दादांकडे रदबदली करण्यासाठी, भाऊंची अण्णांना दोस्तीची साद?

राष्ट्रवादीचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची दोस्ती आख्ख्या पिंपरी चिंचवड शहरालाच नव्हे तर, या दोघांच्याही पक्षाप्रमुखांना देखील माहितीची आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा बोजवारा उडणार हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. आता इथले आपले बस्तान सुटणार या आशंकेने भाऊंनी अण्णांकरवी “दादांना” साकडे घातल्याची चर्चा सध्या शहरभर आहे. त्यासाठी अण्णांनी भाऊंची भेट घेऊन, आपल्या दोस्तीची बूज राखली असून, “दादांकडे” रदबदली केल्याचा सकारात्मक संदेश बहुदा त्यांनी  भाऊंना पोहोचवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे काय राजकीय फेरबदल शहरात होतील, यावर विविध अटकली लावल्या जात असल्या तरी, यात सगळ्यात मोठी गोची, पगारी पत्रकारांची झाली असून, आपला इथलाही दाणापाणी संपल्याचा साक्षात्कार, या पगारी पत्रकारांना झाला आहे. 

गेल्या १५ फेब्रुवारी रोजी भाजपचे माजी शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवशी भाऊंना अभिष्टचिंतन करण्यासाठी विविध राजकीय पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांसह अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांची भेट घेतली. काही चोरून लपून तर काही उघडपणे त्यांना येऊन भेटत होते. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहर समन्वयक आणि प्रवक्ते, माजी महापौर योगेश बहल यांचाही समावेश होता. पक्ष समन्वयक आणि प्रवक्ते यांच्यासह आमदारांनी भाऊंची घेतलेली ही भेट त्यामुळे शहर राष्ट्रवादीची अधिकृत भेट ठरते. असे अधिकृतपणे शहर राष्ट्रवादीने भाजपाई आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट काही खास करणांसाठीच घेतली असावी, अशी चर्चा या भेटीमुळे शहरभर सुरू झाली आहे. ते खास करण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा काही खास निरोप भाऊंसाठी होता काय, याचा धांडोळा घेतला जात आहे.

२०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली त्यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजपाई शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेशदादा लांडगे भाजपाई आमदार म्हणून निवडणून आल्यावर लगेच त्यांना पायउतार व्हावे लागले आणि भाजपाई शहराध्यक्षपद महेशदादा यांना बहाल करण्यात आले. त्यानंतरही भाजपाई पक्ष पातळीवर लक्ष्मणभाऊ काहीसे उपेक्षित राहिले आहेत. मात्र, त्यांचा गोतावळा आणि संबंध वाढताच राहिला आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, या निवडणुकीत आपले लोक भाजपाई उमेदवारीत कितपत सामावून घेता येतील, याबाबत लक्ष्मणभाऊ काहीसे सांशक आहेत. म्हणून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षापासून चालविला आहे. पुणे आणि मुंबईत या उभयतांच्या काही भेटी झाल्या असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भाऊंचे अधिकृत अभिष्टचिंतन केल्याची चर्चा आहे.

येत्या महापालिका निवडणुकीत शंकर जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार? 

आपल्या प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे लक्ष्मणभाऊ शहराच्या राजकारणात पूर्णवेळ सहभागी होत नाहीत. म्हणून त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप आता पुन्हा बऱ्यापैकी राजकीय सहभाग घेऊ लागले आहेत. शंकर जगताप हे पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यावेळचा त्यांचा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्यावर, २०१२नंतर शंकर जगताप यांनी कोणत्याही इतर राजकीय पक्षाकडून, कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवली नाही अगर कोणत्याही इतर राजकीय पक्षात अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. त्यामुळे ते अजूनही तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत. स्वतः शंकर जगताप खाजगीत हे कबुलही करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक अगर राज्यातील नेत्यांना, भाजपाई आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे राष्ट्रवादीशी कोणतेही वाद नाहीत, हे स्पष्ट करण्यासाठी येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच असलेले धाकटे बंधू शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्यास नवल वाटू नये.

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×