उदंड झालेल्या माध्यमी लेकरांना मराठी पत्रकारदीनाच्या शुभेच्छा!

एकशे नव्वद वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ साली बाळशास्त्री जांभेकर नावाच्या ऐन विशीतल्या तरुणाने “दर्पण” नावाचे मराठी, इंग्रजी पाक्षिक सुरू केले. मराठी पत्रकारितेचे बीज रोवणाऱ्या या दर्पणचा हा वेलू आता गगनावरी पोहोचला आहे. मुद्रित, दृक्श्राव्य आणि समाज माध्यमांची नक्की मोजदाद केली, तर मराठी पत्रकारितेत जगभरात कोटीभर व्यक्ती, काही हजार आस्थापना आणि काहीशे व्यावसायिक समूह सहज सहभागी असतील. एकशे नव्वद वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड व्यापून मराठी पत्रकारिता इथपर्यंत आली आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, व्यावसायिक अशा अनेक अंगाने आज मराठी पत्रकारिता कार्यान्वित आहे. अनेक दिग्गज आणि पारंगत व्यक्तींनी मराठी पत्रकारिता समृद्ध केली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामापासून अगदी एखाद्या गल्लीतल्या प्रश्नापर्यंतचे योगदान आजवर मराठी पत्रकारितेने दिले आहे. मराठी पत्रकारितेने एतद्देशीय पत्रकारितेला एक वेगळा आयाम, एक वेगळी उंची प्रदान केली आहे. नितीमुल्ये आणि सामाजिक भान राखून मराठी पत्रकारिता बहरली आहे.

मात्र, सांप्रतच्या काळी ही समृद्ध, सर्वव्यापक, सर्वंकष आणि नितीमुल्ये, सामाजिक भान असलेली मराठीसह एकूणच पत्रकारिता तशी राहिली आहे काय, हा खरा प्रश्न आहे. आता पत्रकारितेत शिरलेल्या समस्त हौसे, नवसे, गौशे मंडळींना खऱ्या अर्थाने “दर्पण” म्हणजे “आरसा” दाखविणे गरजेचे झाले आहे. एकशे नव्वद वर्षांपूर्वी ज्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची सुरुवात केली, ते बहुभाषाकोविद, बहुशास्त्रनिपुण असे व्यक्तिमत्व होते. त्यानंतरही महात्मा फुले, आगरकर, टिळक, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांडपंडित समाजपुरुषांनी मराठी पत्रकारिता समृद्ध केली आहे. मात्र, या समृद्ध मराठी पत्रकारितेला सध्या सवंग व्यावसायिकतेने घेरले आहे. गल्लीतील समाजमाध्यमी पत्रकारांपासून अगदी मोठ्या उद्योगसमूहांपर्यंत ही धंदेवाईक प्रवृत्ती फोफावली आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी मान्यता असलेल्या पत्रकारितेतच लोकशाही शिल्लक राहिली नाही अशी आजची अवस्था आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि भान असलेली पत्रकारिता संपून आता सवंग व्यावसायिकतेत तिचे रूपांतर झाले आहे. राजकीय पक्ष, व्यक्ती, जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्यातील वादाचा आणि कुहेतूंचा एक भाग म्हणून आताची पत्रकारिता वापरली जात आहे. अनेक पत्रकार इतर काही करता येत नाही, म्हणून केवळ पत्रकारिता करतात, अशी परिस्थिती सांप्रतला आहे. आपल्या इतर व्यवसायांना आणि दिल्याघेतल्या प्रवृत्तीला संरक्षण म्हणून पत्रकारिता करणारे, उदंड आणि उन्मत्त झाले आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी पगारी पत्रकार अक्षरशः पाळले आहेत. समाजाला हितकारक आणि समाजप्रश्नांना वाचा वगैरे फोडणारे पत्रकार लोप पावले असून, समाजविघातक शक्ती आणि प्रवृत्ती धारण करणाऱ्यांना सहाय्यीभूत पत्रकारिता आता फोफाऊ लागली आहे. असिधारा वगैरे व्रत संपून, क9नाला कसे धरा, म्हणजे आपले उखळ पांढरे होईल, हे पाहणाऱ्या प्रवृत्तीचे प्रमाण वाढीस लागले आहे.

यातही काही निस्पृह, खऱ्याखोट्याचा न्याय करणारे, समाजाप्रती आपले योगदान देणारे, समाजप्रश्नांची जाण आणि भान असलेले पत्रकारही अर्थातच आहेत. कदाचित त्यांच्यामुळेच अजूनही लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरेचे संबोधन पत्रकार अजूनही राखून आहेत. कसेही असले तरी पत्रकार हा सुरुवातीला आणि अंततःदेखील पत्रकार असतोच, हे महत्त्वाचे. पुनःरपी ही एतद्देशीय मराठी पत्रकारिता बहारावी, फुलावी आणि त्यातून काही समाजहितकारक कार्य घडावे, याच या मराठी पत्रकारदिनी समस्त माध्यमींना हार्दिक शुभेच्छा!

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×