आता शहरातील मतदारच भाजपाईंपेक्षा वेगळा पर्याय शोधतील!
वसंत बोराटे या भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाई नगरसेवकाने आपल्या पिंपरी चिंचवड महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला आणि शहरभर एकच गहजब उडाला. आपला नगरसदस्य पदाचा कार्यकाळ अवघे चार आठवडे शिल्लक असताना त्यांनी हा राजीनामा दिला. वसंत बोराटे नुसता राजीनामा देऊन थांबले नाहीत, तर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार यांची भल्या सकाळी भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशही केला. हे राजीनामा आणि प्रवेशनाट्य इतक्या वेगात घडले, की “गेला, गेला म्हणेपर्यंत पोहोचलादेखील” अशी पाहणाऱ्यांंची गत झाली. वसंत बोराटे यांनी वेगात घडविलेले हे नाट्य अनेकांच्या बोलत्या बंद करणारे ठरले. दरम्यान बोराटेंनी राजीनामा दिल्यानंतरच्या काही तासातच भोसरीचे भाजपाई आमदार आणि शहराध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. बोराटे कुटुंबियांचे मोठे योगदान असल्याची महती सांगत, भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी आमच्याकडे वसंत बोराटे यांच्यासाठी अनेक पर्याय असल्याची पुस्ती जोडली.
मात्र, वसंत बोराटे यांनी स्वतःचा पर्याय स्वतःच निवडून ठेवला होता आणि राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी तो सगळ्यांना दाखवूनही दिला. आता वसंत बोराटे यांच्यासारखाच या शहरातील मतदारही आपला भाजप व्यतिरिक्तचा पर्याय शोधतील, मग हे भाजपाई काय आणि कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. गेले अनेक दिवस भाजपला सोडचिठ्ठी देऊन काही नगरसदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळधारी होणार, अशी चर्चा शहरात होत होती. भाजपाई आजीमाजी शहराध्यक्ष आमदारांसह इतर स्थानिक नेत्यांनाही याची कल्पना होतीच. मात्र, वसंत बोराटे यांनी त्या प्रकारची सुरुवात करून दिली. अगदी खर्च करण्याच्या प्रलोभनापासून वाट लावण्याच्या धमकीपर्यंतचे सगळे प्रकार करून झाल्यावरही वसंत बोराटेंंनी आपले इच्छित साधले आहे. खरे म्हणजे ही पाळी पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंवर का आली याचे आत्मपरीक्षण करायला हवे होते. मात्र त्याऐवजी आपल्या बगलबच्च्यांकरवी वसंत बोराटेच कसे कुचकामी आहेत, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयोग केला आहे.
आत्मपरिक्षणाऐवजी शहर भाजपाई आत्मप्रौढीतच मग्न!
आमच्यासारखे कोणी नाही, आम्ही करू ते योग्य, आम्ही म्हणू ती पूर्व, बाकी सगळे बधिर मूर्ख, आम्हीच हुशार चाणक्य, या आत्मप्रौढीत आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहर भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष आमदार, हे त्यांचे बगलबच्चे, मालकासमोर श्वानासारखे पुच्छ हलविणारे यांच्या गराड्यात राहून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मश्गुल झाले होते. पण या आपणच आपल्याच भोवती विणलेल्या कोशाबाहेरही जग आहे, त्या जगाला भावना आहेत, स्वमत, स्वाभिमान, स्वअस्मिता आहे, याचा या भाजपाई शहराध्यक्षांना विसर पडला आहे. त्यामुळे या माजीआजी शहाराध्यक्षांनी आपल्या कोशाबाहेर डोकावण्याचा साधा प्रयत्नही कधी केला नाही. या कोशातील त्यांच्या अंकितांनीही त्यांना या कोशाबाहेरचे जग कधी कळू ना देता, आपलाच पार्श्वभाग कसा लालचुटुक आहे, हेच ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता परिस्थिती बदलते आहे, आपल्या लालचुटुक पार्श्वभागाला या बदललेल्या परिस्थितीचे फटके पडून, तो काळा निळा होतो आहे, याचेही भान या माजीआजी भाजपाई शहराध्यक्षांना अजून आलेले नाही.
या भाजपाईंनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपल्या सत्ताकाळात जो भ्रष्टाचारी, अनाचारी गावगोंधळ घातला आहे, त्यामुळे शहरातील राजकारणाचा, समाजकारणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. यांच्या स्वहितकारी, स्वाधिष्टीत राजकारणामुळे त्यांच्याच पक्षात असतानाही त्रासलेल्या मंडळींनी आता त्यांच्यासह भाजपलाच सोडचिठ्ठी देण्याचा विचार केला आहे. वसंत बोराटेंच्या रूपाने याची सुरुवात झाली आहे. आता ही सुरुवात कुठे जाऊन थांबते, हे येत्या महिनाभरात स्पष्ट होईल. मात्र, हे भाजपाई शहराध्यक्ष अजूनही त्यातून शहाणे होत नाहीत, अजूनही ते आपल्या पार्श्वभागाचे वर्णन लालचुटुक असेच करण्यात मश्गुल आहेत, किंबहुना, त्यांचे लाभार्थी त्यांना तसेच मश्गुल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भाजपाई शहराध्यक्षांच्या हाती केवळ धुपाटनेच?
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाईंची सत्ता स्थापन झाल्यापासून, आता सत्ताकाळ संपत असतानाच्या मधल्या पाच वर्षात, या भाजपाईंनी विकासाच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याव्यतिरिक्त इतर काहीही केले नाही. मोठमोठी कामे काढून आणि त्या कामासाठी मोठमोठे ठेकेदार नेमून या मंडळींनी मोठमोठी टक्केवारी आणि आपल्या बगलबच्च्यांना पोट ठेकेदारी मिळविण्यासाठी महापालिकेचा केवळ गदळ वापर केला आहे. काहीही खा आणि खाताना ओरबाडून खा, या पद्धतीचा हा भाजपाई भ्रष्टाचार आता शहरातील सामान्य मतदारांसह त्यांच्याच पक्षातील काहींना असहनिय झाला आहे. त्यामुळे भाजपाई नगरसदस्यांनी आपल्यासाठी पर्याय निवडलेच आहेत. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, या भाजपाईंनी पूर्वीच्या राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार दाखवून आपला पर्याय निवडण्यास मतदारांना भाग पाडले, त्याच पद्धतीने भाजपाईंचा भ्रष्टाचारी, अनाचारी नंगानाच पाहून, आता या मतदारांनी भाजपाईंना पर्याय म्हणून इतरत्र पाहण्यास सुरुवात केली आहे. वसंत बोराटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्याय निवडला, तसाच मतदारही त्या वाटेने गेले तर, या भाजपाईंची सत्ताही जाईल आणि अब्रूही! थोडक्यात भाजपाईंची अवस्था तेलही गेले, तूपही गेले, हाती मात्र, केवळ धुपाटनेच राहिले अशी होईल!
————————————————————