औंध किवळे रस्त्याच्या धर्तीवर आता मुंबई पुणे रस्त्यावर बलात्कार?
एखाद्याने, एखाद्यावर आपल्या ताकदीचा, बळाचा, रुतब्याचा, ओहोद्याचा, धोरणाचा, निर्णयक्षमतेचा वापर करून, त्याला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यास भाग पाडणे आणि तसा कोणी भाग पडत नसेल तर, त्यावर आपली मर्जी थोपणे, या क्रियेला बलात्कार असे संबोधतात. हा बलात्कार व्यक्तीने व्यक्तीवरच केला पाहिजे, असे नाही, तर व्यवस्था जनसमान्यांवर, यंत्रणा विकासावर, धोरण ठरविणारे सुरळीत चाललेल्या व्यवस्थेवर अगर व्यवस्था सुरळीत चालू असलेल्या यंत्रणेवरदेखील बलात्कार करते. सांप्रतच्या काळी असाच काहीसा बलात्कार पिंपरी चिंचवड महापालिकेचा बीआरटी विभाग, मुंबई पुणे रस्त्यावर आपली मर्जी थापून करतो आहे. महापालिकेने या मुंबई पुणे रस्त्यावर यापूर्वीच अनेक बलात्कार केलेले आहेत. आता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ता आणि पदपथ नव्याने निर्माण करून नवा बलात्कार करण्याचे नियोजन केले आहे. औंध किवळे रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मिटरचे सुशोभित पदपथाचे, ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते, तीच पद्धत वापरून मुंबई पुणे रस्त्यावर सुशोभित पादचारी मार्ग आणि सायकल मार्गिका तयार करण्याचा आणि त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर बलात्कार करण्याचा मनसुभा आखला जात आहे.
औंध किवळे बीआरटी रस्त्यावर चाळीस कोटींचा पादचारी मार्ग कोणत्याही निविदेशिवाय ठेकेदाराला थेट पद्धतीने आंदण म्हणून देण्याचा काही अधिकारी आणि राजकीय हितसंबंधितांचा घोळ महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी उघडकीस आणला. त्यानंतर आता मुंबई पुणे रस्त्यावर अशा प्रकारचा प्रयोग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटी विभागाने सुरू केला आहे. मात्र, सायकल मार्गिका आणि सुशोभित पादचारी मार्ग यासाठी मुंबई पुणे रस्त्यावर जागा शिल्लक आहे काय, याचा विचार संबंधित विभागाने केल्याचे दिसून येत नाही. मुंबई पुणे रस्त्याने थेट जाणाऱ्या वाहनांसाठी समतल विगलक म्हणजेच ग्रेड सेपरेटरच्या चार मार्गिका, त्यानंतर बीआरटीच्या दोन मार्गिका, त्यानंतर इतर वाहतुकीसाठी चार मार्गिका, त्यातच मेट्रोचे मोठे खांब या सगळ्यात मुळातच मुंबई पुणे रस्ता दिसेनासा झाला आहे. मग आता नवीन पदपथ आणि सायकल मार्गिकेसाठी जागा कोठून निर्माण करणार याबाबत मात्र, कोणतेही उत्तर संबंधित विभागाकडे नाही. केवळ खर्च करण्यासाठी काम काढणे असाच याचा सरळ अर्थ असल्याची चर्चा याबाबत महापालिका वर्तुळात केली जात आहे.
बीआरटी विभाग आपलेच घोडे पुढे दामटून काय साधणार आहेत?
गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटी विभागाने मुंबई पुणे रस्त्याशी संबंधित नगरसदस्यांना आयुक्तांसमक्ष संगणकीकृत सादरीकरण करून याबाबतची माहिती दिली होती. त्याचवेळी शाम लांडे, अमित गावडे यांसह अनेक नगरसदस्यांनी या कामाला कडाडून विरोध केला होता. पदपथ आणि सायकल मार्गिकेने मूळ रस्ता आणखी अरुंद होईल, शहरांतर्गत वाहतूक त्यामुळे अडचणीची आणि अपघातग्रस्त होईल ही भीती स्पष्टपणे निदर्शनास आणून देण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने आपलेच घोडे पुढे दामटून मुबई पुणे रस्त्यावर सायकल मार्गिका आणि मोठा पदपथ उभारण्याचे निश्चित केले आहे. वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरणारे हे विकासाच्या नावाखाली उभे करण्यात आलेले भूत नक्की कशासाठी यावर आता महापालिका आयुक्तांनीच संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
मुंबई पुणे रस्त्यावर चालू असलेला हा बलात्काराच!
तत्कालीन महापालिका आयुक्त दिलिप बंड यांनी अनेक विरोध मोडीत काढून मुंबई पुणे रस्ता मोठा करून दिला. एकसष्ट मीटर रुंदीचे नियोजन असतानाही हा रस्ता अजूनही काही ठिकाणी पूर्ण एकसष्ट मीटर नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही त्यावेळी एव्हढा मोठा रस्ता पाहून शहरवासी सुखावले होते. मात्र, त्यानंतर विकासाच्या नावाखाली समतल विगलक, बीआरटी, त्यानंतर मेट्रो या सर्व बाबी याच रस्त्यावर थोपण्यात आल्या. आता सायकल मार्गिका आणि पदपथ निर्माण करून या रस्त्याचे संकरी गल्लीत रूपांतर करण्याचा हा अट्टहास नक्की कशासाठी हे अनाकलनीय आहे. आताच या रस्त्यावरील एकंदर सात चौकांपैकी तीन चौकात गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते आहे. सामान्यपणे पुढे जाण्यासाठी किमान दोन सिग्नलचा वेळ लागणारे चौक या रस्त्यावर आहेत. मग, आता सायकल मार्गिका आणि सुशोभित पदपथ निर्माण करणे, म्हणजे या रस्त्यावर होणारा बलात्काराचा नव्हे काय?
————————————————————