भाजपाईंचे बरबटलेले, अपयशी चेहरे आणि आयुक्तांचा आरसा!

नुकत्याच ६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेल्या मराठी पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांना “मार्गदर्शन” केले. पत्रकारितेत “पोट” भरत नसेल, तर पत्रकारांनी इतर “उद्योग” करण्याऐवजी, इतर व्यवसाय करावेत, असा सल्ला आयुक्तांनी पत्रकारांना देऊन, “उद्योगी” पत्रकारांना “मार्ग” दाखवला. त्याचबरोबर “दर्पण” दिनाच्या शुभेच्छा देताना, इतरांकडे बोटे दाखवताना एखादे बोट आपल्याकडेही असते, आपणही आरसा पहावा अशा आशयाचे उद्गारही आयुक्तांनी काढले. या “मार्ग” म्हणजेच, रस्ता दाखविण्याच्या कार्यक्रमात आयुक्तांनी उल्लेखलेले “उद्योगी” पत्रकार आणि स्वतःचे “दर्पणदर्शन” घेण्याची गरज असलेले पत्रकार, नक्की कोण कोण आहेत, यावर निश्चितच वेगळे संशोधन करण्याची नितांत गरज आहे. नेमके त्याच दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या नगरसदस्या सौ. माया संतोष बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपची सत्ता आल्यापासून, पक्षाला भ्रष्ट कारभार, बेजबाबदार प्रशासन, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांंचे आगार, अशी बिरुदावली चिकटली असल्याचे सांगून, भाजपचा अपयशी, बरबटलेला चेहरा उघड केले आहे.

या दोन वेगवेगळ्या घटना असल्या तरी, एकाच दिवशी भाजपचा अपयशी चेहरा उघड करून, भाजपाई नगरसदस्या माया बारणे यांनी भाजपच्या अब्रूची दाखविलेली लक्तरे आणि “वेगळे उद्योग” करणाऱ्यांना आपले मुखमंडल आरश्यात पाहण्याची आयुक्तांनी केलेली सूचना, सर्वव्यापक असली तरी सत्ताधारी भाजपाईंसह सर्वलागू आहे, हे निश्चित. आपल्या आतापर्यंतच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिका आणि एकूणच शहराच्या कारभारात भाजपाईंना ज्या बिरुदावल्या चिकटल्या आहेत, त्या पाहता आयुक्तांच्या आरसा पाहण्याच्या सल्ल्याची सगळ्यात जास्त गरज, त्यांनाच असल्याचे आता स्पष्ट होते आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या, वेळेवर आल्या, लगेच झाल्या, उशिरा झाल्या असे काहीही झाले तरी निवडणुका होणार हे निश्चित. त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी सगळ्यांनाच आपले चेहरे जनतेला दाखवायचे आहेत, हेही नक्की. त्यातल्या त्यात सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर जनसामान्य मतदारांचे लक्ष जास्त असणार आहे. आपल्या सत्ताकाळात आपण आपले चेहरे कशाकशाने बरबटवले आहेत, हे शहरातील समस्त भाजपाईंनी आता ध्यानात घेतले पाहिजे.

यापूर्वीच्या आयुक्तांनी सत्ताधारी भाजपचे सगळे उद्योग झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी प्रत्येकाला दमात घेता येत नाही हे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यमान आयुक्तांनी, सत्ताधारी भाजपाईंना स्पष्ट दाखवून दिले आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराने आणि अनागोंदी, अनाचार पसरवून केलेल्या कारभाराने बरबटलेले भाजपाई चेहरे देखील उघडे पडले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आरसा पाहण्याचा सल्ला आता शहरातील समस्त भाजपाईंनी गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सुक्ष्मनियोजन करून, त्यासाठी माणसे नेमून पक्षीय पातळीवर संघटनकौशल्य दाखविता येईलही, मात्र आपले बरबटलेले चेहरे, हे समस्त भाजपाई कसे मतदारांसमोर आणणार हा खरा प्रश्न आहे. गेल्या उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या भाजपाई सत्ताकाळात दरवर्षी किमान एकतरी भ्रष्टाचाराचे प्रकरण चर्चेत आले आहे. मतदारांची जाण आणि ध्यानात ठेवण्याची क्षमता कदाचित कमी असेलही मात्र, शहरातील समस्त मतदार गझनी चित्रपटातील हिरोसारखे आहेत, असे कदाचित समस्त भाजपाईंना वाटत असावे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील समस्त भाजपाई पुन्हा सत्ता मिळवण्याची इच्छा धरून आहेत.

जनसामान्यांची ध्यानात ठेवण्याची क्षमता अगर स्मरणशक्ती, शहरातील समस्त भाजपाई सत्ताधाऱ्यांना आरसा दाखविण्याइतकी नक्कीच शाबूत आहे. मात्र, जनसामान्यांनी तसा आरसा भाजपाईंना दाखवला, तर त्यांच्या सत्ता पुन्हा मिळविण्याच्या स्वप्नाचे, किंबहुना दिवास्वप्नांचे नक्की काय होईल, याचाही विचार आता समस्त भाजपाईंनी करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी आरसा पाहण्याचा सल्ला पत्रकारांना दिलाच आहे, त्याचबरोबर सत्ताधारी भाजपाईंनी आणि एकूणच राजकारण्यांनी, किंबहुना समस्त जनसामान्यांनीही आता आरसा पाहण्याची आणि त्याचबरोबर आरसा दाखविण्याची गरज मात्र, सांप्रतला निर्माण झाली आहे. आता ही गरज लक्षात घेऊन कोणकोण, कोणासाठी, कधी, आणि कसा या आरशाचा  उपयोग करून घेईल आणि त्यातून काय नक्की निष्पन्न होईल हे कालदर्शी आहे.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×