प्रसिद्धीलोलुप शहर भाजपाईंचे “सगळं मीच केलं” अभियान!

शहरात कोणाचे घरी वंश वाढला तरी, याला जबाबदार केवळ आणि केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाई आजीमाजी शहराध्यक्षच असणार आहेत काय, असा प्रश्न सांप्रतला निर्माण होतो आहे. अगदी नवीन शौचालयापासून मोठ्या वास्तुपर्यंत, शहरात सुरू होणाऱ्या कोणत्याही बाबी भाजपमुळे सुरू झाल्या, शहरात भाजप नसती तर, या शहरात काहीही झाले नसते, असा दावा करण्याच्या सोसापायी प्रत्येक गोष्टींचे, अगदी आपला सहभाग नसलेल्याही गोष्टींचे श्रेय घेण्याचा अतिरेकी प्रयत्न शहर भाजपाई करताना दिसताहेत. बडवून बडवून काळाठिक्कर पडलेला आपला पार्श्वभाग अजूनही कसा लालचुटुक आहे, हे दाखविण्याचा हा प्रयत्न आता शहरवासीयांनाही असहनिय झाला असल्यास नवल वाटू नये, इथपर्यंत या प्रसिद्धीलोलुपतेचा आता कहर झाला आहे. “सगळं मीच केलं” असे दवंडी पिटुन सांगणारे हे भाजपाई आणि त्यांची प्रसिद्धी यंत्रणा, शहरात बोकाळलेला भ्रष्टाचार, शहरविकासाच्या नावाखाली चालू असलेली गदळ टक्केवारी, पक्षांतर्गत अनागोंदी, ठेकेदारीसाठी घातलेले घोळ, आपल्या बगलबच्च्यांना ठेके मिळावेत म्हणून वेठीस धरलेले महापालिका प्रशासन यावर मात्र, गदारोळ झाल्यावर आपल्या पूच्छाने आपलाच पार्श्वभाग झाकून पळ काढणाऱ्या श्वानासारखे अक्षरशः नदारद होत आहेत.

प्रसिद्धीयंत्रणा वापरून आपल्या पगारी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे तयार केलेल्या बातम्या पसरवून श्रेय मिळविण्याचा हा भाजपाई प्रयत्न दिल्लीपासून अगदी भोसरीच्या गल्लीपर्यंत कायम सुरू असतो. आता सांप्रतचे उदाहरण द्यायचे झाले तर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एक समाजोपयोगी निर्णयाचे देत येईल. नागरिकांकडे असलेल्या निरुपयोगी सायकली, नागरिकांनी महापालिकेकडे सुपूर्द कराव्यात, त्या सायकली महापालिका संचालित औद्योगिक कुशलता प्रशिक्षण केंद्रातील म्हणजेच आयटीआय मधील विद्यार्थ्यांकडून वापरण्यायोग्य दुरुस्त करून, शहरातील गरजू विद्यार्थ्यांना वापरण्यास देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांनी आपल्या निरुपयोगी अगर नादुरुस्त सायकली जवळच्या प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रावर आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. काही नागरिकांनी आपल्या सायकली आणून देण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, इतकी समाजोपयोगी बाब असूनही आपल्याला श्रेय मिळत नाही, म्हटल्यावर कासावीस झालेल्या भाजपाईंनी लगेच प्रसिद्धिसाठी समाजमध्यमांचा आसरा घेतला.

लगेच भाजपाईंनी आपल्या आजीमाजी शहराध्यक्षांची छबी जोडून समाजमाध्यमांद्वारे पारदर्शपत्र प्रसूत केले आणि महापालिकेच्या लोकहीतकारक बाबीला आपल्या पक्षाचे नाव जोडून घेतले. काम सुचविणारे अधिकारी आणि त्याला मान्यता देणारे आयुक्त राहिले बाजूला, जणू आपल्या पक्षाचाच निर्णय असल्यासारखे समाजमाध्यमांद्वारे हाकाटून प्रत्येक बाबींचे श्रेय लाटण्याचा हा आपमतलबी प्रकार करून केवळ प्रसिद्धीत राहण्याचा हा सोस नव्हे काय, असा प्रश्न शहरवासीयांद्वारे विचारला जातो आहे.

आता यापुढे प्रश्न निर्माण होतो तो हा की, मग शहरवासीयांना वेठीस धरण्याचा जो प्रकार, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी चालविला आहे, त्याचे उत्तरदायित्व कोणाचे. गेल्या सुमारे पावणेपाच वर्षात भाजपाईंनी सुरू केलेला एकही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. नाईलाजाने अनेकदा मुदतवाढ आणि त्यामागोमाग आपोआप मिळणाऱ्या दरवाढीचा मलिदा आपल्या बगलबच्च्या ठेकेदारांना देण्यासाठी, ठरवून शहरविकासाची कामे रेंगाळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे शहराचा विकास होतो आहे की नाही, माहीत नाही, मात्र, भाजपाई आशिर्वादाने महापालिकेचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला नक्कीच जादाचा फायदा होतो आहे. पिंपरी चिंचवड महापलिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ करण्याच्या या प्रयत्नांचे उत्तरदायित्व मात्र, ही भाजपाई मंडळी महापालिका प्रशासनावर ढकलतात दिसत आहेत. मात्र, शहरवासी आता या श्रेयाच्या भानगडीला पुरते वैतागले आहेत, हे नक्की.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×