भाजपाई शहराध्यक्षांच्या “पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्ट”चा भोंगळपणा उघड!
सगळीकडे पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्टचा डांगोरा पिटुन आपल्याला हवे तसे राजकारण खेळण्याचा प्रयत्न करणारे पिंपरी चिंचवड शहर भाजपाई अध्यक्ष भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचा रिस्पेक्टचा भोंगळपणा शेवटी उघड पडला आहे. आपणच राजकारण करू शकतो, या अहंभावातून त्यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील स्वपक्षीय आणि विरोधी पक्षीयांना सातत्याने खेळवले, डिवचले, नाडले, पिडले आहे. मात्र, त्यांच्या तोडीस तोड देणारा आणि शहरविकासाचे खरेखुरे प्रश्न विचारणारा भेटला की, त्यांच्या पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्टचा रिस्पेक्ट कसा ढगात जातो, हे स्पष्ट झाले आहे. प्रकार तसा अत्यंत साधा, भाजपाई शहराध्यक्ष आणि आमदार असलेल्या महेशदादा लांडगेंनी पुरंदर तालुक्यातील रद्द झालेले विमानतळ पुन्हा खेड, म्हणजेच राजगुरूनगर तालुक्यात स्थापित व्हावे म्हणून प्रयत्न करण्याचे आवाहन खेड, शिरूरच्या आजीमाजी खासदारांना केले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आपले या प्रस्तावाला समर्थनच होते, मात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा आणि योग्य मोबदला मिळावा यासाठी आपण झगडत होतो, विमानतळाला तेव्हाही विरोध नव्हता आणि आताही नाही, असे म्हणून आपला डाव आटोपता घेतला. आजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही, विमानतळाला आपला पाठिंबा आहेच, त्यासाठी आपली कोणतेही राजकारण न करता, पक्षविरहीत पुढाकार घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हि तयारी दाखवितानाच नाशिक फाटा आणि मोशी दरम्यानच्या नाशिक रस्त्याचे रखडलेले सहापदारी रुंदीकरण, भूसंपादानासह पूर्ण करण्यासाठी आपणही प्रयत्न करावेत, पिंपरी चिंचवड महापालिकेत आपल्या पक्षाची सत्ता आहे, असे प्रतिआवाहन केले.
एक यत्किंचित खासदार आणि तेही राष्ट्रवादीचे, आमच्या महेशदादांंना चक्क प्रतिआवाहन करण्याचे धारिष्ट्य दाखवतात, म्हणजे काय? यावर समस्त शहर भाजप आणि आमदार शहराध्यक्षांची सगळ्या छोट्यामोठ्यांसहची प्रसिद्धीयंत्रणा ढवळून आणि खवळून उठली. त्याचबरोबर भाजपाई शहराध्यक्ष आमदारांचा पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्टचा बुरखा देखील टराटरा फाटला. प्रश्न विचारणारे अगर जाब विचारणारे कोणी नको आणि मनमानी कारभार करून महापालिकेची सत्ता वापरून आपले बगलबच्चे, सगेसोयरे, हितसंबंधी आणि स्वतःच्या तुंबड्या, खळग्या, कणगी भरता याव्यात म्हणूनच केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपवासी झालेले आणि सत्तेचे लाभार्थी ठरलेले, भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांची पिलावळ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारल्यावर विदीर्ण आणि तहसनहस झाली नसती तरच आश्चर्य!
तसेही, अगदी दिल्लीपासून भोसरीच्या शितलबागेतील आणि पिंपळे गुरवच्या शाळेजवळील गल्लीपर्यंत समस्त भाजपाई, त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांच्या अंगावर जातात, त्यांना देशद्रोही, धर्मद्रोही ठरवतात, हा २०१४ पासूनचा इतिहास आहे. त्यासाठी प्रसिद्धिमध्यमे, समाजमाध्यमे यांना पगारी नेमून आपण सांगू तेच प्रसिद्ध करण्याचा अगर जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रघात या भाजपाईंनी ठेवला आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून मग कोणा खासदाराने या भाजपाईंना त्यांच्यामुळे गोत्यात आलेल्या एखाद्या बाबीचा प्रश्न विचारल्यावर ही मंडळी कासावीस झाली आहेत.
वस्तुतः खासदार कोल्हेंनी निदर्शनास आणून दिलेला शहरातील नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणाचा मुद्दा, केवळ आम्ही त्यात लक्ष घालू, असे म्हणून सोडून देता आला असता. मात्र, आपल्याला प्रश्न विचारला गेला, या भावनेतून भाजपाई शहराध्यक्ष आणि त्यांची यच्चयावत पिलावळ आता कोल्ह्याची शिकार करायला निघाल्याची हाकाटी पिटत आहेत. आम्ही कायकाय केले आणि कायकाय करणार याची जंत्री देऊन वर येत्या लोकसभा निवडणुकीत कोल्हाही मारणार अशी दर्पोक्ती या पिलावळीने केली आहे. त्यासाठी शिवस्वराज्यातील एक हुकूमनाम्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्थात या पिलावळीचे सामान्यज्ञान देखील तुटपुंजे असल्याने, ऐतिहासिक बाबींचा उहापोह आणि त्याची खरी माहिती या पिलावळीला असण्याची सुतराम शक्यता नाहीच. शिवस्वराज्यातील ज्या हुकूमनाम्याचा उल्लेख भाजपाई शहराध्यक्ष आमदारांच्या पिलावळीने केला आहे, त्या हुकूमनाम्यातील मसुद्यात अजूनही काही बाबींचा समावेश आहे. मूळ हुकूमनामा असे सांगतो की, रयतेच्या उभ्या पिकाची नासाडी करणारी डुकरं, कोल्हे, यांसह रयतेच्या पाळीव जनावरांची लांडगेतोड करणारे लांडगे यांना मारून त्यांची शेपटी आणून देणाऱ्यास इनाम दिले जाईल.
आता मुद्दा हा उपस्थित होतो की, येत्या लोकसभेच्या निवडणुकीत, कोल्हा मारून त्याची शेपटी सरकार दरबारी पेश करून इनाम मिळवण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्षांच्या पिलावळीला याच्या दुसऱ्या बाजूला आवाका नसावा. रयतेच्या शेतात धुडगूस घालणारी डुकरं आणि रयतेच्या पाळीव जनावरांना कष्ट पोहोचविण्यासाठी झुंडशाही करणारे लांडगे, यांची डोकी मारून शेपट्या जमा कारणाऱ्यालाही नक्कीच इनाम मिळणार आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूक येण्याची वाट पाहण्याचीही गरज नाही. या समस्त शहर भाजपाईंचा जीव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेच्या पोपटात आहे. या पोपटाची मुंडी येत्या महापालिका निवडणुकीतच मुरगळला येऊ शकते.
त्याही पुढे जाऊन रयतेला त्रासणाऱ्या, नाडणाऱ्या, पिडणाऱ्या डुकरं, लांडग्यांची डोकी मारणारा एखादा कोल्हाही असूच शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे, तो कोल्हाही ईनामाचा हक्कदार ठरतो!
———————————————————–