बहुजनांच्या मानकांचे दैवतीकरण, ब्राह्मणी षडयंत्र?

देव आणि देवाची भीती या संकल्पनेवर आधारित वैदिक ब्राह्मणी वर्चस्ववाद हि या देशाला लागलेली कीड आहे. या वैदिक ब्राह्मण्यवादातून जातीची उतरंड तयार झाली आणि या देशातील सामान्यजन या देव आणि देवाच्या भीतीने, ब्राह्मणी वर्चस्वात गुंतून पडला. देव काहीही करू शकतो, मानवी कुवतीच्या बाहेर आणि मानवी शक्तीच्या आवाक्यापालिकडले जे काही घडते, ते देव घडवतो, जो मानव काही अचाट आणि इतरांना असंभवनीय असे काही करतो, तो अमानवी अगर देवत्व असलेला आहे, हे भारताच्या समान्यजनांच्या मनात ठसविण्यात आलेले आहे. ब्राह्मणी वर्चस्ववादी उतरंडीचे हे पिल्लू आहे. त्यामुळे समाजातील, किंबहुना बहुजन समाजातील एखाद्या व्यक्तीने समाज सुधारणेचा एक प्रकार म्हणून काही चाकोरीबाहेरचे केले की त्याला देवत्व बहाल करण्याचे उद्योग केले जातात. एकदा एखाद्या व्यक्तित्वाला देवत्व बहाल केले की, त्याने केलेले कोणतेही काम दैवी शक्ती अगर दैवी करणी असे म्हणून त्याच्या संपूर्ण कर्तृत्वावरच देवत्वाचा शिक्का मारला जातो. बहुजनांच्या समाजसुधारकांवर असेच ब्राह्मणी देवत्वाचे शिक्के मारून त्यांचे कर्तृत्व बाद करण्याचे ब्राह्मणी षडयंत्र सध्या अगदी धीम्या पद्धतीने तयार करण्यात येत आहे.

कोण करतंय हे षडयंत्र? या देशात असे षडयंत्र करणारी एकमेव यंत्रणा आहे आणि ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हा संघ नावाचा बहू पाद आक्टोपस, सांप्रतला आख्खा देश गिळंकृत करण्यास टपला आहे. दीर्घकाळचा कार्यक्रम आखून, या देशातील बहुजनांचे स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान, आशास्थान असलेल्या विभूतींना दैवी कोंदणात बसवून त्यांचे कर्तृत्व शून्यवत करण्याचा प्रयत्न या संघ नावाच्या आक्टोपसमार्फत केला जातो आहे. याची सुरुवात बराच आधी संघाच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. महाराष्ट्र देशीच्या बहुजनांचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांची आशीर्वाद देण्याच्या पावित्र्यातील छबी आपल्या मेळाव्याच्या व्यासपीठावर लावून या संघींनी त्यांना देवत्व प्रदान करण्याचा प्रयत्न केला. अर्थात या महाराष्ट्रातील समस्त बहुजनांनी तो प्रयत्न हणून पाडला. आशीर्वाद देण्याच्या अविर्भावात छत्रपतींना दाखवून ते एक दैवी शक्ती असलेले व्यक्तिमत्व होते, हे जनसामान्यांना पटवून सांगण्याचा हा प्रकार होता.

एखाद्या विचारवंतांचे, समाजधुरीणांचे विचार मारायचे असतील, तर त्याला देवत्व बहाल करण्याचे हे ब्राह्मणी अगर संघी षडयंत्र, तसे जुनेच आहे. अशा षडयंत्रांवर हे संघी लोक वर्षानुवर्षे काम करीत असतात. अनेक वर्षांचा कार्यक्रम आखून आणि छोट्याशा चाचपणीने या षडयंत्राची सुरुवात करून हळूहळू आपल्याला हव्या त्या परिणामापर्यंत ते आणण्याची चिकाटी आणि धैर्य या ब्राह्मणी संघींकडे मोठ्या प्रमाणात आहे. बुद्धिमान आणि कर्तृत्ववान व्यक्ती केवळ ब्राह्मणच असू शकते, हे बहुजनांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न या संघींनी सातत्याने केला आहे. एक ब्राह्मणाला छत्रपती शिवरायांचे जैविक पितृत्व देण्याचा बळवंत पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांनी परदेशी लेखकांकरवी घातलेला घाट याचेच प्रतीक होते. मात्र, सामान्यजन या पुडी सोडण्याच्या प्रकाराला बांधले नाहीत म्हणून मग आता छत्रपती शिवरायांना देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न या मंडळींनी सुरू केला आहे.

म्हणजे बदनाम करून अगर देवत्व देऊन अशा कोणत्याही प्रकाराने एखाद्याचे विचार मारायचे, हा त्यामागील कुटील डाव आहे. सुदैवाने बहुजन समाजात काही विचारवंत आणि समाजधुरीण आजही आहेत आणि ते वेळोवेळी या षडयंत्राची माहिती आणि परिणाम जनसमान्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे या ब्राह्मणी कुटिलतेला अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, सातत्याने एखादी खोटी गोष्ट कानीकपाळी ठेवण्याचा प्रयोग तरीही केला जातो आहे. या देशाला संविधान अर्पण करताना, त्या संविधानाच्या उद्देशिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “आम्ही, भारताचे लोक…..” असा उल्लेख करून या देशाला ब्राह्मणी वर्चस्वाखाली जाण्यापासून वाचविले आहे. म्हणून मग जाहीररीत्या ते संविधान फडण्याचे धारिष्ट्य दाखविण्याचा प्रयत्न या सनातनी ब्राह्मणी संघींकडून झाला आहे. गांधींच्या हत्येचे पुनःप्रात्याक्षिक दाखविणारी हीच विखारी ब्राह्मणी मनोवृत्ती होती.

हे सगळे सांगण्याचा हेतू हाच की आपल्या मानकांना बदनाम करून अगर त्यांचे दैवतीकरण करून त्या मानकांची लौकिकार्थाने वैचारिक हत्या करण्याचा हा प्रयत्न या देशातील बहुजन जनसामान्यांच्या लक्षात यावा. दुर्दैवाने अजूनही हा बहुजन जनसामान्य ब्राह्मणी वर्चस्वातून स्वतःला बाहेर काढू शकला नाही. एखाद्याचा जन्म झाल्यापासून, त्याच्या मृत्यूनंतरच्या उत्तरक्रियेपर्यंत असे सगळे धार्मिक विधी आणि उपविधी तयार करून त्याबरहुकूम बहुजनांना वागण्यास भाग पाडणारी यंत्रणा या ब्राह्मणी षडयंत्राचाच भाग आहे. मात्र, ते करतानाही छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणे, प्रकांडपंडित छत्रपती संभाजीराजांना बदनाम बदफैली ठरविणे, राजर्षी शाहूंचे राजा असणेच नाकारणे, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले यांना अडथळा निर्माण करणे, त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय्य लाटणे, असे प्रकार या ब्राह्मणी षडयंत्रकारींनी केले असल्याचे इतिहास सांगतो. तरीही ही बहुजनांची मानके असलेली व्यक्तिमत्वे, बहुजनांच्या मनात घर करून आहेत, हे पाहिल्यावर त्यांचे दैवतीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.

आशिर्वाद देण्याच्या पावित्र्यातील छत्रपती शिवरायांची छबी प्रसूत करणे, शिवरायांची आरती तयार करणे, महात्मा फुलेंची पूजाअर्चा सुरू करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देऊळ बांधणे अशासारखे प्रयोग करून या बहुजन विचारवंतांना देवत्व देण्याचा घाट गटाला जात आहे. खरे म्हणजे हे ब्राह्मणी, संघी षडयंत्र हणून पाडण्यासाठी बहुजनांनी जागरूकतेने सातत्यपूर्ण काम केले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने बहुजन या षडयंत्राला बळी पडत असल्याचे दृश्य दिसू लागले आहे. बहुजनांनी आपल्या मानकांना देवत्वापासून वाचविले पाहिजे आणि त्यांच्या विचारांचे धोरणांचे पुरस्कर्ते, अनुयायी झाले पाहिजे. पुतळ्यात आणि देवळात विचारवंतांना बंद करण्याऐवजी डोक्यात, मेंदूत बंद करणे जास्त उपयोगाचे ठरणार आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×