तू” करीत एकमेकांच्या तंगड्या ओढणारे आरोप एकमेकांवर करण्याच्या प्रकाराने गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर योगेश बहल यांनी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी पुरविण्याचा आदेश महापालिकेकडून प्राप्त झालेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस या ठेकेदारावर आणि कुत्र्यांच्या नसबंदीचा घोळ घालणाऱ्या ठेकेदारांवर कडाडून टीका करीत सभागृहात आपल्या माहितीचे भांडार किती समृद्ध आहे, हे दाखवून दिले. त्याचबरोबर भाजपचे नगरसदस्य तुषार कामठे यांनी रस्ते सफाईचा ठेका मिळालेल्या सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या ठेकेदाराने खोटी कागदपत्रे जोडून ठेका मिळविल्याचा प्रकार उघडकीस आणला. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि सत्ताकांक्षी राष्ट्रवादी यांच्यातील हा संघर्ष असल्याचे वरकरणी वाटत असले तरी, यात कुरघोडीचे आणि मतलबाचे राजकारण असल्याची वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीला पूरक असे सूतोवाच झाले ते, याच सर्वसाधारण सभेत महापौरांनी कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रकार आणि श्रीकृपा सर्व्हिसेसचा ठेका यांची चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र, सिक्युअर फॅसिलिटी या ठेकेदारावर बोलणे टाळले यावरून.

एकसमान न्यायाची चाड आणि भ्रष्टाचाराची चीड असलेल्या कोणत्याही व्यक्तीस महापालिका आमसभेत दृष्गोचर झालेला हा आपपर भाव अनाकलनीय आहे. कुत्र्यांची नसबंदी आणि श्रीकृपा सर्व्हिसेसचा ठेका यांची चौकशी करता येऊ शकते मग सिक्युअर फॅसिलिटी या ठेकेदाराकडे दुर्लक्ष का, हा प्रश्न सामान्यपणे उपस्थित झाल्यास वावगे ठरू नये. तुषार कामठे आणि योगेश बहल या दोनही महाभागांनी खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेला चुना लावण्यास उत्सुक असलेल्या अगर चुना लावणाऱ्या ठेकेदारांना उघडे पाडण्याची भूमिका घेतली. मग, एकाच्या बाबतीत चौकशीचे आदेश आणि दुसऱ्याकडे सरळ दुर्लक्ष का करण्यात आले असावे, याचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरते. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसदस्यांनी उघडकीस आणलेला प्रकार, चौकशीस पात्र असेल तर, भाजपच्या नगरसदस्याने दिलेला घरचा आहेरही चौकशीस पात्र असलाच पाहिजे. पण तसे का झाले नाही, यावर संशोधन केले असता हा राजकीय हुतूतू असून, या खेळाच्या आडून एकमेकांच्या तंगड्या फास्कटण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले आहे.

सवत्या सुभेदारांचा राजकीय हुतूतू, दोन्ही पक्षांना घातकच!

राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींच्या आशिर्वादाने तयार झालेले सुभेदार, या दोनही पक्षात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सुतगुत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. हे सर्व सुभेदार एकमेकांना पूरक असा खेळ खेळताहेत, हे देखील स्वयंस्पष्ट आहे. दोनही पक्षात त्या त्या पक्षांच्या सुभेदारांना नको असलेली मंडळी आहेत. भाजपाई सुभेदारांना भाजपच्याच काही लोकांना गोत्यात आणायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या काही सुभेदारांना राष्ट्रवादीतीलच काही लोक नको आहेत. एकाच मुशीतून तयार झालेले आणि सांप्रतला वेगवेगळ्या पक्षात असलेले हे सुभेदार आता एकमेकांच्या पक्षांतर्गत विरोधकांची सुपारी, एकमेकांना देत असल्याचे सध्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील चित्र आहे. सत्ताधारी भाजपाईंना आपल्याच पक्षातील नको असलेल्यांची सुपारी राष्ट्रवादीच्या सुभेदारांकडे आणि सत्ताकांक्षी राष्ट्रवादीच्या आपल्या पक्षात नको असलेल्यांची सुपारी भाजपाई सुभेदारांकडे असा खेळ आता या महापालिकेसह शहरात रंगला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दस्तुरखुद्द नामदार अजितदादा पवार यांनी सगळ्यांची अंडीपील्ली माहीत असल्याचे स्पष्ट केले होते. मतलबी आणि हितसंबंधांचे राजकारण करू नका, असा गर्भित इशारा त्यामागे होता. मात्र, त्यातून या सुभेदारांना काही शहाणपण आल्याचे अगर त्यातून ते सावध झाल्याचे काही आढळून आलेले नाही. अजूनही या दोन्ही पक्षातील सुभेदार एकमेकांच्या पक्षातील नको असलेल्यांना गोत्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या प्रकारामुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पक्षाचे म्हणून असलेले मतदार संभ्रमित झाले आहेत, याचा विचार या दोन्ही पक्षातील सुभेदार करीत नाहीत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये कींकर्तव्यविमूढता निर्माण होऊन दोन्ही पक्षांना अडचणींना तोंड द्यावे लागेल हे नक्की!

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×